नगर बुलेटीन २७ -१२-२०२०

 नगर बुलेटीन २७ -१२-२०२० 

जीवन संगीत ग्रुप आयोजित ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ संपन्न

फेसबुक लाईव्ह कार्यक्रमास प्रचंड प्रतिसादासह लाईक्सचा पाऊस

    वेब टीम  नगर : अहमदनगर येथील जीवन संगीत ग्रुपच्यावतीने ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हा जुन्या चित्रपट गीतांवर आधारिक किशोर कुमार - कुमार सानू यांच्या गीतांचा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम नुकताच शांती ऑडिओ लाईव्ह या फेसबुक पेजच्या माध्यमातून संपन्न झाला. या कार्यक्रमास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जुन्या चित्रपट गीतांच्या अविट गोडीचे गारुड आजही रसिकांच्या मनावर कायम आहे हे सिद्ध झाले. या लॉकडाऊनच्या काळात थिएटरमध्ये जावून कार्यक्रमाचा आनंदास रसिक मुकले आहेत. त्यामुळेच जीवन संगीत ग्रुपने कार्यक्रम करण्याचे ठरविले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रथमच १००एम.बी.इंटरनेट स्पीडचा वापर करुन हायडेफीनेशन व्हिडिओ ऑडिओद्वारे दर्जेदार कार्यक्रम सादर झाला.

     कार्यक्रमात अहमदनगर येथील प्रसिद्ध गायक संदिप भुसे व औरंगाबाद येथील पार्श्‍वगायिका संगिता भावसार यांनी किशोर कुमार व कुमार सानू यांची खास युगलगीते सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात किशोर कुमार यांच्या ज्युली चित्रपटातील ‘दिल क्या करे’ या गीताद्वारे संदिप भुसे यांनी केली. त्यानंतर कुमार सानू यांच्या ‘एक लडकी को देखा’ या अतिशय श्रवणिय गीताला कमेंटस्चा पाऊस पडला.

     संदिप भुसे व संगीता भावसार यांनी ‘आपकी आँखोंमें कुछ... दिल है कि मानता नही..., तेरा दिल भी..., तेरे हम ओ सनम..., नजर के सामने..., धिरे धिरे से मेरे...,  जबसे तुमको देखा है समन..., अशी बहारदार रोमॅटिक युगलगीते सादर केली. ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ या यॉडलिंगवर आधारिक अंदाज या चित्रपट गीताने संदिप भुसे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांती ऑडिओचे राजू ढोरे, दिनेश घेवरे, अभिनंदन ढोरे, फरहान शेख, स्क्रिप्ट रायटर वाजीद खान यांनी विशेष परिश्रम घेतले. रसिकांच्या उंदड प्रतिसादामुळे दर शनिवारी अशा मैफिलींचे आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी संदिप भुसे यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इंग्लडहून आलेल्यांच्या संपर्कातील लोकांना भोंग्याद्वारे तपासणीचे आवाहन करावे  

 डॉ. परवेझ अशरफी : एमआयएमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  वेब टीम  नगर : अहमदनगर शहरात इंग्लंड येथून आलेल्या नागरिक व त्यांचे संपर्कात आलेले अहमदनगर येथील जनतेला शोधण्यासाठी अहमदनगर शहरात फिरत असलेली घंटा गाडीचा व भोंग्याचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात गाडी फिरवण्यात याव्यात अशी मागणी एम.आय.एम. जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याकडे केली आहे.

     मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  सद्या अहमदनगर शहरात पहिल्या तुलनेत कोरोना रुग्ण कमी आढळत असले तरी. कोरोना चे नवीन विषाणू काही देशात आले असल्याचे आणि त्या देशात परत लॉकडाऊन केले असल्याचे प्रसार माध्यमातून समजते. त्याच बरोबर इंग्लंड या देशातही कोरोनापेक्षा भयंकर विषाणू आल्याचे समजते. काही दिवसापूर्वी भारतात काही नागरिक विदेशातून भारतात आले असून त्यात इंग्लंड येथून ही नागरिक आले आहे. त्यातील ११ नागरिक इंग्लंड येथून आपल्या अहमदनगर शहरात आले आहे.

    ज्या प्रमाणे कोरोना काळात अहमदनगर महानगरपालिकेने घंटा गाडीचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात तब्लीग जमात आणि त्यांच्या संपर्कात आलेले नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आव्हान केले होते. तसे न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केले गेले. त्याच पद्धत्तीने आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने आपण राज्यात जिल्हाधिकारी व  महानगरपालिका आयुक्त यांनी शहरात अहमदनगर शहरात फिरत असलेल्या कचरा गाडीचा म्हणजेच घंटागाडी चे स्पिकरचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात त्या गाडी फिरवाव्या आणि जनतेला आव्हान करावे की, जे इंग्लंड येथून आलेले नागरिकांच्या संपर्कात आले त्यांनी स्वत:हून कोरोना चाचणी करावी अन्यथा त्यांचेवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येईल.

     आपण असा आदेश काढला तर अहमदनगर मधील जे कोरोना रुग्ण कमी झाले आहे, ते पुन्हा वाढणार नाही अशी खात्री  अहमदनगरचे नागरिकांना होईल.  त्याचा बरोबर आपण येथील अधिकारी व  प्रसार माध्यमांचेही उपयोग करावे, असे आदेश द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सावित्री उत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी अविनाश घुले

 वेब टीम नगर : महाराष्ट्र राज्य हमाली मापाडी महामंडळाचे सहचिटणीस व अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष, नगरसेवक अविनाश घुले यांची सावित्री उत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती विचारधाराचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले, संगीताताई गाडेकर व श्रीकांत वंगारी यांनी दिली.

     विचारधारा गेल्या तीन वर्षापासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ३ जानेवारी हा ‘सावित्री उत्सव’ या नावाने राष्ट्रीय सण म्हणून साजरा करीत आहे. सावित्री उत्सव हा देशाचा महोत्सव व्हावा असा प्रयत्न देशभरातील कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्या शहरात सावित्रीबाई फुले शिकल्या त्या अहमदनगर शहरात सावित्री उत्सव मोठ्या प्रमाणत करण्याचा मानस असल्याने नगरसेवक अविनाश घुले यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

     दिवंगत शंकरराव घुले यांच्या नंतर अविनाश घुले यांनी गेल्या अनेक वर्षापासून श्रमिक, कष्टकरी, माथाडी कामगार, बांधकाम कामगार, शेतकरी, टॅक्सी, रिक्षा ड्रायव्हर, पथारी व्यवसायिक, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. जातीय अत्यचार विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातूनही कार्यरत आहे. त्यांच्या या कार्याचा आलेख पाहून विचारधाराने सावित्री उत्सवाचे पहिले  स्वागताध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दि३ जानेवारी ते दि ३०जानेवारी (म.गांधी स्मृतिदिन)पर्यंत  जाहीर अभिवादन सोहळा, सावित्री-फातिमा पुरस्कार, व्याख्याने, अंक पुस्तक प्रकाशने असेविविध उपक्रम करण्यात येणार आहे, अशी माहिती विठ्ठल बुलबुले व संगीताताई गाडेकर यांनी दिली.

       स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कष्टकरी कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे, राष्ट्र सेवा दलाचे संघटक बापू जोशी, विवेक पवार, शिवाजी नाईकवाडी आदींनी अविनाश घुले यांचे अभिनंदन केले व अहमदनगर जिल्ह्यातून स्वागत होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मानसिक आरोग्याबाबत भारत आजही अंधारयुगात : डॉ वटवानी

वेब टीम नगर : तातडीच्या उपचारांची प्रतीक्षा असलेले १९ कोटी मनोरुग्ण ,  ८५ टक्के जिल्ह्यात एकही मानसोपचार तज्ञ उपलब्ध नसणे तसेच मानसिक आजारी माणसांचा होणारा सर्रास  छळ , घृणा आणि सामाजिक बहिष्कार अशी भारताची भयावह स्थिती आहे.मानसिक आरोग्याबाबत भारत आजही अंधारयुगात असताना तुलनेने क्षुल्लक काम असताना पुरस्कार स्वीकारताना लाज वाटते ,असे  प्रतिपाद नरॅमन मॅगसेसे पुरस्कार सन्मानित डॉ. भरत वटवानी यांनी येथे केले.

महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने स्नेहालय परिवाराने ‘बा आणि बापू पुरस्कार’ सुरू करण्यात आले. पहिल्या बापू पुरस्काराने मानसोपचार तज्ञ डॉ. वटवानी आणि बा पुरस्काराने बुलढाणा येथील सेवासंकल्प संस्थेच्या संचालिका  आरती नंदू पालवे यांना सन्मानित करण्यात आले. रूपाली मुनोत, बालकल्याण संकुल(केडगाव , अहमदनगर) येथे  पद्मश्री पोपटराव पवार, पंजाब सरकार मधील कमिशनर ऑफ स्टेट टॅक्सेस नीळकंठ आव्हाड ,ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक महावीर जोंधळे, राष्ट्रपती पुस्कार प्राप्त ध्वनी अभियंता कामोद खराडे , इंदुमती जोंधळे यांनी हा पुरस्कार प्रदान केला. ५०हजार रुपये आणि सन्मान पत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ.नीरज करंदीकर यांनी डॉ.वटवानी यांची तर समुपदेशक दीपा निलेगावकर यांनी आरती पालवे यांची प्रकट मुलाखत घेतली.

कर्जत (जिल्हा रायगड) श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन, स्थापन करून दहा हजारांवर मानसिक आजारी रुग्णांना डॉ. वटवानी यांनी संपूर्ण बरे केले. त्यांच्या निरंतर औषधोपचार आणि आधाराची सोय करून त्यांच्या घरी त्यांना पून:स्थापित करण्याचे अतुल्य काम मानसोपचारतज्ञ वटवानी यांनी केले. त्यासाठी त्यांना जगातील प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार वर्ष २०१८ मध्ये मिळाला होता. चिखली (जि. बुलढाणा )येथे मानसिक आजारी रुग्णांची सेवा-सुश्रुषा आणि कौटुंबिक पुनर्वसन  आरती आणि नंदू पालवे या दांपत्याने कूठली ही संसाधने आणि पाठबळ नसताना केली.

अहमदनगर शहर आणि पंचक्रोशी बेवारस मनोरुग्ण मुक्त करण्यासाठी सर्व मानसोपचार तज्ञ ,इतर डॉक्टर,संस्था आणि संवेदनशील नागरिकांनी एकत्रित काम करावे असे आवाहन वटवानी आणि पालवे यांनी मुलाखतीत केले.याच उद्देशाने निर्माण होणारा मानसग्राम प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल ,असेही त्यांनी नमूद केले.पुणे जिल्ह्यातील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक आणि माजी आमदार श्‍यामकांत दामोदर मोरे यांची यंदा जन्मशताब्दी  आहे. सिताबाई मांढरे या एक सामाजिक जाणीव संपन्न गृहिणी होत्या. या दोघांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे कुटुंबीय  भारती आणि  कीर्ती श्यामकांत मोरे यांनी दिलेल्या ठेवीतून ‘बा आणि बापू पुरस्कार’ यापुढे दिले गेले.

महावीर जोंधळे यांनी परिचयात नमूद केले की, स्व.श्यामकांत मोरे आमदार असून  सायकल वर फिरायचे, २ खोल्याच्या घरात राहायचे.त्यांची पत्नी इंदिराबाई शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत राहिली.आपल्या गरजा कमी आणि चारित्र्य शुद्ध ठेवणाऱ्या मोरे यांचा वारसा आज राजकारणातून लुप्त झाला आहे. नितीहिन झालेल्या राजकारणात महात्मा गांधी प्रत्यक्ष जगणाऱ्या स्व.श्यामकांत मोरे यांची स्मृती प्रेरक ठरेल,असे जोंधळे म्हणाले. डॉ.दया भोर यांनी सूत्रसंचालन केले.राजीव कुमार यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 दीन-दुबळे, मागासवर्गीयांना  संरक्षण देण्याचे काम आरपीआयने केले 


अमित काळे : वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचा आरपीआयमध्ये प्रवेश

भिंगारला आरपीआयच्या सभासद नोंदणींचा प्रारंभ

वेब टीम नगर : भिंगार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. युवक शहराध्यक्ष अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली भिंगारमध्ये पाचशे सभासदांची नोंदणी करुन वंचित बहुजन आघाडीचे युवक शहराध्यक्ष विशाल साबळे, अनिकेत मोहिते, शिव भोसले, संदीप ससाणे, नागेश साठे यांचासह दोनशे युवकांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला.

आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिंगार येथील इंदिरानगर परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी भगवान गौतम बुध्द, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, युवक शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक राहुल कांबळे, आय.टी. सेल संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, धम्ममित्र दिपक अमृत, दिपक गायकवाड, महादेव भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, शफीक मोघल, संतोष सारसर, दया गजभिये, हर्षल कांबळे, लखन आढाव, गौतम कांबळे, शुभम ससाणे आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवक शहराध्यक्ष अमित काळे म्हणाले की, महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. हे अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयच्या माध्यमातून दीन-दुबळे, मागासवर्गीयांना एक प्रकारे संरक्षण देण्याचे काम केले जात आहे. आजही मागासवर्गीयांना हक्काच्या मागण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. इंदिरानगर भागात अनेक प्रश्‍न असून, या भागात दुर्बल घटक राहत असल्याने त्यांना न्याय देण्यास कोणताही पक्ष पुढाकार घेत नाही. अशा दुर्बल घटकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आरपीआय कटिबध्द असून, या भागातील प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. तसेच एकजूटीने संघटन करुन अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याचे त्यांनी आवाहन केले. आरपीआय मध्ये प्रवेश करणार्‍या व सभासद झालेल्या युवकांचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देशात सर्वात कमी वयाची युवती महापौर झाल्याबद्दल

वर्धापन दिनी भाकपचा विजयी जल्लोष

वेब टीम नगर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा९५वा वर्धापन दिन व कॉ.आर्या राजेंद्रन ही देशातील सर्वात कमी वयाची युवती महापौर झाल्याबद्दल बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालया समोर फटाके वाजवून विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी भाकपचे जिल्हा सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रा.डॉ.महेबुब सय्यद, लालबावटा विडी कामगार संघटनेच्या भारती न्यालपेल्ली, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे रामदास वागस्कर, अंबादास दौंड, भैरवनाथ वाकळे, अ.भा. किसान सभेचे विजय केदारे, दत्ताभाऊ वडवणीकर, बाळासाहेब सागडे, संतोष गायकवाड, सतीश पवार, अरूण थिटे, कार्तिक पासलकर, चंद्रकांत माळी, सुनिल ठाकरे, अनिल माळी, आसाराम भगत, प्रशांत चांदगुडे आदी उपस्थित होते.

केरळ येथील थिरूअनंतपुरम महानगरपालिकेमधे देशातील सर्वात कमी वयाची युवती महापौर म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कॉम्रेड आर्या राजेंद्रन यांची नुकतीच निवड करण्यात आली. कोणताही राजकिय वारसा नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातुन त्या पुढे आल्या आहेत. या विजयाचा जल्लोष भाकपच्या वर्धापनदिनी करण्यात आला.

पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकित अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, घराणेशाही प्रस्थापितांविरोधात भाकप लढा देत आहे. तत्त्वनिष्ठा बाळगून राजकारणात देशातील युवकांना नेतृत्व देण्यासाठी भाकप कटिबध्द आहे. युवकांच्या माध्यमातून देशात बदल घडणार असून, हा विचार घेऊन देशातील सर्वात कमी वय असलेल्या युवतीला महापौर पदी विराजमान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कॉ. महेबुब सय्यद व गोकुळ बिडवे यांनी आपल्या भाषणात सत्ताधार्‍यांवर निशाना साधला. प्रास्ताविकात रामदास वागस्कर यांनी भाकप पक्षाची ध्येय-धोरणे व उद्दीष्टे सर्वां समोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहिरनाथ वाकळे यांनी केले. आभार अंबादास दौंड यांनी मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments