नगर बुलेटीन २९-१२-२०२०

 नगर बुलेटीन २९-१२-२०२०

नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक भागाचा विकास करणार

आ.संग्राम जगताप : प्रभाग क्र.११ मधील राऊत मळा येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

     वेब टीम नगर : गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे अनेक विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती, परंतु आता विकास कामांची सुरुवात झाली असून, नगरमध्येही ही कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे भविष्यात नगरमध्ये चांगले कामे उभी राहतील. यासाठी आपण प्रयत्नशिल असून, नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक भागाचा विकास करण्यात येत आहेत. त्यासाठी नगरसेवक अविनाश घुले व मी स्वत: मुंबईत मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री ना.हसन मुश्रिफ यांना भेटून नगरच्या विकासासाठी निधीची मागणी केली आहे. त्याचबरोबर या भागातील सोलापूर रोड ते एमएसईबी पर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या निधीची गरज असून, लवकरच तो उपलब्ध करुन ते काम मार्गी लावू. शहराचा नियोजनपूर्वक विकास करण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेऊ. नगरसेवक अविनाश घुले सर्वसामान्यांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. अशा स्वरुपाच्या कामातून एक आदर्श प्रभाग निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

     प्रभाग क्र.११ मधील राऊत मळा येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नगरसेवक अविनाश घुले, जगन्नाथ राऊत, गोविंदराव सांगळे, भिमराव रासकर, बबन राऊत, बबन अजबे, बाबासाहेब राऊत, महादेव अजबे, रामचंद्र रासकर, संदिप पालवे, बाबासाहेब काळे, जयंत थोपटे, हंसराज चौधरी, गोविंद गायकवाड, शंकरराव हिरणवाळे, सोमनाथ डाळवाले, राहुल काळे, बाबू रासकर आदि उपस्थित होते.

याप्रसंगी अविनाश घुले म्हणाले, प्रभागातील प्रत्येक भागाचा विकास करण्याचा आपण कसोसीने प्रयत्न करत आहोत. सर्व नागरिकांना मुलभुत सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहोत. राऊत मळा येथील रस्ता करण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आज पूर्ण होत आहेत.  प्रभागात चांगले विकास कामे करुन नागरिकांना सुविधा देण्याचा आपला प्रयत्न राहील. आ.संग्राम जगताप यांच्या सहकार्याने प्रभागातील कामांसाठी जास्तीत जास्त निधी आणून प्रभाग आदर्शवत करण्याचा आपण प्रयत्न आहे.

     याप्रवसंगी जगन्नाथ राऊत म्हणाले, राऊत मळा या परिसरात रस्त्याची मोठी दुरावस्था होती. नगरसेवक अविनाश घुले यांच्याकडे पाठपुरवा केल्याने आज हा रस्ता होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे मोठी सोय या रस्त्याने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन अजबे यांनी केले तर आभार बाबू रासकर यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगर शहरात भाजपाचे संघटन मजबूत होत आहे

आ.सुभाष देशमुख : आ.सुभाष देशमुख यांचे नगरमध्ये भाजपाच्यावतीने स्वागत

    वेब टीम  नगर : केंद्र सरकारने कृषी विधयक शेतकर्‍यांच्या कल्याणासाठीच आणले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना फायदाचा होणार आहे. परंतु फक्त विरोधाला विरोध म्हणून या कृषी विधेयकला विरोध करत आहेत. जर या विधेयकात काही त्रुटी असतील त्या सांगाव्यात, चर्चा करावी. केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी आहे, त्यासाठी नुकतीच त्यांच्या हक्काची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली आहे. भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकरी व सर्वसामान्यांना केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्याचे व त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. नगर शहरामध्ये भाजपाचे संघटन मजबूत होत आहे, कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवून पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावेत. आपणास हवी ती मदत वरिष्ठ पातळीवरुन केली जाईल, असे आश्‍वासन माजी मंत्री आ.सुभाष देशमुख यांनी दिले.

     माजी मंत्री आ.सुभाष देशमुख नगरमध्ये आले असता त्यांचा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या निवासस्थानी स्वागत करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, उपाध्यक्ष सचिन पारखी, मल्हार गंधे, ऋग्वेद गंधे, हुजेफा शेख आदि उपस्थित होते.

     यावेळी बोलतांना भैय्या गंधे म्हणाले, भाजपाच्यावतीने नगर शहरात विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. त्याद्वारे कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत. भाजपाचे वरिष्ठ नेते व आ.सुभाष देशमुख नगरमध्ये विशेष लक्ष घालून ताकद देण्याचे काम करत आहेत. भविष्यात नगरमध्ये भाजपाची ताकद वाढलेली दिसेल, असा विश्‍वास भैय्या गंधे यांनी व्यक्त केला.

     याप्रसंगी आ.सुभाष देशमुख व भैय्या गंधे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'फि' साठी  तगादा करणार्‍या शाळांवर कारवाई करा

सचिन डफळ : शाळांनी सुधारणा न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन

     वेब टीम नगर :  नगरमधील शाळांकडून पालकांकडे तगादा लावून फि वसूल करणार्‍या शाळांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिक्षणाधिकारी  यांना देण्यात आले. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, अ‍ॅड.अनिता दिघे, परेश पुरोहित, इंजि.विनोद काकडे, धिरज पडोळे, राजू कांबळे, सचिन गुप्ता, संजय आंधळे, किरण सोनी, मकरंद चिंतामणी, रवी दंडी, जय ठाकूर, सचिन शेरकर आदि उपस्थित होते.

     शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरमधील अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने पालकांना शालेय फी भरणेबाबत सारखी मागणी केली जाते. इ.१० वी चा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा फी भरल्याशिवाय केली जाणार नाही, असे सांगितले जाते.

     सध्या कोविडच्या महासंकटामुळे लॉकडाऊनच्या कारणाने सर्व व्यवसाय बंद झाले. सर्व पालक आर्थिक अडचणीला तोंड देत आहे. त्या दृष्टीकोनातून शासनाने देखील फीची सक्ती करु नये, असे आदेश दिले आहेत, परंतु वरील शाळांकडून त्याबाबत विचार न करता पालकांकडे सारखी मागणी करुन त्यांना अडचण निर्माण केली जात आहे.

     या संदर्भात मा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकेवर फी मध्ये सवलत देण्याचे व फि कमी करण्याचे आदेश दिले आहे. तरी आपण याबाबत वरील संस्थेची फी कमी करुन फी भरण्यास सवलत देण्यासंबंधी तसेच फी करता इ.१० वीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवू नये असे आदेश द्यावेत, त्यामुळे पालकांना दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

     याप्रसंगी नितीन भुतारे म्हणाले, कोरोनामुळे सध्या शाळेचे कामकाज ऑनलाईनच सुरु आहे, परंतु तरीही नगरमधील काही शाळा पालकांना वेगवेगळ्या अनावश्यक फि साठी तगादा लावत आहेत. शासनाने व न्यायालयानेही फी बाबत सक्ती करु नये व सवलत देण्यात यावीत, असे आदेश दिलेले असतांनाही शाळांकडून पालकांवर फि साठी दबाव टाकला जात आहे. याबाबत शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. यात संबंधित शाळांनी सुधारणा न केल्या मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असेही भुतारे यांनी यावेळी सांगितले.

     शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळांकडून फी सुरु असलेल्या प्रक्रियेची माहिती घेऊन शासनाच्या नियमानुसार कार्यवाही होत आहे की, नाही, याबाबत खात्री करु. काही त्रुटी आढळल्यास संबंधित शाळांवर कारवाई करु, असे आश्‍वासन दिले. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होवू देणार नाही. तसेच पालकांवर अतिरिक्त फि साठी दबाव टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करुन काँग्रेसचा १३५ वा वर्धापन दिन साजरा

नगर - भिंगार काँग्रेसचा संयुक्त कार्यक्रम

   वेब टीम   नगर :  ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळविणाराच’ अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळक यांनी  स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या ठिकाणी केली. त्या ऐतिहासिक इमारत कंपनीतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 135 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

     शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नगर आणि भिंगार काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाने या कार्यक्रमात सहभाग घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळात १८८५ ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना देशाला स्वातंत्र्य आणि पुरोगामी विचार देण्याच्या उद्देशाने झाली. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस सक़्रीय होती, त्यात अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्य चळवळीत देशाचे नेतृत्व केले. लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आदि महान नेते काँग्रेसने देशाला लाभले.

     देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने देशात समानता आणि लोकशाही रुजविण्याचा प्रयत्न केला. राजकीय पक्ष म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने देशात बहुमताने सत्ता हाती घेऊन देशाला प्रगती पथावर नेले. आज पक्षाचा १३५ वा वर्धापन दिन असून, पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले.

     पक्षाला गतवैभव प्राप्त करुन द्यावयाचे असेल तर प्रत्येकाने पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे वागून पक्षाची विचारसरणी तळागाळापर्यंत रुजविण्याचा प्रयत्न करायला हवा. समाज माध्यमातून काँग्रेस पक्षाची घोरणे आपण तळागाळापर्यंत पोहोचविली असली तरी आजची परिस्थिती उद्भवली नसती मात्र नेमके उलटे घडले. विरोधी पक्षांनी समाज माध्यमांचा वापर करुन काँग्रेस पक्षाच्या विरोधी विषारी प्रचार तळागाळापर्यंत नेला, त्याचे परिणाम आज देश भोगत आहे. देशाला जर पुन्हा चांगले दिवस आणावयाचे असतील तर समाज माध्यमातून आपण जनसंपर्क वाढवायला हवा, असे मत पक्षाचे भिंगार अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांनी व्यक्त केले.

     प्रारंभी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान यांनी स्वागतपण भाषणात काँग्रेस पक्षामुळे स्वातंत्र्य चळवळीत खान अब्दुल गफार खान, मौलाना आझाद, असे अनेक देशभक्त सक्रीय होते, असे त्यांनी नमूद केले. काँग्रेसने त्या काळात  हिंदू- मुस्लिम ऐक्य करुन ब्रिटीशांच्या विरोधात लढून स्वातंत्र्य प्राप्त केले. या पक्षाच्या माध्यमातून हे ऐक्य आजही टिकून आहे.

     याप्रसंगी शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, राजेश बाठिया, अभिजित कांबळे, रजनी ताठे,आदिंची समयोचित भाषणे झाली. यावेळी  विवेक येवले, अ‍ॅड.नरेंद्र भिंगारदिवे, मार्गारेट जाधव, रवी सूर्यवंशी, सुभाष रणदिवे आदि उपस्थित होते.

     प्रारंभी पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजप्रणाम करुन पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाला पूर्वभैभव प्राप्त करुन देण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले. संजय झोडगे यांनी आभार मानले. शेवटी वंदे मातरमने  कार्यक्रमाची सांगता झाली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रोटरी क्लब मिड टाऊनच्या अत्याधुनिक डायलिसीस सेंटरची लवकरच उभारणी

वेब टीम नगर : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊन येत्या नवीन २०२१ वर्षात नगर शहरात सर्वसामान्य गोर गरीब, गरजू रुग्णांसाठी अत्याधुनिक डायलिसिस सेंटर लवकरच उभारणार आहे. रोटरी क्लबच्या " ग्लोबल ग्रँट " या उपक्रमांतर्गत नगरच्या रोटरी क्लब मिड टाऊनच्या वतीने प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या उपक्रमाला द रोटरी फाउंडेशनने त्वरित मान्यता देत ५ अत्याधुनिक डायलिसिस मशीन करता सुमारे ४० लाख रुपयांचा निधी रोटरी क्लब मिड टाऊन ला मंजूर केला आहे. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ मियामी हा अमेरिकेतील क्लब फॉरेन पार्टनर झाला आहे. नगर शहरातील गरीब गरजू रुग्णांना विनामूल्य किंवा अत्यल्प दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने रोटरी क्लब मिड टाऊन क्लबने सुचवलेल्या या प्रोजेक्टला अमेरिकेतील क्लबने आणि रोटरी इंटरनॅशनल ने अर्थ सहाय्य केले आहे. लवकरच नगरच्या मॅक केअर हॉस्पिटल मध्ये हे अत्याधुनिक डायलिसिस सेंटर सुरू करणार असल्याची माहिती अध्यक्ष क्षितिज झावरे यांनी दिली आहे.

यानिमित्त रोटरी मिड टाऊन  क्लबच्या झालेल्या मीटिंगमध्ये डायलिसिस मशीन घेण्यासाठी ३५ लाख रुपयांचा धनादेश रोटरी क्लबचे प्रांतपाल हरिष मोटवाणी यांनी क्लब कडे सुपूर्द केला. यावेळी अध्यक्ष क्षितिज झावरे, सचिव दिगंबर रोकडे, प्रमोद पारीख, मनीष नय्यर, सतीश शींगटे आदींसह सदस्य उपस्थित होते. या मोठ्या उपक्रमासाठी प्रमोद पारीख, विजय इंगळे परिश्रम घेतले. पुढील महिन्यात हे डायलिसीस सेंटर पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार असून यासाठी मॅक केअर हॉस्पिटल मधील डॉ. आनंद काशीद तसेच व्यवस्थापन यांचे सहकार्य असणार आहे.

क्लबच्या या सेवा कार्याचे कौतुक करतांना प्रांतपाल हरिष मोटवानी यांनी नगर शहरामध्ये कोविडचा प्रदुर्भाव सर्वात जास्त असतांनाच्या काळात रोटरी कोविड केअर सेंटरचे उभारणी करून सुमारे १५२४ रुग्णांना विनामूल्य उपचार क मोफत सर्व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या रोटरीच्या वतीने आता डायलिसिस सेंटरचे उभारणी हा या वर्षातील दुसरा मोठा उपक्रम हाती घेतला आहे. नगर शहराच्या सेवेत रोटरी हा शब्द रोटरी क्लब मिड टाऊन खऱ्या अर्थाने सार्थ ठरवीत आहे, असे गौरोद्गार काढले.

गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी रोटरी कडे नावनोंदणी करणे आवश्यक असून, जिल्ह्यातील रुग्णांनी सचिव दिगंबर रोकडे मो.९९२१२२६०१६ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन रोटरीच्या वतीने केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सोमनाथ गर्जे यांना विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मानाचा एमडीआरटी पुरस्कार

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे जागतिक परिषदेसाठी निवड

वेब टीम नगर: येथील सोमनाथ गर्जे यांना विमा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा व आंतरराष्ट्रीय मानाचा एमडीआरटी पुरस्कार नुकताच मिळाला. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून विमा पॉलिसी क्षेत्रात व्यवसायवृद्धी केल्याबद्दल हा बहुमान दिला जातो. हा पुरस्कार मिळून त्यांची अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे जागतिक परिषदेसाठी निवड झाली आहे. सोमनाथ गर्जे यांना शाखा अधिकारी गंगा खेडेकर, उपशाखा अधिकारी रामराव भूजंग, विकास अधिकारी धनंजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. हा बहुमान मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रविवारी मोफत प्राकृतिक चिकित्सा शिबीराचे आयोजन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती : अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघाचा उपक्रम

वेब टीम नगर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. ३ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघाच्या वतीने मोफत प्राकृतिक चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सेवा संघाच्या लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड येथील जिल्हा संपर्क कार्यालयात संपन्न होणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन माळी सेवा संघाचे उपाध्यक्ष मेजर नारायणराव चिपाडे यांनी केले आहे.

या मोफत प्राकृतिक चिकित्सा शिबीराचे उद्घाटन माजी लेफ्टनंट सदाशिवराव भोळकर, अ‍ॅड. महेश शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवा संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, सूर्यकांत रासकर, पोपटराव बनकर, किरण सातपुते, अ‍ॅड. अनिता दिघे, जालिंदर शिंदे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या मोफत प्राकृतिक चिकित्सा शिबीरात गुडघेदुखी, सांधेदुखी, मायग्रेन, मनके विकार, कंबर व टाचदुखी आदिंची तपासणी तज्ञ डॉक्टर करणार आहे. या शिबीरासाठी नांव नोंदणी आवश्यक असून, सेवा संघाच्या संपर्क कार्यालयात शिबीराच्या लाभार्थ्यांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे सांगण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भालेराव यांच्या निवडीने क्रीडा क्षेत्रात नगरचे नांव उंचावले 

राजेंद्र कोतकर : शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने दिनेश  भालेराव यांचा गौरव

वेब टीम नगर: शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने क्रीडा मार्गदर्शक दिनेश लक्ष्मण भालेराव यांची महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या सहसचिवपदी बिनविरोध निवड तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन वर राज्य संघटनेचे प्रतिनिधी मधून नियुक्तीझाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. पुणे येथे झालेल्या अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय अध्यक्ष आदिल सुमारीवाला व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत या निवडी बिनविरोध झाल्या. तर महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या रिक्त झालेल्या पदावर प्रथमतःच दिनेश भालेराव यांची निवड एकमताने करण्यात आली.

वाडियापार्क क्रीडा संकुल येथे झालेल्या कार्यक्रमात महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी भालेराव यांचा सत्कार केला. यावेळी जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, कबड्डी असोसिएशनचे विजयसिंग मिस्किन, धन्यकुमार हराळ, नंदकुमार शितोळे, रमाकांत दरेकर, बद्रीनाथ शिंदे, मिठू काळे, कृष्णा लांडे, सचिन काळे, सचिन नलगे, संतोष काळे, अमित चव्हाण, गुलजार शेख, प्रणव थोरात, प्रथमेश राऊत आदिंसह खेळाडू उपस्थित होते.

महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर म्हणाले की, दिनेश भालेराव यांनी ट्रॅक रेसर्स स्पोर्टस्  फौंडेशनच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले आहे. त्यांचा अनुभव व अ‍ॅथलेटीक्ससाठीचे उत्कृष्ट काम लक्षात घेता त्यांची झालेली निवड अभिनंदनीय व जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह आहे. या निवडीने क्रीडा क्षेत्रात नगरचे नांव उंचावले गेले असल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध संघटना, खेळाडू व पालकांच्या वतीने उपस्थितांनी भालेराव यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लष्करातील जवान हे देशाचे खरे हिरो

सेवानिवृत कर्नल डॉ.सर्जेराव नांगरे :सेवानिवृत्त झालेल्या लष्करातील अधिकारी व माजी सैनिकांचा गौरव 

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचा उपक्रम

वेब टीम नगर : लष्करातील जवान हे देशाचे खरे हिरो आहेत. जिवाची व आपल्या कुटुंबीयांची पर्वा न करता ते देश रक्षणाचे कार्य करीत असतात. समाजाने देखील त्यांना सन्मान देण्याची गरज आहे. सेवानिवृत्त होऊन देखील माजी सैनिक सामाजिक सेवा करीत असून, जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनने उभे केलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. या फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याने भारावून आपण देखील या कार्यात हातभार लावण्याचा संकल्प सेवानिवृत कर्नल डॉ.सर्जेराव नांगरे  यांनी व्यक्त केला. 

 देश सेवा करुन सेवानिवृत्त झालेल्या लष्करातील अधिकारी व माजी सैनिकांचा जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला. तपोवन रोड येथील संघटनेच्या माध्यमातून उभे राहत असलेल्या शहीद स्मारक येथे हा गौरव सोहळा पार पडला.

 या कार्यक्रमात मॅक्स केअरचे डॉ. जरे, सेवानिवृत कर्नल डॉ.सर्जेराव नांगरे, मेजर निळकंठ उल्हारे, मेजर अशोक चौधरी, अ‍ॅड पोपट पालवे, उद्योजक सुरेश बडे, निवृत पोलिस अधिकारी नारायण घुले, अ‍ॅड.संदिप जावळे, जितेंद्र जोशी, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ औटी, एसबीआयचे रविकुमार जगताप, अमृता शेटे, जयाताई पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी सैनिकांचा सत्कार करुन गौरव करण्यात आला.

नुकतेच भारतीय सैन्यातून सेवानिवृत झालेले कर्नल डॉ.सर्जेराव नांगरे, संभाजी ससे, गोरक्षनाथ पालवे, संदिप कराड, सुनिल गुंजाळ, दादाभाऊ बोरकर, शिवाजीराव गर्जे, अरूण शिंदे, विजय घुले, नवनाथ वारे, मानव झिरपे, संतोष कोंडके, बाबासाहेब गिते, लक्ष्मण सत्रे, रईस सय्यद, लक्ष्मण शिंदे, शरद दरंदले, बद्रिनाथ इसरवाडे, अरूण ईखे, ओमप्रकाश शिंदे, सि.बी. कापसे, मच्छींद्र नागरगोजे, नामदेव गवळी यांचा जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृती भाबड, जगन्नाथ जावळे, संजय पाटेकर, विठ्ठल लगड, महादेव शिरसाठ, अमोल निमसे, कुशल घुले, भाऊसाहेब देशमाने, अनिल पालवे, संतोष शिंदे, गणेश पालवे, अंकुश भोस, गणेश अंधारे, महादेव गर्जे, अंबु बडे, दतात्रय बांगर, बन्सी दारकुंडे, आंबादास लहारे, भगवान आव्हाड, दुशांत घुले, बाजीराव गोपाळघरे, शांतीलाल सानप, खंडेराव लेंडाळ, अशोक पालवे, उद्धव थोटे, भगवान डोळे, हरीदास भाबड, भरत शिरसाठ आदिंसह माजी सैनिक उपस्थित होते. डॉ. जरे यांनी माजी सैनिकांच्या कृतज्ञतेपोटी मॅक्स केअरच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव शिरसाठ यांनी केले. आभार शिवाजी पालवे यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 निकम यांनी निस्वार्थ भावनेने समाजासाठी केलेल्या कार्याची दखल 

  आनंद लहामगे : नाभिक महामंडळाच्या जिल्हा उपाध्यक्ष , ओबीसी महासंघाच्या शहराध्यक्षपदी नियुक्तीझाल्याबद्दल अनिल निकम यांचा सत्कार

वेब टीम नगर : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्ह उपाध्यक्षपदी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शहराध्यक्षपदी अनिल निकम यांची निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे व चंद्रकांत फुलारी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सागर बोडखे उपस्थित होते.

आनंद लहामगे म्हणाले की, अनिल निकम यांनी निस्वार्थ भावनेने समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. नुकतेच त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवून विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. संपुर्ण राज्यात ओबीसीच्या एका छताखाली सर्व जाती एकवटल्या आहेत. सर्व ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा संघर्ष असून, निकम या दृष्टीने संघटन मजबूत करण्याचे कार्य करतील अशी आशा व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना अनिल निकम म्हणाले की, नाभिक महामंडळाचे कल्याणराव दळे व बहुजन विकास मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नियुक्ती झाली असून, आपण केलेल्या कामाची ही पावती असून, समाजासाठी निस्वार्थ भावनेने सर्वपरीने योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सर्व समाजांना जोडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अठरा वर्षात सोळाशे कलावंत घडविल्याबद्दल


कलाशिक्षक प्रवीण नेटके यांची नेशन प्राईड बुक मध्ये नोंद

वेब टीम नगर : येथील कला शिक्षक प्रवीण नेटके यांनी अठरा वर्षात सोळाशे कलावंत घडविल्याबद्दल नेशन प्राईड बुक ऑफ रेकॉर्ड २०२०साठी त्यांची नोंद झाली आहे.

नेटके ड्रॉईंग अकॅडमीच्या माध्यमातून नेटके यांनी चित्रकला क्षेत्रात अनेक उत्कृष्ट कलाकार घडवले आहेत. त्यांना २००१मध्ये दिल्ली येथे झालेल्या महात्मा फुले फेलोशीपसाठी भारताचे गव्हर्नर यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी प्रौढ, कुमार, कुमारी विद्यार्थ्यांना चित्रकलेचे प्रशिक्षण दिले. तसेच कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी चित्रकला प्रदर्शन भरविणे व स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांना प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले आहे. या कामाची दखल घेत त्यांची नेशन प्राईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

२०२० मध्ये नेशन प्राईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भारतातील नामांकित विविध क्षेत्रातील व्यक्तीमत्वांची नोंद झाली असून, नेटके यांच्या या नोंदीमुळे अहमदनगर शहराचे नांव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. त्यांच्या या यशाबद्दल टीम टॉपर्सचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पाटोळे, सचिव सागर भिंगारदिवे, टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, श्रीकांत कसाब, कृष्णा अल्हाट, शिल्पा नेटके, संध्या गांधी, किरण माने आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, भारतीय जनसंसद व पिपल्स हेल्पलाईनचा उपक्रम 

प्रत्येक राज्याला रेल्वे मंत्री मिळण्यासाठी सत्यबोधी सुर्यनामा

हरजितसिंह वधवा यांना रेल्वे लॉरिस्टरचा सन्मान प्रदान
गाव पातळीवर शेतकरी संरक्षण कायदा सभांची स्थापना करण्याचा निर्णय

वेब टीम नगर :  प्रत्येक राज्याला रेल्वे मंत्री मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, भारतीय जनसंसद व पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने भारतीय घटनेतील  परिशिष्टातील सामाईक यादीमध्ये टाकण्याची मागणी करुन सत्यबोधी सुर्यनामा करण्यात आला. तर शेतकरी संरक्षण कायदा लागू होण्यासाठी गाव पातळीवर शेतकरी संरक्षण कायदा सभांची स्थापना करण्याची घोषणा हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. तसेच नगरच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वाची भूमिका घेणारे उद्योजक हरजितसिंह वधवा यांना रेल्वे लॉरिस्टरचा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, अंबिका जाधव, उषा निमसे, अंबिका नागूल, मनिषा राठोड, फरिदा शेख, शशीकला गायकवाड, लतिका पाडळे, छाया पाडळे, अशोक भोसले, पोपट भोसले, सखूबाई बोरगे आदि उपस्थित होते.  

देशातील राज्यांमध्ये स्थानिक रेल्वेचे जाळे पसरुन औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या प्रगती साधण्यासाठी प्रत्येक राज्याला रेल्वे मंत्रीची नियुक्ती होणे आवश्यक आहे. इंग्रजांनी तयार केलेल्या रेल्वेच्या जाळ्यात थोड्या फार प्रमाणात वाढ झाली आहे. सत्ता केंद्रीकरणामुळे पुरेश्याप्रमाणात रेल्वेचे जाळे संपुर्ण भारतात रेल्वेचे जाळे पसरु शकलेले नाही. यासाठी भारतीय घटनेतील परिशिष्टातील सामाईक यादीमध्ये टाकण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या तृप्ती देसाई यांना शक्तीकर्मा लॉरिस्टरचा सन्मान देण्यात आला.

देशात शेतकरी संरक्षण कायदा आनण्याच्या दृष्टीने प्रत्येक गाव पातळीवर शेतकरी संरक्षण कायदा संभांची निर्मिती करण्याचा निर्णय या बैठकित झाला असून, या दृष्टीने संघटन केले जाणार आहे. गाव पातळीवर कायदा सभापती व उपसभापती अशा पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

देशातील शेतकर्‍यांच्या उत्पदनांना चांगला हमीभाव मिळण्यासाठी व डॉ.स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशीचा कायद्यात प्राधान्याने तरतूद करण्याची तसेच शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी संरक्षण न्यायालयाची उभारणी करण्याची मागणीचा ठराव संघटनांच्या वतीने घेण्यात आला.  

हरजितसिंह वधवा यांनी नगर-पुणे लोकल रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यासाठी आजी-माजी खासदार प्रयत्नशील असून, आपण देखील यासाठी प्रयत्न करणार असून, वेळप्रसंगी जनआंदोलन देखील उभे करण्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी नगर-पुणे लोकल रेल्वे सुरु झाल्यास नगर जिल्ह्याचा झपाट्याने विकास होणार आहे. अनेक बेरोजगार युवकांना पुण्यात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ही दोन्ही शहरे रेल्वेच्या माध्यमातून जवळ आल्याने व्यापार व उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे. देशाच्या विकासासाठी शेतीचा विकास होणे आवश्यक आहे. मात्र शेतकर्‍यांना डावलून हा विकास शक्य नाही. यासाठी शेतकरी संरक्षण कायदा असतित्वात आनण्याची खर्‍या अर्थाने गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मनपातील भाजप - राष्ट्रवादीच्या अभद्र युतीमुळे शहराचा विकास खुंटला


किरण काळे : काँग्रेस पक्ष स्थापना दिनानिमित्त 'सेल्फी विथ तिरंगा' मोहीम उत्साहात

वेब टीम नगर :  मनपात भाजप, राष्ट्रवादीच्या  अभद्र युती मूळे शहराचा विकास खुंटला आहे, अशी थेट टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सेल्फी विथ तिरंगा मोहिमे प्रसंगी पक्ष कार्यालयात काळे बोलत होते. 

यावेळी ज्येष्ठ नेते, माजी महापौर दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, निजामभाई जहागीरदार, डॉ.रिजवान अहमद, मागासवर्गीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, एनएसयूआयचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, युवक काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, नामदेवराव चांदणे, मुबीनभाई शेख, डॉ. दिलीप बागल, अनंतराव गारदे, अनिसभाई चुडीवाल, नलिनीताई गायकवाड, जरीना पठाण, सुनिता बागडे, नीता बर्वे, कौसर खान, उषाताई भगत आदी उपस्थित होते. 

यावेळी काळे म्हणाले की, शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट झाले आहे. घंटागाडी शहराच्या सर्व भागांमध्ये पोहोचू शकत नसल्यामुळे अनेक महिलांचे हाल होत आहेत. पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील ओढे-नाले रातोरात गायब होत आहेत. 

भाजप, राष्ट्रवादीच्या मिली-भगतमुळे फक्त खिसे भरण्याचा कार्यक्रम जोरात सुरू असून सामान्य नगरकर मात्र समस्यांनी त्रासून गेला आहे. भाजपा सारख्या जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात काँग्रेस,शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी नगर शहरात मात्र स्थानिक राष्ट्रवादी मोदी-फडणवीसांच्या भाजप समवेत असल्यामुळेच शहराचा विकास खुंटला असल्याची घणाघाती टीका शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

यावेळी दीप चव्हाण यांनी सद्य राजकीय स्थितीवर नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या प्रश्नावरती महानगरपालिकेत आक्रमक भूमिका घेण्याचे सूतोवाच केले. ज्ञानदेव वाफारे यांनी काँग्रेस स्थापनेचा इतिहास सांगत पक्षाने राष्ट्र उभारणी मध्ये केलेल्या कामांची माहिती यावेळी मांडली. नलिनीताई गायकवाड यांनी अनेक महिला काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याने महिलांचा वाढता ओघ उत्साह वाढविणारा असल्याचे यावेळी म्हटले आहे. 

यावेळी प्रशांत वाघ, क्रीडा काँग्रेसचे प्रवीणभैय्या गीते, अमितभाऊ भांड, सुजित जगताप, योगेश जयस्वाल, साहिल शेख, सोमनाथ गुलदगड, शबाना सय्यद, शाहीन बागवान, अनिल गायकवाड, अजय मिसाळ, सिद्धेश्वर झेंडे, शंकर आव्हाड, शरीफ सय्यद, अक्षय पाचारणे, संजय भिंगारदिवे,भाऊसाहेब डांगे आदी उपस्थित होते. निजामभाई जहागीरदार यांनी सूत्रसंचालन केले. आभार ॲड.अक्षय कुलट यांनी मानले. 

Post a Comment

0 Comments