बोठेला लपवण्या मागे एखाद्या मंत्र्याची ताकद तर नाही ना ? : रुणाल जरे

बोठेला लपवण्या मागे एखाद्या मंत्र्याची ताकद तर नाही ना ? : रुणाल जरे 

वेब टीम नगर : रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ  बोठे सापडत नसल्याने ता प्रकरणाची चौकशी रेंगाळत असून बोठेला पोलिसांपासून लपवण्यात एखाद्या मंत्र्याने  तर ताकद लावली  नाही ना? अशी शंका रेखा जरे यांच्या मुलानेच उपस्थित केली आहे.  

रुणाल जरे याने याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना जरे कुटुंबियांचे वकील सचिन पटेकर यांच्यामार्फत निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, गुन्हा घडल्यापासून बोठे हा चतुर व सूड बुद्धीचा वापर करून पसार झालेला आहे. त्याला अद्यापपावेतो  अटक झालेली नाही. तसेच त्याचा ठावठिकाणाही पोलिसांना सापडलेला नाही. हे प्रकरण राज्यभरात गाजत असताना त्याला कसा तरी  गो-बाय देण्याचा प्रयत्न होत असल्याचे जाणवत आहे. बोठे याचा इतिहास पाहिला असता त्याला शासकीय वरदहस्त आहे का?, त्यातून पोलिस यंत्रणेवर दबाव येतोय का?, पोलिस यंत्रणा गोंधळली आहे का?, पोलिसातले काही अधिकारी बोठेला मदत करत आहे का? असे विविध प्रश्न चर्चिले गेले आहेत. मात्र दुर्दैवाने  त्याचे उत्तर आतापर्यंत मिळू शकलेले नाही. याचा अर्थ असा की, मास्टरमाईंड बोठेने स्वतःच्याच नियंत्रणात सगळी परिस्थिती ठेवल्याचे चित्र निर्माण होत आहे.

 गेल्या काही दिवसांपासून नागरिक स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवत आहेत. जे त्याच्या भीतीपोटी समोर येण्यास तयार नव्हते, ते आज धाडस करून समोर येण्यास तयार झाले आहेत. बोठे याचा मोबाईल तपासामध्ये जप्त करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये असणारे कॉल डिटेल्स मुख्य पुरावा ठरणार आहे. तसेच पोलिसांनी फिर्यादीला संरक्षण दिलेले असले तरी यापुढे जर बोठे सापडला नाही तर, पोलिस संरक्षणात जरे कुटुंबीय किती दिवस भीतीच्या वातावरणात जगणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. १६ डिसेंबर रोजी बोठेचा अटकपूर्व जामीन रद्द झाला आहे. परंतु अद्यापही तो उच्च न्यायालयात गेलेला नाही. याचा अर्थ त्याच्याकडून खूप मोठे काहीतरी घडवण्याचे नियोजन आहे. ३० ३२ दिवसांचा कालावधी उलटून गेलेला आहे तरीही बोठे सापडत नसेल तर संशय घेण्यात सहाजिक्च वाव आहे . असे या निवेदनात म्हंटले आहे  

Post a Comment

0 Comments