गुगल पे वापरतांना जरा सांभाळून

 गुगल पे वापरतांना जरा सांभाळून 

वेब टीम नांदेड : गुगल पे ॲपच्या कस्टमर केअरमधून बोलतोय असं सांगून एका व्यक्तीच्या खात्यातून २ लाख ६२ हजार रुपये लंपास केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. या प्रकरणी किनवट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फोन नंबरची तपासणी केली असता तो गुगल पे कस्टमर केअरचा असल्याचं दाखवत आहे.

किनवट तालुक्यातील गोकुंदा भागात राहणारे आणि सरकारी नोकरदार असलेले भिमराव ज्ञानेश्वर मेहेत्रे यांच्या बँक खात्यात पाच लाख रुपये होते. त्यामधील एक लाख रुपये मेहेत्रे यांनी नातेवाईकाच्या खात्यात पाठवले. त्यानंतर खातं तपासलं असता त्यात चार लाख रुपये शिल्लक होते. परंतु नातेवाईकाला पाठवलेले एक लाख रुपये त्यांना मिळाले नाहीत. म्हणून त्यांनी गुगल पेच्या कस्टमर केअरवर कॉल केला. परंतु तो नंबर लागला नाही. काही वेळाने त्यांना 8101295500 या क्रमांकावरुन फोन आला. कस्टमर केअरमधून बोलतोय असे भासवून त्याने भिमराव मेहेत्रे यांच्याकडून युजरनेम, पासवर्ड मिळवले आणि त्यांच्या खात्यातून 2 लाख 62 हजार 744 रुपये काढून घेतले.

आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर भिमराव मेहत्रे यांनी किनवट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि भारतीय तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे मेहत्रे यांना आलेल्या संबंधित नंबरची तपासणी केली असता तो गुगल पे कस्टमर केअरचा असल्याचं दाखवत आहे.


Post a Comment

0 Comments