नगरटुडे बुलेटीन 11-01-2021

नगरटुडे बुलेटीन 11-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अवतार मेहेरबाबा कामगार युनियन पगारवाढीसाठी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात

तुटपुंजी पगारवाढ कामगारांना अमान्य : कोरोना महामारीचे कारण पुढे करुन ट्रस्ट आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप

वेब टीम नगर : अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे. सदर प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी पाच ते सहा तारखा होऊन देखील ट्रस्ट कामगारांचे मागण्या सहानुभूतीपुर्वक सोडवित नसल्याने युनियनच्या वतीने रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.  

नुकतीच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या तारखेत ट्रस्टने कामगारांना दरमहा तीन हजार दोनशे तीन वर्षासाठी वाढ देण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र कामगारांना अत्यंत कमी पगार असल्याने ही पगारवाढ परवडणारी नसून, ट्रस्टने कामगारांना चालू वर्षी दरमहा पाच हजार तर पुढील दोन वर्षासाठी दरमहा सहा हजार रुपये पगारवाढ देण्याची मागणी केली आहे. यावेळी युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, राजू ढवळे आदींसह कामगार उपस्थित होते.

 ट्रस्ट व युनियनचा वेतनवाढीचा करार २०१७ रोजी झाला होता. त्याची मुदत मार्च२०२० मध्ये संपली आहे. कोरोना महामारीचे कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत आहे. सदर प्रश्‍न चर्चेने सोडविण्यासाठी ट्रस्टी तारखेला देखील उपस्थित राहत नसल्याचा युनियनचा आरोप आहे. चालू वर्षी पाच हजार व पुढील दोन वर्षासाठी प्रत्येकी सहा हजार रुपयाच्या पगारवाढीवर सर्व कामगार ठाम असून, सदर प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अ‍ॅड. कॉ.सुधीर टोकेकर म्हणाले की, अवतार मेहेरबाबा ट्रस्टची अब्जावधी रुपयांची उलाढाल आहे. इतर तरतुदीप्रमाणे कामगारांच्या पगाराची देखील तरतुद करण्याची गरज आहे. ट्रस्ट कोरोनाचे कारण पुढे करुन आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगून कामगारांना पगारवाढ देण्यास टाळाटाळ केली आहे. मात्र ट्रस्टने कोरोनाच्या काळात जागेचे व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. सध्या सर्व धार्मिक स्थळे सुरु झाली असून, संस्थांना ऑनलाईन देणग्या देखील मिळत आहे. ट्रस्टने कोरोनाचा मुद्दा पुढे करुन कामगारांचे हक्क हिरावून घेऊ नये. कामगारांच्या पगारवाढीसाठी न्यायलयीन लढा देण्याची देखील युनियनची तयारी आहे. मेहेर बाबांनी गोर-गरीबांचे कल्याण करण्याचा संदेश दिला. सर्व कामगार गोर-गरीब असून, बाबांच्या विचाराने ट्रस्टींनी कामगारांची भावना लक्षात घेऊन त्यांना पगारवाढ देण्याचे सांगितले. सतीश पवार म्हणाले की, ट्रस्टने इतर खर्च कमी केल्यास कामगारांना पगारवाढ देणे सहज शक्य होणार आहे. न्याय हक्काच्या मागण्यांसाठी ट्रस्टचे कामगारांना रस्त्यावर येण्याची वेळ आनली आहे. कामगारांना किमान जगता यावे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येण्यासाठी वेतन पुरेश्याप्रमाणात देण्याची गरज आहे. न्याय-हक्कासाठी कामगार तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नायलॉन  मांजावर बंदी आणण्यासाठी कठोर कारवाई करावी

युवा सेनेचे मागणी : पशु-पक्ष्यांसह मनुष्यांच्या जीवावर बेतणारा मांजा 

वेब टीम नगर : पशु-पक्ष्यांसह मनुष्यांच्या जीवावर बेतणार्‍या नायलॉन (चायना) मांजावर शहरात पूर्णत: बंदी आणण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन युवा सेनेचे सावेडी विभाग प्रमुख महेश शेळके यांनी महापालिकेत दिले. हिंदूंच्या सणावर चायनाचे विघ्न नको असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी युवकांमध्ये जनजागृती करण्याचे स्पष्ट केले.

 मकरसंक्रांति निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्यात येतात. पतंग कापला  जाऊ नये यासाठी युवक नायलॉन (चायना) मांजाचा वापर करीत आहे. हा मांजा सहजासहजी तुटत नसल्याने, अनेक पशु-पक्ष्यांना इजा होत आहे. अनेक पक्ष्यांची या मांजामुळे पंख, मान कापली गेली आहेत. या नायलॉन मांजाच्या वापरामुळे पशुपक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला असून, पशु-पक्षी मरण देखील पावले आहेत. तसेच या मांज्याने अनेक व्यक्तींचा गळा, हात कापले जाण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना अपंगत्व आले आहे, तर काही मृत्यूमुखी देखील पडले आहेत. अंध व्यक्तींनाही याचा मोठा धोका निर्माण झालेला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन नायलॉन (चायना) मांजावर शहरात पूर्णत: बंदी आनण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन युवा सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वडगावगुप्ता येथील कार्यकर्त्यांचे आरपीआय मध्ये प्रवेश

सचिन शिंदे यांची आरपीआयच्या नगर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

वेब टीम नगर : वडगावगुप्ता (ता. नगर) येथील युवा कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांना आरपीआयचे नगर तालुकाध्यक्षपद देऊन त्यांचे व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम शेख, शहर प्रवक्ता जमीर इनामदार, संतोष पाडळे, उपनगर शहर उपाध्यक्ष जावेद सय्यद, शहर संघटक बंटी बागवान, शहर उपाध्यक्ष अरबाज शेख, युवा नेते ऋषी विधाते, नवनाथ शिंदे, दिपक शिंदे, दिनेश पाडळे, किरण शिंदे, प्रविण शिंदे, निखिल शिंदे, विपुल भोसले, देविदास गायकवाड, शंभू साठे, बाबासाहेब शिंदे, मिलिंद शिंदे, शरद गव्हाणे, अक्षय जाधव, देविदास निकम, दिपक बोरसे, सचिन आंबेडकर, रोहित महाजन, अमित शिंदे, अजय शिंदे, लक्ष्मण शिंदे, राहुल जाधव, सचिन शिंदे, सुमित शिंदे, शाम पाखरे, बाळू पाखरे, नितिन शिंदे, अक्षय ठोंबे, प्रशांत शिंदे, गौतम खंडागळे, गौतम शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, सत्ताधारी भाजप हुकुमशाही पध्दतीने वागूण लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सत्ताधारी भाजप सरकारला जनमताची आदर व भिती राहिली नसून, ईव्हीएम मशीनच्या जोरावर सत्तेत येत आहे. ईव्हीएम मशीन लोकशाहीसाठी घातक ठरली असून, सत्ताधार्‍यांना धडा शिकवण्यासाठी भविष्यातील निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याची गरज आहे. यासाठी आरपीआय जन आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बुऱ्हानगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

बुऱ्हानगरच्या ग्रामस्थांच्या बरोबर संपूर्ण तनपुरे कटुंब : राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे

वेब टीम नगर : बुऱ्हानगरच्या विकासासाठी आता परिवर्तन घडवत महाविकास आघाडीला जनतेनी साथ द्यावी. बुऱ्हानगरच्या ग्रामस्थांच्या बरोबर संपूर्ण तनपुरे कटुंब आहे, राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे यांनी केले.

          नगर तालुक्यातील बुऱ्हानगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सकाळी तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष उध्दव दुसुंगे, राहुरीच्या नगराध्यक्षा अनिता पोपळघट, अमोल जाधव, ॲंड.विजय भगत, बाबासाहेब कर्डिले, ॲंड. अभिषेक भगत, रोहिदास कर्डिले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते आदींसह शिवसेनेचे नगरसेवक, स्थानिक नागरिक व उमेदवार उपस्थित होते.

माजी आ.शिवाजी कर्डिले यांच्यावर जोरदार टीका करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला खरपूस समाचार

         यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, बुऱ्हानगरच्या ३० वर्षाच्या इतिहासात प्रथमच लोकशाही पद्धतीने ग्रामपंचायतची निवडणुक होत आहे. त्यामुळे इथल्या नेत्यांच्या दडपशाही व गुंडशाही न घाबरता बुऱ्हानगरची जनता या निवडणुकीत निर्भीडपणे मतदान करतील. लोकशाही काय असते हे त्यांना आता कळेल. बुऱ्हानगरचा विकास केला – विकास केला  असे सांगणाऱ्या नेत्यांनी गावाचा, जनतेचा विकास न करता स्वतःचाच विकास केला. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीत एक हजार कोटींनी वाढ झाली आहे. यांनी गावाचे पाणी दुसरीकडे पळवल्याने गावातील नागरिकांना १५ -१५ दिवस पाणी मिळत नाहीये. बुऱ्हानगर प्रादेशिक योजनेचे पाणी त्यांनी शेतीसाठी वळवले. फक्त स्वताच्या घराकडील रस्त्यांचे डांबरीकरण केले. मात्र आता मंत्री प्राजक्त तनपुरे व आम्ही मिळून यात लक्ष घालणार असून शेती कडे वळवलेले पाणी बुऱ्हानगरच्या नागरिकांना उपलब्ध करून देणार आहोत. आमचे डीपॉझीट जप्त न होता बुऱ्हानगरच्या सर्वच्या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवारांचा विजय निश्चीत आहे.

          उध्दव दुसुंगे म्हणाले, ग्रामपंचायतच्या निवडणुकी मध्ये या गावातील सद्दामशाही आता संपणार आहे. तालुक्याचा विकास दादापाटील शेळके यांनीच केला. त्यांनी काहीच केले नाही. जनताच त्यांना आता पुन्हा एकदा जागा  दाखवणार आहे.

ॲंड. अभिषेक भगत म्हणाले, ३० वर्षांनी बुऱ्हानगरच्या जनतेने ग्रामपंचायतची निवडणूक हाती घेतली आहे. त्यामुळे गावाच्या विकासासठी आता परिवर्तन होणार असून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील.

रोहिदास कर्डिले म्हणाले, बुऱ्हानगरच्या ग्रामपंचायत निवडणुकी साठी मी व माझ्या पत्नीने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी प्रशासनावर दबाव टाकून सूड बुद्धीचे राजकारण करत अर्ज बाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायदेवतेने मला न्याय दिल्याने आमचे अर्ज वैध ठरले आहेत. बुऱ्हानगरची सर्व जनता आमच्या बरोबर आहे. दडपशाहीला न घाबरता आमचे परिवर्तन पॅनलचा विजय निश्चीत आहे.यावेळी महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार सुवर्णा कर्डिले, अश्विनी जाधव, कुणाल भगत, सुभाष भगत आदींसह गिरीश जाधव, अॅड. अशोक कोठारी, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संग्राम शेळके, अमोल येवले, विशाल वालकर, संग्राम कोतकर, सोमनाथ जाधव, भगवान हरबा,  उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नवनीत विचार मंच आक्रमक होणार...

 सुधीर मेहता यांचा इशारा  : शहराचे शिल्पकार ‘नवनीत भाईंच्या जन्मशताब्दी’चा सोईस्कर विसर पडणार्‍या मनपाला कृतघ्न पालिकेचा पुरस्कार देणार

    वेब टीम  नगर :  शहराच्या शिल्पकराची जन्म शताब्दी आली आणि  चालली पण ना कुणाला खंत ना कुणाला खेद. ज्या अर्बन बँक आणि पालिकेचे 40 वर्ष भाईनी नेतृत्व केले. त्या मनपालाही भाईंची जयांतीच माहिती नाही तर जन्मशताब्दी कधी आठवणार. एकजात सगळे कृतघ्न, ऐतिहासिक नगरीचे कृतघ्न असे नामांतर केले तर वावगे ठरणार नाही, अशा शब्दात नवनीत विचार मंचचे अध्यक्ष आणि नवनीत भाईंचे मानसपुत्र सुधीर मेहता यांनी मनपा वर घणाघाती हल्ला चढवला आहे.

     नवनीत भाईंच्या निधनानंतर दरवर्षी नवनीत विचार मंच जयंती-पुण्यतिथी दिनी कार्यक्रम करते, पण कधीही पालिकेचे यात सहकार्य मिळाले नाही. लालटाकी पुढील सावेडी परिसराला ‘नवनीत नगर’ नाव देण्याचा ठराव झालंय, पण एकदा शिला शिंदे महापौर असताना पत्रकार चौकात ३ बाय २ फुटाचा फलक लावला. मात्र नंतर फलक तर गायब आणि पुढे नवनीत नगरचा सर्वानाच विसर पडला.   सध्याच्या महापौरांनी भाईंच्या जयंती दिनात खूप आश्‍वासने दिली, पण सगळेच पालथ्या घडावर पाणी. अर्बन बँक सभागृहात दरवर्षी आम्ही जयंती-पुण्यतिथी कार्यक्रम करायचो तेव्हा दिलीप गांधी चेअरमन होते; पण सेवक-अधिकारी काही मोठ्या खुशीने सहभागी होत नसत. १६ हौसिंग सोसायटी गृहनिर्माण संस्था भाईंनी उभ्या केल्या. त्या कर्मचार्‍यांना सोसायटीवर भाईंच्या नावाचा फलक लावावत. बँक सावेडी शाखेला नवनीत नगर शाखा म्हणावे पण, स्व. घैसास  सरांनी नगर भूषण कार्यक्रमात सावेडी शाखा नामांतर आणि सावेडी नामंतरासाठी घोषणा केली होती. आर्किटेक्ट अशोक काळे यांनी नगर भूषण पुरस्कार आणि नवनीत नगरसाठी १०० फलक देण्याची जबाबदारी घेतली.  पण कोरोना संकट आडवे आले. अशोक काळे यांना जे करावे वाटले ती जाणीव भाईंचे असंख्य  उपकार असणार्‍यांना वाटत नाही; हे शहराचे दुर्दैवच. किमान भाईंनी जे बाळासाहेब देशपांडे दवाखाना, उद्याने, जलतरण तलाव, वाडिया पार्क क्रिडांगण तालमी, मंगल कार्यालये, दवाखाने, हाडको, सिद्धार्थनगर  वसाहत, मुळेचे पाणी अगदी अमरधाम असे जे प्रकल्प आहेत ते जपणे तर दूर पण त्यावरील कोनशिला  सुद्धा  आमच्या राजकारण्यांनी नीट ठेवल्या नाहीत. या कृतघ्न नेत्यांना आता नगरकरांनी धडा शिकवावा, असे आवाहन मेहता यांनी उद्विग्नपणे केले आहे. साधे भाईंचे तैलचित्र, फोटो पालिकेत नाही, स्मारक किंवा पुतळा तर विचारच नको.

     आता कोरोना संकट थांबले नगर भूषण पुरस्कार भाईंच्या प्रकल्प वा फलक नवनीत नगरची अंमलबजावणी आणि जन्मशताब्दी भाईंचा कार्यक्रम यांची तयारी नवनीत विचार मंच ने सुरू केली असून, नवनीत भाईंबद्दल कृतज्ञता असणार्‍या सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन सुधीर मेहता यांनी केले आहे. संस्था कार्यकर्ते नगरकरांनी आपल्या सूचना, विचार लिहून, आठवणीतील फोटो   पुस्तक ग्रंथासाठी पाठवण्याची विनंती सुधीर मेहता यांनी केली. संपकासाठी  मोबाईल ९२८४६४०४७७वर संपर्क साधावा.

     या शहरात माणसांची किंमतच नाहीय, कामाची कुणालाच जाणीव नाहीय, भाईंच्या नगरभूषण नवनीत या  दै. लोकायुग पुढाकाराने झालेल्या कार्यक्रमास ना. वळसे पा., ना. ना. स. फरांदे सर,  बाळासाहेब थोरात, आणि जिल्ह्यातील सर्व मान्यवर नेते होते. केंद्रात मंत्री असलेल्या बाळासाहेब विखे यांना जमले नाही तर ते दुसर्‍या दिवशी आले अन् घरी जाऊन सत्कार केला. ते आले म्हणून स्वतंत्र नगर विकास कार्यक्रम शहर बँकेत केला होता जिल्ह्यातील पुढारी अन् आमचे काही अपवाद वगळता इतर कावळ्यांना मात्र कसलीही जाणीव नाही. संवेदना हरवल्याप्रमानेच सगळ्यांचं वागणे आहे. लातूरला रेल्वेने पाणी न्यावे लागले. आपण भाईंच्या कर्तृत्वामुळे मुळेचे पाणी पितोय,  ड्रेनेज योजना झाली. आज सावेडीची ड्रेनेज योजना किंवा उड्डाणपूल मार्गी लागत नाही. मात्र आता नुसत्याच टिमक्या वाजवणार्‍या पुढार्‍यांना वेगळीच करवत चालवावी लागणार आहे आणि सर्व मार्गाने नवनीत विचार मंच  भाईसारख्या लोकोत्तर विकास पुरुषाची अपेक्षा करणार असेल तर, या कृतघ्न मनपा आणि या  पुढार्‍यांना वठणीवर कसे आणायचे हे आपल्याला चांगले समजते अशा शब्दात सुधीर मेहता यांनी सर्वांना इशारा दिला आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महिलांच्या कर्तुत्वाला गुरुकुलमध्ये वाव संजय कळमकर यांचे प्रतिपादन.     

वेब टीम नगर : गुरुकुल मंडळ महिलांच्या कर्तुत्वाला वाव देईल .बँकेच्या अर्थकारणात महिला महत्त्वाची भूमिका बजावू शकतात . असे प्रतिपादन शिक्षक समितीचे सांस्कृतिक समितीचे राज्याध्यक्ष संजय कळमकर यांनी केले . नगर तालुका शिक्षक समिती, गुरुकुल मंडळ ,सांस्कृतिक समिती, महिला आघाडी या शाखांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते . यावेळी राज्य उपाध्यक्ष रा .या औटी, संजय धामणे, नितीन काकडे ,सुदर्शन शिंदे भास्कर नरसाळे ,अंकुश बेलोटे, आशाताई फणसे , सुनिता काटकर , राजेंद्र पटेकर 'प्रल्हाद साळुंके, शिवाजी रायकर , अशोक कुटे , आत्माराम धामणे आदी उपस्थित होते .अध्यक्षस्थानी सिताराम सावंत  होते . कळमकर पुढे म्हणाले, गुरुकुलने महिलांचा सन्मान केला . त्यांच्या विचाराचा आदर करुन त्यांना व्यक्त व्हायला संधी दिली .महिला गुणवत्तेच्या बाबतीत नेहमी आग्रही असतात . राजकारणात महिलांच्या जास्तीच्या सहभागाने  संघटना गुणवत्तापुर्ण कार्यक्रमांकडे वळतील . पुढील तीन वर्षासाठी गुरुकुल , समिती व इतर कार्यकारण्या जाहिर करण्यात आल्या . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेंद्र ठाणगे, भिवसेन चत्तर, अंबादास मंडलिक , बाळासाहेब गारगूंड, संजय काळे , जालिंदर खाकाळ, शरद धलपे, दस्तगीर शेख , बबन बनकर , स्वाती गोरे आदिंनी परिश्रम घेतले .                                                                                    

गुरुकुल मंडळामुळे समाजात शिक्षकांचा सन्मान वाढला आहे . शिक्षकांना आश्वासक वाटावे असे गुरुकुल एकमेव मंडळ असल्याचे सांगत केंद्रप्रमुख सुर्यभान काळे , प्रमिला खडके , महादेव गर्जे , राजेंद्र खडके यांनी गुरुकुल मंडळात जाहिर प्रवेश केला .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तमसभज्ञाक, भ्रष्ट व अनागोंदी माजविणार्‍यांना जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी

स्वयंसेवी संघटनांच्या वतीने लोक चित्रगुप्तची नियुक्ती

जयंत येलुलकर व सुहास मुळे ठरले शहरातील पहिले लोक चित्रगुप्त

वेब टीम नगर : समाजातील तमसभज्ञाक, भ्रष्ट व अनागोंदी माजविणार्‍यांना जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने लोक चित्रगुप्तची नियुक्ती करण्यात आली. शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत योगदान देणारे जयंत येलुलकर व सुहास मुळे यांची संघटनांच्या वतीने लोक चित्रगुप्त म्हणून निवड करण्यात आली.

हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकित जयंत येलुलकर लोक चित्रगुप्तचा सन्मान प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड.कारभारी गवळी, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, फरिदा शेख, अंबिका जाधव, लतिका पाडळे, पोपट भोसले, सखूबाई बोरगे, शशीकला गायकवाड आदी उपस्थित होते.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली. लोकशाहीतील निवडणुकांमध्ये धनदांडगे उमेदवार मतदारांना पैसे देऊन आणि जातीचा वापर करून मागच्या दाराने निवडून येतात. तर पुढील पाच वर्षामध्ये जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम करतात. याच कारणामुळे शहरात सर्व रस्ते उखडलेले आहेत, पाण्याच्या टाक्या बांधून अनेक वर्षे झाले तरीही नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. सर्वच भागात नागरी सुविधेचा बोजवारा उडाला आहे. महापालिकेचे अधिकारी अतिक्रमण करणार्‍यांनी संरक्षण देतात. प्रश्‍न घेऊन येणार्‍या नागरिकांची दखल घेतली जात नाही. एकंदरीत रामभरोसे व अनागोंदी कारभार शहरात सुरू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

लोकशाहीतील तमसभज्ञाक तंत्राचा वापर करणार्‍यांना सत्तेतून पायऊतार केला पाहिजे. त्याच वेळेला सत्वभज्ञाक लोकांना निवडून दिले पाहिजे. समाजातील अशा तमसभज्ञाक लोकांचा शोध घेऊन, त्यांचा जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी लोक चित्रगुप्त या पदाची निर्मिती संघटनेने केली आहे. जयंत येलुलकर आणि सुहास मुळे यांना शहराचे पहिले लोक चित्रगुप्त म्हणून संघटनांनी निवड केली आहे. ते तमसभज्ञाक व भ्रष्ट लोकांना जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

तमसभज्ञाक, भ्रष्ट व अनागोंदी माजविणार्‍यांमुळे समाजाचे मोठे नुकसान झाले. गोर-गरीब जनतेची लूट सुरु आहे. विकासाला चालना देऊन, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी तमसभज्ञाक लोकप्रतिनिधी व लोकांना उघडे करण्याची गरज आहे. बायोलॉजिकल बिलीफ इनरिचमेंट तंत्राने लोकांमध्ये असणारी तमसचेतना दूर करता येते आणि त्यांच्या ठिकाणी सत्वचेतना स्थापित करता येते. लोकजागृती व लोकसहभागाने भ्रष्ट, तसमभज्ञाकवृत्ती दूर होऊन चांगले दिवस येऊ शकणार असल्याची भावना अ‍ॅड. गवळी यांनी व्यक्त केली.







Post a Comment

0 Comments