नगर टुडे बुलेटीन 08-01-2021

नगर टुडे बुलेटीन 08-01-2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्ही.आर.डी.ई चे स्थलांतर रद्द होई पर्यत शांत बसणार नाही : दिलीप गांधी यांचे कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाचे आश्वासन

वेब टीम नगर : व्ही.आर.डी.ई मुळे नगरचे नाव संपूर्ण जगात गेले आहे. ही संस्था नगरची शान आहे. हजारो नागरिकांची रोजीरोटी या संस्थेवर अवलंबून आहे. शहरासह पंचक्रोशीतील अनेक गावे व्ही.आर.डी.ई वर अवलंबून आहेत. अशी महत्वपूर्ण संस्था नगर मधून स्थलांतरित होणे हे आपले दुर्दैव आहे. या संस्थेचे स्थलांतर होवू नये यासाठी मी पुढाकार घेणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या कडे तातडीने पत्र व्यवहार करत आहे. व्ही.आर.डी.ई चे स्थलांतर रद्द होई पर्यत शांत बसणार नाही. संस्थेतील कर्मचाऱ्यांनी घाबरून जावू नये, यातून नक्की मार्ग निघेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले.

          व्ही.आर.डी.ई संरक्षण संस्था नगरमधून स्थलांतरित होण्यास स्थगिती मिळावी या मागणीचे निवेदन व्ही.आर.डी.ई मधील विविध कर्मचाऱ्यांच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलीप गांधी यांना देवून या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले. यावेळी कर्मचारी कार्य समितीचे सह सचिव आर.बी. खरमाळे, उपाध्यक्ष व्ही.एम.वायकर, व्ही.आर.डी.ई कामगार युनियनचे अध्यक्ष शंकर पगार, सचिव सलीम अहमद, कीर्तीरथ कुरेशिया, व्ही.आर.डी.ई एसटीए असोशिएशनचे अध्यक्ष पी.जी.पराशर, व्ही.आर.डी.ई अॅडमीन असोशिएशनचे अध्यक्ष आर.एल.स्वामी, ड्रायव्हर असोशिएशनचे अध्यक्ष ई.जी.घोडे आदी उपस्थित होते.

          यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, व्ही.आर.डी.ई संरक्षण संस्थेत भारताच्या सशस्त्र सेनेला लढण्यासाठी लागणारी शास्त्रे, रणगाडे, मिसाईल लॉंचर, बुलेटप्रुफ वाहने, प्रोटोटाईप, ड्रोनइंजिन आदी उपलब्ध करून देते आहे. भारताला आत्मनिर्भर करण्यात व्ही.आर.डी.ईचा मोलाचा वाटा आहे. व्ही.आर.डी.ई मध्ये सध्या वैज्ञानिक, अधिकारी, व कार्माचारी मिळून सुमारे ५०० नागरिक कार्यरत आहेत. तसेच ४०० स्थानिक कर्मचारी कराराने व १०० शिकवू कर्मचारी कार्यरत आहेत. जवळपास १००० कुटुंबांचा उदार्निवाह व्ही.आर.डी.ई च्या माध्यमातून होत आहे. स्थानिक नागरिकांना मोठा रोजगार देणारीही संस्था आहे.

          हजारोंची पोशिंदा असलेली ही संस्था बंद पडणे नगर साठी हानिकारक आहे. औद्दोगिक विकासाला खिळ बसेल, २० ते २५ वर्षापासून येथे सरकारी सेवा देणाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना बेरोजगार व्हावे लागेल. त्यामुळे नगरवासीयांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोनाच्या काळात पत्रकारांचे कार्य मोठेच 

 प्रा.शिरिष मोडक : नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांची ,पत्रकार दिनी संपादक, पत्रकार सेवा संघाच्यावतीने आरोग्य तपासणी


वेब टीम नगर :
पत्रकार दिनानिमित्ताने संपादक, पत्रकार सेवा संघाने भाईसथ्था नाईट स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले. पत्रकार दिनी मुलांची आरोग्य तपासणी करणारा हा नगर जिल्ह्यातील पहिलाच कार्यक्रम आहे. कोरोनाचे संकट आले आणि सर्वजण घायाळ झाले होते. त्याकाळामध्ये पत्रकारांनी मोठे समाजकार्याचे काम केले.आज पत्रकार संघाने विद्यार्थ्यासाठी आरोग्य शिबिर घेतले आरोग्यसेवा हीच ईश्‍वरसेवा असल्याचे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले पत्रकार दिनानिमित्ताने प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघाच्यावतीने पटवर्धन चौक येथील हिंद सेवा मंडळाचे ज्युनिअर कॉलेज भाईसथ्था नाईट स्कूलमध्ये आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक होते. 

यावेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बोरगे, हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा, भाईसथ्था नाईट स्कूलचे अध्यक्ष  डॉ.पारस कोठारी, दंत चिकित्सक डॉ.मंगेश जाधव, शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. प्रशांत शिंदे, नाईट स्कूलचे प्राचार्य सुनिल सुसरे, दैनिक नगर स्वतंत्रचे कार्यकारी संपादक सुभाष मुदळ, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागाचे सचिव मन्सूर शेख, अशोक झोटींग, वेंदात लॅबचे विशाल खेडकर, अरुण पालवे, शुभम पाचारणे, अन्सार सय्यद, प्रशांत शिंदे, शब्बीर सय्यद, राजेंद्र येंडे, समीर मन्यार, उदय जोशी, बाबा ढाकणे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.

यावेळी नाईट स्कूल कमिटीचे अध्यक्ष डॉ.पारस कोठारी यांनी संस्थेचे विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम तसेच नाईट स्कूलमध्ये दिवसभर काम करणार्‍या विद्यार्थी नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थाचे पदाधिकारी नेहमीच प्रयत्नशील असतात असे सांगून त्यांनी नाईट स्कूलचा विकासाचा आलेख मांडला. संपादक, पत्रकार सेवा संघाने मुलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले हा उपक्रम विद्यार्थ्यासाठी फायद्याचा असल्याचे त्यांची सांगितले. संपादक, पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा दै.नगर स्वतंत्रचे संपादक प्रा.सुभाष चिंधे यांनी पत्रकार दिन नेहमी साजरा होतो, यंदा मात्र विद्यार्थ्याचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेे. तसेच संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जात असल्याचे ते म्हणाले. डॉ.अनिल बोरगे यांनी कोरोनाच्या काळात पत्रकारांनी केलेले काम खरच कौतुकास्पद आहे. काळजी घ्या कोविड बरा होतो असे सांगून ते म्हणाले दिवसभर काम करणारे विद्यार्थी रात्र शाळेत शिक्षण घेतात. त्याच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघाने पुढाकार घेतला आहे. महानगरपालिकेच्यावतीने सर्व विद्यार्थ्याची मोफत कोविड चाचणी केली जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले.

हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी पत्रकार विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेतात ही बाब महत्त्चाची असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य सुनिल सुसरे यांनी मानले. दंत चिकित्सक डॉ. मंगेश जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली. रक्तगट तपासणी विशाल खेडकर यांनी केली यावेळी डॉ. प्रशांत शिंदे उपस्थित होते. दरम्यान कोविडमध्ये मृत्यु झालेल्यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सावता परिषद अहमदनगर शहर जिल्ह्याच्या वतीने प्रा.माणिक विधाते यांचा सत्कार                                                                                                 
             

वेब टीम नगर : सावता परिषद अहमदनगर शहर जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त व सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, प्रदेश महासचिव मयुरराजे वैद्य, प्रदेशाध्यक्षा मनिषाताई सोनमाळी, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी यांच्या मार्गदर्शनाने सत्कार करताना सावता परिषदेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गणेश बनकर समवेत शहर अध्यक्ष नितीन डागवाले, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम लोंढे, सरचिटणीस गुलाब गायकवाड, पारनेर तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, उपाध्यक्ष पृथ्वीराज कोल्हे, श्रीकांत देडगे, तालुका अध्यक्ष युवक आघाडी संदीप गाडीलकर आदीसह सावता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष गणेश बनकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा.माणिक विधाते हे जिल्ह्याचे भूषण आहे तर ते नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात व आम्हाला सामाजिक कार्यात मोलाची मदत करतात समाजातील नेतेमंडळी हे समाजाचे आधारस्तंभ आहेत व येणाऱ्या काळात त्यांच्या हातून असेच समाजसेवेचे कार्य घडो असे त्यांनी शुभेच्छा दिल्या.  सत्काराला उत्तर देत प्रा.माणिक विधाते पण आली सावता परिषदेचे काम अहमदनगर शहरात आणि जिल्ह्यात नेहमी अग्रेसर असते तरुण युवक आपापले उद्योग व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्यात योगदान देत आहे ही आपल्या समाजासाठी अभिमानाची बाब आहे मी सामाजिक कार्य नेहमी आपल्या सोबत राहणार असल्याचे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इंदिरानगरच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळ उपलब्ध करुन देण्याची मागणी

आरपीआयचा कॅन्टोमेंट कार्यालयावर मोर्चा : रिकामे हांडे घेऊन महिलांचा पाण्यासाठी आक्रोश

वेब टीम नगर : भिंगार येथील इंदिरानगर भागात राहणार्‍या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळाची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी कॅन्टोमेंट कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पाणी देता का? पाणी! च्या घोषणा देत महिला रिकामे हांडे घेऊन, तर  स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

 आरपीआयचे शहराध्यक्ष अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात महादेव भिंगारदिवे, विशाल साबळे, अनिकेत मोहिते, अमोल शिंदे, संदीप ससाणे, शंकर करंडे, सुनील वाघमारे, गणेश लोखंडे, रोहित गवळी, वैभव उमाप, रोहित साळवे, शुभम काकडे, वैभव साठे, संगीता साबळे, सुनिता उमाप, संगीता कांबळे, लीला आवरे, शकुंतला भारस्कर, सुमन गाडे, सुशीला वैरागर, सुमन अल्हाट, स्मिता साळवे, शोभा मोहिते, नंदा रॉय, गीता वाघमारे, मोना वैराळ आदि नागरिकांनी सहभाग नोंदवला.

इंदिरानगर येथे मोठी लोकवस्ती असून, अनेक नागरिक वास्तव्यास आहे. या भागात सार्वजनिक नळ नाही. तेथे आधीचा असलेला जुना नळ बर्‍याच वर्षांपासून बंद आहे. तेथील महिला व लहान मुले पाण्यासाठी लांब पायपीट करतात. पिण्याचे पाणी नसल्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच मिळेल तेथून पाणी आनत असल्याने दुषित पाण्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथील महिला दिवसा मोल मजुरी करुन रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी मोठे हांडे, ड्रम घेऊन लांबवरून पाणी घेऊन येतात. पाणी घेऊन येत असताना लहान-मोठे अपघातही घडत आहे. तसेच काही वेळा दारुड्या इसमांकडून महिलांची छेड काढली जाते. रोजच पाण्यासाठी जायचं असत या कारणाने महीला तक्रार करत नाही. तसेच चार दिवसांपूर्वी बेलेश्‍वर जवळ एक इसमाने  फाशी घेतली आहे. तेथेच महीला पाण्यासाठी जातात अशा ठिकाणी एखाद्या महिलेवर अतिप्रसंग झाल्यास याला जबाबदार कोण असणार? असल्याचा प्रश्‍न आंदोलकांनी उपस्थित केला.

इंदिरानगर ही मागासवर्गीय लोकांची झोपडपट्टी असल्याने एक वर्षापासून निवेदन देऊन सुध्दा जाणीवपुर्वक त्यांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सार्वजनिक नळ दिले जात नसल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. सदर मागणीसाठी दहा महिन्यांपूर्वी निवेदन देऊन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच सातत्याने स्थानिक नागरिकांचा या प्रश्‍नासाठी पाठपुरावा सुरु आहे. तरी देखील या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही. मुलभूत सोयी-सुविधा नागरिकांना पुरविणे हे कॅन्टोमेंट कार्यालयाचे प्रथम कर्तव्य असून, तातडीने इंदिरानगर भागात राहणार्‍या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रश्‍न येत्या पंधरा दिवसात न सुटल्यास  कॅन्टोमेंट कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी उमेश डावखर व उपाध्यक्षपदी अजय लखापती यांची निवड.                                         

  वेब टीम नगर : जिल्ह्यातील पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या ५ जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर या कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक के के आव्हाड  अध्यासी अधिकारी यांचे  अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये संस्थेच्या चेअरमनपदा साठी सत्ताधारी गटाकडून उमेश डावखर यांच्यावतीने सुचक नवनाथ घोंगडे व अनुमोदक शिवाजी तोरणे यांनी अर्ज सादर केला व व्हाईस चेअरमन पदासाठी अजय लखापती यांच्यावतीने सुचक दीपक वाळके व अनुमोदक शहराम चेमटे यांनी अर्ज सादर केले तसेच विरोधी गटाकडून अध्यक्ष पदासाठी राजु परदेशी यांच्यावतीने सूचक दत्तात्रेय गडाख व अनुमोदक गणेश बोबडे यांनी अर्ज सादर केला तर उपाध्यक्ष पदासाठी विजया शिंदे यांच्यावतीने सूचक संजय गायके व अनुमोदक सिताराम गागरे यांनी अर्ज सादर केले अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवडीसाठी गुप्त मतदान पद्धतीने २१ संचालकांनी मतदान केले अध्यक्ष  पदासाठी उमेश डावखर व उपाध्यक्ष  पदासाठी अजय लखापती यांना १५ मते मिळाली तर विरोधी गटाचे उमेदवार यांना सहा मते मिळाली अध्यासी अधिकारी यांनी अध्यक्ष  पदासाठी उमेश डावखर व उपाध्यक्ष पदासाठी अजय लखापती यांची नावे विजयी म्हणून घोषित केली  नूतन अध्यक्ष ,उपाध्यक्ष यांचे संचालक मंडळ सभासद बंधू-भगिनी कडून व मित्र मंडळ यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला संस्थेच्या व सभासद हिताचे काम करण्यास कटिबद्ध असल्याचेअध्यक्ष ,उपाध्यक्ष   यांनी सांगितले यावेळी संस्थेचे मावळते अध्यक्ष शांताराम आवारी, उपाध्यक्ष दीपक वाळके, सत्ताधारी गटाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी अध्यक्ष  त्रिंबक राऊत, नारायण तमनर, नवनाथ घोंगडे, शहाराम चेमटे, शिवाजी तोरणे, चंद्रकांत पडोळे, अभिमन्यू घोलवाड, राधाकिसन आभाळे, यादव उदागे, नामदेव बोरुडे, ललित पवार, सौ.प्रियंका मिसाळ, सिताराम गागरे, संजय गायके, गणेश बोबडे, दत्तात्रय गडाख, तज्ञ संचालक दत्तात्रेय वाघुले, भाऊसाहेब शेळके व अध्यासी अधिकारी यांना मदत म्हणून उपमुख्यकार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर हळगावकर यांनी कामकाज पाहिले  याप्रसंगी संस्थेचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एडीसीसी बँक संगमनेर शाखेतील 'त्या' भांडखोर व कामचुकार कर्मचाऱ्याचे निलंबन करावे

चर्मकार विकास संघाची मागणी : जिल्हा पोलीस अधिक्षक, एडीसीसी बँक मुख्य शाखेच्या एमडीना निवेदन

वेब टीम नगर : एडीसीसी (जिल्हा) बँक संगमनेर शाखेतील मगरुर, भांडखोर व कामचुकार कर्मचाऱ्यास निलंबीत करुन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, एडीसीसी बँक मुख्य शाखेचे एमडी रावसाहेब वर्पे व मॅनेजर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. अन्यथा बँकेच्या मुख्य शाखे समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधिक्षकांनी संबंधित पोलीस अधिकारी यांना चौकशी करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले. तर एडीसीसी बँकेचे एमडी वर्पे यांनी सदर कर्मचार्‍याची शंभर कि.मी. च्या अंतरावर मुख्यालयाच्या हद्दीत बदलीचे आदेश काढले आहे. मात्र चर्मकार विकास संघाने सुभाष शिंगोटे या कर्मचार्‍याच्या निलंबनाची मागणी लावून धरली आहे.  

चर्मकार विकास संघाचे जेष्ठनेते कारभारी देव्हारे दि.४जानेवारी रोजी एडीसीसी बँकेच्या संगमनेर शाखेत गेले असताना चेक दिल्यावर चेक पास होऊन कॅशिअर असलेले सुभाष शिंगोंटे यांच्याकडे आले. थांबलेल्या व्यक्तीला पैसे न देता शिंगोटे यांनी वेळकाढूपणा करुन त्यांना थांबवून ठेवले. बराच वेळ झाल्याने देव्हारे यांनी शिंगोंटे यांना पैसे मिळावे म्हणुन विनंती केली असता, शिंगोटे याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत त्यांना दमबाजी केली. हा प्रकार सर्व बँक कर्मचारींनी पाहिला. मात्र कोणीही शिंगोटे याला आवरण्याची हिंमत केली नाही. सदर कर्मचार्‍याची बँकेत मोठी दहशत असून, तो बँकेत येणार्‍या महिला, ज्येष्ठ नागरिकांशी उध्दटपणे वागत असतो. अनेकदा शिंगोंटेचा ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असून, तो दारु पिऊन देखील बँकेत येत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. सदर कर्मचारी हा मगरुर, भांडखोर व कामचुकार असून, त्याचा सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने या कर्मचारीवर निलंबीत करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हा परिषदेच्यावतीने वाटण्यात आलेल्या अर्सेनिक गोळ्यांची चौकशी व्हावी

शिवराष्ट्र सेनेच्यावतीने उपोषणाचा इशारा

   वेब टीम नगर : जिल्हा परिषदेमार्फत अर्सेनिक गोळ्यांच्या वाटपात निकृष्ट गोळ्यांची चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना शिवराष्ट्र सेनेच्यावतीने देण्यात आले. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर, भैरवनाथ खंडागळे, माजी सरपंच राधाकिसन कुलट, बाबासाहेब करपे, विजय पितळे आदि उपस्थित होते.

     जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात पुणे येथील कंपनीने निविदा भरुन त्यास वर्कऑर्डर देऊन महानगरपालिका हद्दी वगळून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना अर्सेनिक गोळ्याचे वाटप होणे गरजेचे होते. परंतु काही भागात या गोळ्या पोहच झाल्या नाहीत व जेथे पोहच केल्या त्या ठिकाणी त्या निकृष्ट दर्जाच्या होत्या. कोरोना सारख्या महामारीत नागरिकांना उपयुक्त अशा रोगप्रतिकार शक्ती वाढविणार्‍या गोळ्या शहरी व ग्रामीण भागात लोकांनी अक्षरश: जादा पैसे देऊन घेतल्या. गोळ्या अभावी अनेकांना कोरोनाची लागण होऊन हॉस्पिटलचे लाखो रुपयांचे बील भरावे लागले. शासनाने या गोळ्या सर्वसामान्य नागरिकांना मोफत दिल्या परंतु प्रशासकीय उदासिनतेमुळे या गोळ्यांचे पाणी झाले. त्यामुळे सुमारे ३८लाख ४१ हजार ९९५ लोकांनापर्यंत या गोळ्या पोहचल्या नाहीत. कोट्यावधी रुपयांच्या या गोळ्या विकत घेऊनही जनतेला याचा काहीही उपयोग झाला नाही. ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती, त्यांची चौकशी करुन हालगर्जीपणा करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आपल्या दालनासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे शिवराष्ट्र सेनेच्यावतीने देण्यात आला आहे.

     याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत संबंधितांची चौकशी करुन यात जे दोषी असतील, त्यांच्यावर  कारवाई करु, असे आश्‍वासन दिले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रोटरी क्लब अहमदनगर इंटेग्रिटीच्यावतीने प्रगत विद्यालयास खुर्च्या प्रदान

     वेब टीम नगर : गांधी मैदान  येथील दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीच्या वतीने डिजिटल रूम करण्याकरता रोटरी क्लबच्यावतीने वीस खुर्च्या प्रदान करण्यात आल्या. रोटरी क्लबचे अध्यक्ष रफिक मुन्शी, संस्थेचे सेक्रेटरी सुनील रुणवाल, रोटरी क्लबचे सचिव सुयोग झंवर, प्रो.चेअरमन डॉ.आसाराम खाडे, डॉ.रिजवान शेख, जावेद शेख, कर्मयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शफी जहागिरदार मार्कंडेय विद्यालयाचे सचिव प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम, प्राचार्य सुनिल पंडित आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी रफिक मुन्शी म्हणाले, प्रगत विद्यालयाने अल्पावधीत शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी गरुड भरारी घेतली असून विद्यालयामध्ये दोन  संगणकाच्या अद्यावत लॅब असून आता विद्यालयमध्ये डिजिटल हॉलची निर्मिती करण्यात येत असल्याने ही रोटरी क्लब कडून अल्पशी भेट देण्यात येत असल्याचे मुन्शी यांनी सांगितले.

      यावेळी संस्थेचे सेक्रेटरी सुनील रुणवाल यांनी संस्था व सर्व शैक्षणिक बाबीचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडीत यांनी केले तर सूत्रसंचालन दिलीप रोकडे यांनी केले. शेवटी आभार प्रा. गौतम कराळे यांनी मानले यावेळी विद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारवृंद उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी खोमणे या राज्यस्तरीय कर्तुत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित

    वेब टीम  नगर : मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या कादंबरी रमेश खोमणे यांना राज्यस्तरीय ‘कर्तुत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कान नगर येथे पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी विशाल लाहोटी, मंजुषा खोमणे, आरजे शर्वरी आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी संदिप मिटके म्हणाले, आपण करत असलेल्या कामातून समाजासाठी योगदान दिले पाहिजे. समाजातील गरजू लोकांसाठी काम केले पाहिजे. आपण करत असलेल्या कामाची दखल ही घेतली जातेच. सौ.कादंबरी खोमणे यांनी केलेले कार्य महिलांसाठी प्रेरणादायी असेच आहे, असे सांगून शुभेच्छा दिल्या.

 कादंबरी खोमणे या वास्तूतज्ञ असून, विविध उपक्रमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ऋषितुल्य व्यक्तीमत्व अरुणराव धर्माधिकारी यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी 

डॉ.रवींद्र साताळकर : जनकल्याण रक्तपेढीस ८१ हजाराची देणगी

वेब टीम नगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास असलेले जेष्ठ स्वयंसेवक अरुणराव धर्माधिकारी यांनी संघाच्या कार्यात झोकून देवून मोठे कार्य केले आहे. नगर मधील प्रत्तेक स्वयंसेवकाचा परिचय असलेले धर्माधिकारी यांनी जनकल्याण रक्तपेढीला स्थापने पासून मार्गदर्शन केले आहे. अशा ऋषितुल्य व्यक्तीमत्वाने आदर्शवत पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला आहे. सामाजिक दृतीकोन ठेवत वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणा सर्वांनी त्यांच्या पासून घ्यावी, असे आवाहन जनकल्याण समितीचे राज्याचे अध्यक्ष डॉ.रवींद्र साताळकर यांनी केले.

          राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक अरुणराव धर्माधिकारी यांनी आपल्या ८१व्या वाढदिवसा निमित्त जनकल्याण रक्तपेढीला ८१ हजार रुपयांची देणगी अद्यावत मशिनरी घेण्यासाठी दिली. यावेळी जनकल्याण समितीचे राज्याचे अध्यक्ष डॉ.रवींद्र साताळकर, जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष राजेश झंवर, कार्यवाह डॉ.उत्तम शिंदे, रा.स्व.संघाचे शहर संघचालक शांतीलाल चंदे, संचालक प्रमोद सोनटक्के, सौ.उषा धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

          अरुणराव धर्माधिकारी म्हणाले, आपल्या भारत देशाला परम वैभव प्राप्त करून देणाऱ्या रा.स्व.संघाच्या देवदुर्लभ कार्यात मी सुरवातीपासून सक्रीय काम केले. समाजाच्या तळागाळा पर्यत सेवा कार्य केले. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत जनकल्याण रक्तपेढी उभी राहिली आहे. आज रक्तपेढीच्या माध्यमातून नामांकित सेवा कार्य चालू आहे. या सेवा कार्यात मी माझे समर्पण दिले आहे.    

यावेळी बोलतांना राजेश झंवर म्हणाले, आजच्या काळात वाढदिवस साजरा करण्याची पद्धत पाश्चिमात्य झाली आहे. भारतीय संस्कृतीला साजेश्या पद्धतीने अरुणराव धर्माधिकारी यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे. संघाचे आदर्श स्वयंसेवक म्हणून काम केल्या नंतर त्यांनी एक आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. जनकल्याण रक्तपेढीला त्यांनी केलेल्या मदती बद्दल आभार.

प्रास्ताविकात डॉ.उत्तम शिंदे यांनी अरुणराव धर्माधिकारी यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून परिचय करून दिला. संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करतांना नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या अरुणराव धर्माधिकारी यांच्या पासून प्रेरणा घेत जिल्ह्यात काम केले, असे सांगितले.

कार्याक्रमचे सुत्रसंचलन डॉ. विलास मढीकर यांनी केले. आभार राजेश परदेशी यांनी मानले. यावेळी डॉ. अरुण कुलकर्णी, अंजली कुलकर्णी, जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक मुकेश साठ्ठे, प्रकाश स्मार्त आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत सावता माळी युवक संघाचे काम समाजाभिमुख

डॉ.सुदर्शन गोरे : श्री संत सावता माळी युवक संघाच्या नगर शहर अध्यक्षपदी कमलेश जंजाळे

    वेब टीम  नगर : समाजात काम करतांना एखाद्या संघटनेचे पाठबळ असल्यास कामात सुसूत्रता येऊन. प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होते. श्री संत सावता माळी युवक संघाच्या माध्यमातून सुरु असलेले समाजाभिमुख काम हे दिशादर्शक आहे. संघाच्या चांगल्या कामामुळे अनेक लोक यामध्ये जोडले जात आहेत. नूतन पदाधिकारी कमलेश जंजाळे हे सामाजिक कार्यात घेत असलेला पुढाकार पाहता त्यांची नगर शहराध्यक्ष या पदावर झालेली नियुक्ती योग्य असून, पदाच्या माध्यमातून ते चांगले काम करुन संघाच्या कार्यात योगदान देतील, असे प्रतिपादन डॉ.सुदर्शन गोरे यांनी केले.

     श्री संत सावता माळी युवक संघाच्या नगर शहर अध्यक्षपदी कमलेश जंजाळे यांची नियुक्ती करुन जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. याप्रसंगी डॉ.सुदर्शन गोरे, श्रीकांत आंबेकर, भारत जाधव, अवधूत फुलसौंदर, अक्षय गाडळकर, विकी कानडे, गणपत चेडे, मंदार लोखंडे, ओंकार फुलसौंदर, अक्षय चेडे, ओंकार लेंडकर आदि उपस्थित होते.

     जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे म्हणाले, समाजातील वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने सुरु आहे. युवक, महिला, विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांसाठी श्री संत सावता माळी युवक संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांसाठी अनेकांचे सहकार्य मिळत असते. संघटनेच्या कार्यात युवकांचा सहभाग असावा, त्यांच्या कार्याला दिशा मिळावी यासाठी कमलेश जंजाळे यांची संघाच्या नगर शहराध्यक्षपदी निवड केली आहे. या पदाच्या माध्यमातून संघाचे काम वाढवतील, असे सांगून शुभेच्छा दिल्या.

     निवडीनंतर कमलेश जंजाळे म्हणाले, सामाजिक कार्यात आपण सक्रिय होतोच, आता श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने आपली नगर शहराध्यक्ष पदाची जी जबाबदारी सोपवली आहे; ती सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू. संघाचे काम नगर शहरात वाढून समाजातील प्रश्‍नांसाठी पुढाकार घेऊ, असे सांगितले.

     या निवडीबद्दल राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, प्रदेश प्रवक्ता अजिंक्य फुले, कार्याध्यक्ष कैलास शिंदे, प्रदेश सोशल मिडिया प्रमुख दिपक साखरे, सुनिल शिंदे आदिंनी अभिनंदन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अमिन धाराणी आयोजित ‘एक  शाम रफी के नाम’कार्यक्रमास प्रतिसाद

तुम मुझे यूं भुलाना पाओगे.... रफी यांना आदरांजली

    वेब टीम नगर : मोहमंद रफी यांच्या जयंतीनिमित्त अमिन धाराणी आयोजित म्युझिकल स्टार्स फेसबुक पेज च्या माध्यमातून  रहेमत सुलतान सभागृह येथे ‘एक शाम रफी के नाम’ या मोहमंद रफी यांच्या सुरेल गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुरुवातीला गुलशन धाराणी यांनी मोहंमद रफी यांनी गायलेल्या ‘आदमी मुसाफिर है’ या गीताने महान गायक मोहंमद रफी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

     यानंतर सुभाष पोटोळे यांनी ‘ तेरी आँखों के सीवा..’ हे गीत सादर करुन सभागृहाची वाह ऽ वाह सुरुवातीस मिळवून कार्यक्रमास रंग भरण्यास सुरुवात केली. यानंतर सुनिल भंडारी यांनी ‘कोई नजराना ले के आया हूं मै...’ हे गाणे सादर केले. त्यानंतर समीर खान यांनी ‘पर्दा है पर्दा..’ या कव्वालीने सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडा निर्माण झाला. यानंतर  अमिन धाराणी यांनी ‘दर्द दे दिल दर्दे जिगर...’ हे गीत सादर करुन सभागृहात गांभीर्य निर्माण केले.

     यानंतर दर्दभरे गीत सादर करण्यासाठी प्रसिद्ध असणारे किरण उजागरे यांनी ‘चाहुंगा मै तुझे.., ओ मेरी महेबुबा..’ तर अमिन धाराणी यांनी यानंतर ‘मस्त बहारों का मै आशिक..., चले थे साथ मिलकर ...’ हे गीत सादर करुन सभागृहास युवा काळची आठवणींना उजाळा दिला.

     यानंतर अ‍ॅड.गुलशन धाराणी यांनी ‘दिवाने है.. दिवानों को नजर चाहियें..., कितना प्यारा वादा...’ हे प्रफुल्लीत गीत समीर खान व सुभाष पाटोळे यांच्यासह द्वंदगीत सादर केले. तर निता माने यांनी ‘युंही तुम मुझसे बात करती हो.., ‘वादा करले साजना...’ हे गीत किरण उजागरे व समीर खान यांच्याबरोबर सादर करुन सभागृहात हलचल निर्माण केली. यानंतर अमिन धाराणी यांनी ‘आते जाते हुऐ मै...’ हे गीत सादर करुन सभागृहास नाचविले.

     गायक दिनेश यांनी ‘ याद ना जाये ....’ हे गीत सादर करुन रसिकांची वाह ऽ वा! मिळविली.

     आबीद दुलेखान यांनी शेरशायरीने सूत्रसंचालनातून रसिकांना बांधून ठेवले.  कार्यक्रमास संगीतप्रेमी व मोहंमद रफी यांचे चाहते रसिकांचा मोठया संख्येने उपस्थित होते. आजपर्यंत झालेल्या विविध ऑनलाईनच्या माध्यमातील कार्यक्रमास ५ हजार ते ३३ हजार लोकांनी कार्यक्रम पाहिला आहे.-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना संसर्गाच्या संकटकाळात सेवाभावी काम करणाऱ्या  नगर जिल्ह्यातील सेवाकार्याचा राज्यपालांकडून गौरव

वेब टीम नगर : कोरोना संसर्गाच्या संकटकाळात विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी  केलेल्या पथदर्शी कामाचा गौरव आज शुक्रवार दिनांक ८ जानेवारी रोजी केशवसृष्टी  ट्रस्ट  (मुंबई)तर्फे होत आहे. मुंबईतील  राजभवन येथे  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील ‘मिशन राहत’ उपक्रमाचा होणारा गौरव उपक्रमाचे संयोजक  अजित बाळासाहेब कुलकर्णी स्वीकारणार आहेत. स्नेहालय परिवारातर्फे अनिल गावडे ,राजीव गुजर आणि अनिता  अजित माने यांनी ही माहिती दिली

या निमित्ताने  कोवीड संसर्ग कालखंडात  सेवारत  अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय ,अशासकीय व्यक्ती ,संस्था आणि कार्यकर्ते , दाते यांचा सन्मान होत आहे. "प्रातिनिधीक स्वरूपात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संस्था आणि कार्यकर्त्यातर्फे आपण हा सन्मान स्वीकारत असल्याचे", अजित कुलकर्णी यांनी नमूद केले.

"मिशन राहत" ची प्रेरणा

 या संदर्भात मिशन राहत उपक्रमाचे संस्थापक सदस्य श्याम  आसावा यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यात स्नेहालय परिवारातील अनाम प्रेम, महामानव बाबा आमटे संस्था (श्रीगोंदे), स्नेहप्रेम (कर्जत), उचल फाउंडेशन (शेवगाव), डॉ.शंकर आडकर ट्रस्ट , अण्णाजी हजारे जनआंदोलन, आदी संस्थांनी  अखंड कार्य केले. या शिवाय घर घर लंगर ,जनकल्याण समिती, यांसारख्या ५३ सामाजिक संस्था तसेच जैन-शीख-माहेष्वरी-मुस्लिम-ख्रिश्चन आदी सर्व जाती आणि धर्म समुहातील मानवतावादी विचारांचे लोक साऱ्या कृत्रिम भेदाना ओलांडून या काळात वंचितांना सेवा देत होते. मिशन राहत , अशा सर्व प्रयत्नांना  एका माळेत गुंफणारा धागा होता.

या उपक्रमाचे मार्गदर्शक संजय गुगळे म्हणाले की, मिशन राहत ने दिव्यांग आणि त्यांचे परीवार, झोपडपट्ट्या, लालबत्ती  विभाग,फासे पारधी आणि इतर भटके-दलित-आदिवासी समूह, हातावर पोट भरणारे कष्टकरी,या समूहाला जेवण,किराणा,औषधे, रोजगाराची नवी साधने आणि प्रशिक्षण, शिक्षणाच्या नव्या वाटा आणि साधने लोकसहभागातून अखंड पुरवली.

शासन यंत्रणेशी समन्वय ठेवून  उत्तर आणि पूर्व भारतातील हजारो श्रमिकांना घरवापसी साठी मदत केली. हनीफ शेख यांनी नमूद केले की, रोटरी क्लब सोबत स्नेहालय परिवाराने चालविलेले कोवीड सेंटर मुळे १६०० कोवीड बाधितांचे निःशुल्क उपचार केले. स्नेहालय येथील केरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल येथे नगर मधील सर्वात स्वस्त उपचार उपलब्ध होते. ३ हजार कष्टकरी कुटुंबांना दिलेले प्रत्येकी ५ हजार रुपये आणि मागील महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील ११०० वेश्या महिलांना नवजीवन मिळवण्यासाठी मिळालेले प्रत्येकी १५ हजार यांचा कोविड संकटातून उभे राहताना वंचितांना उपयोग झाला, होत आहे. प्रवीण मूत्याल यांनी सांगितले,की या  काळात निर्माण झालेल्या बाल विवाह,कौटुंबिक अत्याचार, अनैतिक मानवी वाहतूक अशा समस्या मिशन राहत समूहातील प्रकल्पांनी सक्षम पणे हाताळल्या. देश आणि समाज संकटात असताना सारे क्षुद्र विषय ,भेदाभेद बाजूस ठेवून  संघटीत आणि समर्पित काम झाले. सुमारे १२ लाख लोकांना मिशन राहत उपक्रमाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ झाल्याचे सह समन्वयक शबाना शेख म्हणाल्या.

मिशन राहत राबविताना सतत सर्वांशी संवाद राखून ,कामातील एकोपा,देशसे वेची  प्रेरणा आणि पारदर्शकता  अजित यांनी टिकवली. त्यामुळे मिशन राहत परिवाराने एकमताने अजित कुलकर्णी यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडल्याचे फारूक बेग यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments