नगरटुडे बुलेटीन ०१-०१-२०२१

 नगरटुडे  बुलेटीन ०१-०१-२०२१ 

नेहरू पुतळ्या भोवती उभारण्यात आलेले होर्डिंग्ज "तुम्ही हटवता, की आम्ही हटवू"

 विद्यार्थी काँग्रेस आक्रमक : काँग्रेसजनांच्या भावना दुखावल्याचा आरोप, दिला सात दिवसांचा अल्टिमेटम

वेब टीम नगर : पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लालटाकी येथील पुतळ्याला पूर्णतः झाकून टाकणारे होर्डिंग्ज 'तुम्ही हाटवता, की आम्ही हाटवू' असा आक्रमक पवित्रा घेत विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत विद्यार्थी काँग्रेसचे (एनएसयूआय) शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे यांनी जाब विचारला. 

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज याबाबत मनपा प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. मनपा उपायुक्त संतोष लांडगे यांचे दालन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या 'अमर रहे, अमर रहे, पंडित नेहरू अमर रहे' या घोषणांनी दणाणून गेले होते.

यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेसचे सुजित जगताप, प्रवीणभैय्या गीते पाटील,  अमीत भांड, प्रमोद अबुज, राजभैय्या गायकवाड,  प्रशांत जाधव, सचिन वारुळे, राज मयूर घोरपडे, सोमनाथ गुलदगड, योगेश जयस्वाल, सिद्धार्थ कारंडे, ऋतिक शिराळे, आदित्य तोडमल, जय शिंदे, साहिल शेख, पप्पू डोंगरे मनोज उंद्रे निखिल गलांडे जोय त्रिभुवन अशोक गायकवाड, सिद्धेश्वर झेंडे, शंकर आव्हाड आदींसह विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लालटाकी येथे अनेक वर्षांपासून पंडित नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र या पुतळ्याची आणि  परिसराची मनपाच्या अनास्थेमुळे दुर्दशा झाली आहे. इंग्रज राजवट असताना पं.नेहरू यांना भुईकोट किल्ल्यामध्ये कैद करून ठेवण्यात आले होते. आता इंग्रजांची राजवट नसून लोकशाही आहे. असे असताना देखील नेहरू पुतळ्याच्या कंपाउंडवर चार मोठे होर्डिंग्ज व्यावसायिक उपयोजनासाठी लावून नेहरूजींच्या पुतळ्याला बंदिस्त करण्याचे पाप मनपाने केले आहे, असा आरोप यावेळी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

पं.नेहरू थोर स्वातंत्र्यसेनानी होते. काँग्रेसचे नेते होते. आधुनिक भारताच्या उभारणीमध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे योगदान अतुलनीय आहे. पंडितजींच्या पुतळ्या बाबतीत मनपाकडून असा हलगर्जीपणा होणे ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदनादायी आणि भावना दुखावणारी आहे.

काँग्रेसजणांच्या भावना लक्षात घेता या भावनांचा उद्रेक होण्या आधीच मनपाने हे होर्डिंग्ज तातडीने हटवावेत. सात दिवसांच्या आत हटवले नाही तर  'तुम्ही हाटवता, की आम्ही हाटवू' असा थेट इशारा काँग्रेसने दिला आहे.

पुतळाच्या डागडुजी बरोबरच या परिसराचे मनपाने सुशोभीकरण करून पुन्हा या स्थळाला गतवैभव मिळवून द्यावे. परिसराची स्वच्छता आणि पावित्र्य अबाधित राहिल यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

विद्यार्थी काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्या नंतर आता मनपा काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून  कारवाई न केल्यास आगामी काळात काँग्रेस कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यपदी आ.किशोर दराडे


प्रा.प्रशांत म्हस्के : आ.दराडे यांच्या निवडीने विद्यापीठाच्या उपक्रमांना चालना मिळेल

     वेब टीम नगर : आमदार किशोर दराडे यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या या उल्लेखनिय कामाची दाखल घेऊनच त्यांची ही निवड केली आहे. ते आपल्या कार्यकर्तुत्वाने विद्यापीठाच्या विविध उपक्रमात योगदान देऊन विद्यापीठाच्या लौकिकात आणखी भर पाडतील. राहुरी कृषी विद्यापीठाने राज्यासह देशात आपल्या कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या संशोधनाने मोठे नाव कमवलेले आहे. विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थीही देशपातळीवर नाव चमकवित आहेत. आ.किशोर दराडे यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या उपक्रमांना आणखी चालना मिळून कृषी क्षेत्रात विद्यापीठचे नाव चमकवतील, यात शंका नाही, असे प्रतिपादन शिक्षक प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत म्हस्के यांनी केले.

     राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या कार्यकारी परिषद सदस्यपदी शिक्षक आमदार किशोर दराडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शिक्षक प्रशिक्षण परिषदेच्यावतीने अध्यक्ष प्रा.प्रशांत म्हस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब पिल्ले, बाळासाहेब तांबे, बाळासाहेब काळोखे, रविंद्र हरिश्‍चंद्रे, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रा.अंबादास शिंदे आदि उपस्थित होते.

     यावेळी प्रा.अंबादास शिंदे म्हणाले की, लवकरच शिक्षक बांधवांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नगरमध्ये शिक्षणाधिकारी  व आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत शिक्षक दरबार भरविण्यात येणार आहे. त्यामध्ये शिक्षक बांधवांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शिक्षकसेना कटीबद्ध असल्याचे सांगून आ.किशोर दराडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

     सत्कारानंतर आ.किशोर दराडे म्हणाले,  राहुरी कृषी विद्यापीठाने आपल्या गुणवत्तेत वाढ करुन देशात नावलौकिक मिळविला असू, त्यात भर घालण्यासाठी आपण योगदान देऊ. विद्यापीठ आणि शासन यांच्यात समन्वयाची भुमिका ठेवून विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करु. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जास्तीत-जास्त सोयी उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न राहील. आज केलेल्या सत्कारामुळे आपणास प्रेरणा मिळणार असल्याचे आ.दराडे यांनी सांगितले.

     यावेळी आ.किशोर दराडे व शिक्षक प्रशिक्षण परिषदेच्या पदाधिकार्‍यांसमवेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

मंदिराच्या सेवाभावी कार्यात प्रत्येकाचा सहभाग असावा

पटवेकर परिवारांच्यावतीने श्री विशाल गणेश मंदिरास अडिच लाख रुपयांची देणगी

    वेब टीम  नगर : शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश हे एक जागृत देवस्थान आहे. त्यामुळे भाविकांची मोठी श्रद्धा या श्रीगणेशावर आहे. या मंदिराचा झालेला जिर्णोद्धार हा नेत्रदिपक असाच आहे. त्यामुळे या मंदिराच्या प्रचितीत दिवसेंदिवस भर पडत आहे. मंदिराच्या सेवाभावी कार्यात आपलाही सहभाग असावा. या हेतूने खारीचा वाटा उचलला आहे. समाजात काम करत असतांना आपणही समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. आपले प्रत्येक कार्य पूर्णत्वास नेण्याची शक्ती हा देव देत असतो. त्यांच्या आदेशानेच आपले जीवनकार्य सफल होत असते. मनोभावे केलेल्या सेवेमुळे आपल्यात सकारात्मता येऊन मनुष्य जीवनात यशस्वी होत असतो. पण खरी प्रेरणा ही भगवंताची असती, असे प्रतिपादन पुणे चिंचवड येथील दत्तात्रय चंद्रकांत पटवेकर यांनी केले.

     कै.चंद्रकांत पटवेकर व कै.कमल पटवेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दत्तात्रय चंद्रकांत पटवेकर यांच्यावतीने शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास दोन लाख 51 हजार रुपयांची देणगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, पुजारी संगमनाथ महाराज, विश्‍वस्त रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, गजानन ससाणे, शुभांगी पटवेकर, नंदकुमार पटवेकर, लक्ष्मी पटवेकर, भोला पटवेकर, दत्ता बनकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी  साधना वाघोले, सुनिता वाघोले, संगीता वाघोले यांनीही सहयोग दिला.

     यावेळी अ‍ॅड.अभय आगरकर यांनी मंदिराच्यावतीने सुरु असलेल्या जिर्णोद्धाराच्या कामात अनेक दानशुर व्यक्ती, संस्था यांनी मोठे सहकार्य केल्याने आज भव्य-दिव्य असे मंदिराचे काम झालेले आहे. या मंदिराचा सुबक व सुंदर कलाकुसरीने झालेला कायापालट हा भाविकांच्या योगदानातून झालेला आहे. मंदिराच्या लौकिकात भर पडत असून, भाविकांची संख्याही वाढत आहे. देवस्थानच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच भाविकांना सोयी-सुविधा देण्यात येत आहेत. यापुढील काळात आणखी सुविधा देण्याचा मानस असल्याचे सांगून पटवेकर परिवाराने दिलेल्या देणगीबद्दल आभार व्यक्त केले.

     यावेळी पटवेकर परिवाराच्या हस्ते आरती करुन देवस्थानच्यावतीने परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अशोक कानडे यांनी केले तर आभार विजय कोथिंबीरे यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मानव संरक्षण समितीच्या नगर शहर अध्यक्षपदी इमरान बागवान 
उपाध्यक्ष सलिम शेख तर भिंगार शहर अध्यक्षपदी जहीर सय्यद यांची नियुक्ती

वेब टीम नगर : नवी दिल्ली मानव संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय कुराडे यांच्या आदेशानुसार राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या हस्ते अहमदनगरमधील पदाधिकार्‍यांची नियुक्ती करुन पत्रे देण्यात आली. यामध्ये इमरान उमर बागवान यांची अहमदनगर शहराध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी सलिम शेख तर भिंगार शहराध्यक्षपदी जहीर सय्यद लाल यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा जनसंपर्क अधिकारी मतीन जहागीरदार, जिल्हा उपाध्यक्ष शेख नासिर , जिल्हा निरिक्षक खलील पठाण, जैद सय्यद, जियान सय्यद, जहिर मुलानी, शब्बीर बागवान, अर्जुन बेडेकर, फैरोज पठाण, गफुर शेख, अजय भालेराव आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी गजानन भगत म्हणाले, मानव संरक्षण समितीच्यावतीने देशभर विविध स्तरावर काम सुरु असून, महाराष्ट्रात ही चांगले संघटन उभे राहत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही चांगले काम सुरु असून अनेक कार्यकर्ते संघटनेशी जोडले जात आहेत. त्यामुळेच पदाधिकार्‍यांच्या निवडी करुन त्यांच्यावर जबाबदार सोपविण्यात येत आहे. या पदाधिकार्‍यांनी संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी इमरान बागवान नियुक्तीनंतर म्हणाले, मानव संरक्षण समितीच्यावतीने आपणावर नगर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी आपण सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू. संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या चांगल्या कार्यात आपलेही महत्वपूर्ण योगदान असेल असे सांगितले.

यावेळी सर्व पदाधिकार्‍यांची विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेचे काम वाढविण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन बेडेकर यांनी केले तर आभार गफुर शेख यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 समाजात घडणार्‍या घडामोडींवरील भाष्य शायर आपल्या कवितेतून मांडतो

 डॉ.कमर सुरुर : मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी

वेब टीम नगर : शायर हा आपल्या शायरीतून फक्त प्रेम, प्रियसी, शराब, मैखाना अशाच गोष्टीचा उहापोह करतो हा जनसामान्यांचा समज आहे. मात्र ते चुकीचे आहे. आजच नाही तर जुन्या काळापासून आपण अभ्यास केला तर सर्व शायरांनी मनुष्याच्या जीवनात घडणार्‍या व समाजात घडणार्‍या घडामोडींवरील भाष्य आपल्या कवितेतून मांडले आहे. मिर्जा गालिब यांच्याबाबत विचार केला तर त्यांनी स्वतंत्र्यपूर्ण काळात देशातील स्थितीवर, लोकांच्या समस्यांवर शायरी केली. पण लोकांनी त्यांच्या फक्त प्यार, मोहब्बत, शराबच्या शायरीलाच जास्त पसंत केल्यामुळे त्यांच्याकडे त्याच दृष्टीकोणातून पाहण्यात येऊ लागले. खरं तर मिर्जा गालिब यांनी जीवनातील प्रत्येक बाबींवर आपल्या कवितेच्या माध्यमातून वास्तव मांडले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव उर्दू कवियत्री डॉ.कमर सुरुर यांनी केले.

मखदुम सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्यावतीने मिर्जा गालिब यांच्या जयंतीनिमित्त गोविंदपुरा येथील मखदुम कार्यालयात शेरीनशिस्तचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.कमर सुरुर बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हूणन उर्दू कवियित्री नफिसा हया होत्या.

नफिसा हया यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी मिर्जा गालिब फक्त प्रेमावर नसून त्या मागची गालिब यांनी जी भुमिका मांडायची होती ती त्यांनी सविस्तर मांडली. रसिकांनीही त्यास पसंती देत यांचे कौतुक केले.

या नशिस्तमध्ये डॉ.कमर सुरुर, सलिम यावर, नफिसा हया यांनी आपल्या शायरी सादर केल्या. तर सलिम यावर यांनी मिर्जा गालिब यांचे ‘हजारों ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहींश पे दम निकले...’ ही गजल गाऊन सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आबीद दुलेखान यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विभागीय युवा महोत्सवात भाऊसाहेब फिरोदिया  हायस्कूलचे यश

 शास्त्रीय गायनात शांतनु भुकन जिल्ह्यात प्रथम

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२०- २१ नुकताच ऑनलाइन पद्धतीने पार पडला. या महोत्सवात शास्त्रीय गायन प्रकारात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा विद्यार्थी शांतनु विजय भुकन ने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. त्याची विभागीय राज्य युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे. तसेच या स्पर्धेत ज्ञानेश्‍वरी अविनाश पांढरे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संगीत शिक्षक परशुराम मुळे यांचे मार्गदर्शन लाभले. यश प्राप्त करणारे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक अध्यापकांचे संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक दिलीप कुलकर्णी, पर्यवेक्षक संजय पडोळे, रवींद्र लोंढे, सुवर्णा वैद्य यांनी अभिनंदन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 कला-गुण विकसीत करण्यासाठी युवकांमध्ये संवाद कौशल्य आवश्यक 


डॉ. अमोल बागुल : नेहरु युवा केंद्र आयोजित जिल्हा युवा सांसद स्पर्धेस युवक-युवतींचा प्रतिसाद

वेब टीम नगर : आपले कला-गुण विकसीत करण्यासाठी युवकांमध्ये संवाद कौशल्य आवश्यक आहे. त्यासाठी वाचन करणे महत्त्वाचे आहे. पुस्तकाचे वाचन करून युवकांनी वैचारिक क्षमता प्रगल्भ केली, तर उत्तम संभाषण करता येते. उत्तम संभाषण कौशल्य असल्यास आपल्या कामाची वेगळी छाप पडत असल्याची भावना राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल यांनी केले.

भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र आयोजित जिल्हास्तरीय युवा सांसद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. बागुल बोलत होते. टिळक रोड येथील नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात ही स्पर्धा युवक-युवतींच्या उपस्थितीमध्ये पार पडली. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शक म्हणून जय युवाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे,  खरात, उडान फाऊंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे, द युनिव्हर्सल फाऊंडेशनच्या सचिव आदिती उंडे, सागर अलचेट्टी, नर्मदा फाऊंडेशनचे ह.भ.प. सुनील महाराज तोडकर, दिनेश शिंदे, रमेश गाडगे, लेखापाल सिद्धार्थ चव्हाण आदी उपस्थित होते.

जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांनी युवा सांसदच्या माध्यमातून शिक्षण, शेती, कोरोना संकट, सद्यस्थितीच्या उपाययोजना, शासनाचे धोरण याबाबत विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे. युवकांची वैचारिक देवाण-घेवाण होण्यासाठी युवासांसद महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. आरती शिंदे यांनी आजचे युवा पिढी वाचन व संस्कार अभावी भरकटत चाललेली आहे. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र सातत्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून युवकांचे नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. युवा सांसदच्या माध्यमातून वक्तृत्व विकसित होणार असल्याची भावना व्यक्त केली.

अ‍ॅड. ह.भ.प. सुनील महाराज तोडकर यांनी आजचा युवक मोबाईलच्या विळख्यात गुरफटलेला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी युवा सांसद सारख्या उपक्रमाची गरज आहे. युवकांमध्ये वैचारिक बदल घडले पाहिजे स्पर्धेतून युवक-युवतींना आपले गुण-दोष लक्षात येतात खेळाडू वृत्ती जपली जाते असल्याचे सांगितले. युवा सांसदचे परीक्षण डॉ.अमोल बागुल, अ‍ॅड. महेश शिंदे, आदिती उंडे, आरती शिंदे, अ‍ॅड. सुनील तोडकर यांनी केले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयंसेवक, जिल्हा भरातील युवा मंडळाचे पदाधिकारी व स्पर्धक उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत दिनेश शिंदे यांनी केले. आभार रमेश घाडगे यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संतकवी दासगणू महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन  

ह.भ.प.भास्करगिरी महाराज :  गारुडकर परिवाराचे धार्मिक कार्यात योगदान                                         

वेब टीम नगर : अकोळनेर येथील संतकवी दासगणु महाराजांचे जन्मस्थळ परिसर विकासासाठी स्व.रावसाहेब गारुडकर यांचे योगदान आहे.गारुडकर परिवाराने संत सावतामाळी मंदिराची उभारणी करून कीर्तन,प्रवचन,सप्ताह,साई पारायण ,दिंडीचे स्वागत,महाप्रसाद वाटप अश्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते.गारुडकर यांचे आजोबा कुशाभाऊ गारुडकर हे संतकवी दासगणू महाराजांचे शिष्य होते.त्यांचा वारसा गारुडकर परिवाराने पुढे नेटाने चालविला आहे.सुनील गारुडकरांनी सुंदर असे संतकवी दासगणू महाराज यांचे चित्र असलेली दिनदर्शिका तयार केली आहे. गारुडकर परिवाराच्या कार्यातून सेवा व भक्तीचे दर्शन होते.गारुडकर परिवाराचे धार्मिक कार्यात योगदान आहे.असे प्रतिपादन श्री क्षेत्र देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांनी केले.    

नेवासा येथील श्री क्षेत्र देवगड येथे संतकवी दासगणू महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सुनील गारुडकर, पत्रकार संजय सावंत,प्रा.अशोक धसाळ,गणेश गारुडकर आदी उपस्थित होते.                                                                                           सुनील गारुडकर म्हणाले कि,अकोळनेर येथील संतकवी दासगणू महाराज मंदिरात भाविकांना या दिनदर्शिकेचे मोफत वाटप  केले जाणार असून या दिनदर्शिकेत सर्व मराठी सणांची माहिती दिलेली  आहे.तसेच संतकवी दासगणू महाराज यांचे चित्र प्रकाशित केले आहे. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------  

Post a Comment

0 Comments