नगर टुडे बुलेटिन २५-१२-२०२०

 नगर टुडे बुलेटिन २५-१२-२०२०


  टाळेबंदीत माणसे दुरावत असताना लंगर सेवेने माणुसकीची भावना जागृत केली 

आ.संग्राम जगताप : घर घर लंगर सेवेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हरजितसिंह वधवा यांचा गौरव

वेब टीम नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात मागील सात ते आठ महिन्यांपासून दीन-दुबळे व गरजूंची भुक भागविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करुन सामाजिक कार्याचा एक वेगळा ठसा उमटविणारे हरजितसिंह वधवा यांचा नगर- औरंगाबाद रोड येथील टॉपअप पेट्रोल पंम्प येथे गौरव करण्यात आला. आमदार संग्राम जगताप व श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते वधवा यांना गौरविण्यात आले. यावेळी जनक आहुजा, प्रितपालसिंग धुप्पड, अनिश आहुजा, जतीन आहुजा, तरन नारंग, किशोर मुनोत, अमरजितसिंग वधवा, मनयोगसिंग माखिजा, सरबजितसिंग अरोरा, निप्पू धुप्पड, अभिमन्यू नय्यर, राहुल बजाज, कुकरेजा, विपुल शहा, सुनिल छाजेड, मोहन चोपडा, मनोज मदान, अतुल डागा, धनेश खत्ती, दिनेश भाटीया, राजा नारंग, बलजित बिलरा, सनी वधवा, वहाब सय्यद आदिंसह घर घर लंगर सेवा ग्रुप, तिरंगा ग्रुप व जीएनडी सेवा ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

प्रास्ताविकात जनक आहुजा म्हणाले की, संकटकाळात घर घर लंगरसेवेने गरजूंना आधार देण्याचे कार्य केले. टाळेबंदीत हरजितसिंह यांच्या पुढाकाराने टॉपअप पेट्रोल पंम्प येथून गरजूंना दोन वेळचे जेवणाचे डबे पुरविण्याची सेवा सुरु झाली. ही सेवा पुढे लंगर सेवेच्या रुपात पुढे येऊन लाखो लोकांची भूक भागविण्याची माध्यम बनल्याचे त्यांनी सांगितले.  

आ. संग्राम जगताप म्हणाले की, कोरोनात माणसे माणसापासून दुरावत असताना घर घर लंगर सेवेने सामाजिक कार्य उभे करुन माणुसकीची भावना जागृत केली. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेकांना नोकर्या गमवाव्या लागल्या. अशा परिस्थितीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च लाखो लोकांची भूक भागवली. तर परप्रांतात घरी जाणार्‍या नागरिकांना एक प्रकारे आधार दिला. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शहरात काढा वाटपाचा उपक्रम घेऊन कोरोनाचे संकट थोपवण्याचे कार्य केले. लंगर सेवेच्या सेवादाराची टिम हरजितसिंह वधवा यांनी उभी करुन त्यांना एक प्रकारे दिशा देण्याचे कार्य केले. शहराच्या इतिहासात सामाजिक कार्यामध्ये घर घर लंगर सेवेचे कार्य विसरता येणारे नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांनी घर घर लंगर सेवेचे आपण स्वत: एक घटक राहून कार्य केले. हे सामाजिक कार्य जवळून पाहिल्याने भावनेच्या पलिकडे शब्दात न मांडता येणारी ही सेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हरजितसिंह वधवा यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या गौरव सोहळ्यात वधवा यांचा उपस्थितांनी सत्कार करुन अभिष्टचिंतन केले. उपस्थितांचे आभार अनिश आहुजा यांनी मानले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सुरवि डिजिटल लॅबच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त दररोज २० बक्षिसे जिंकण्याची संधी

     वेब टीम नगर: दि.२३ डिसेंबर रोजी सुरवि डिजिटल लॅब आपला आठवा वर्धापन साजरा ककरतांना नगरकरांसाठी रोज २० बक्षिसे जिंकण्याची संधी घेऊन आले आहे. वर्ष २०२० ला निरोप देतांना आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सुरवि डिजिटल लॅबने दि.२३ डिसेंबर पासून आपल्या फेस बुक पेज वर दररोज एक प्रश्‍न विचारले जाणार असून, त्याचे उत्तर आपल्या सोप्या भाषेत फेसबुक पेजवर किंवा मो.९१-९२०९६६००३० या व्हॅटस्अप क्रमांकवर द्यावयाचे आहे. बरोबर उत्तर देणार्‍यांना दररोज २० बक्षिसे जिंकण्याची संधी नगकरांसाठी सुरवि डिजिटल लॅब देणार आहे.

     सुरवि डिजिटल लॅब म्हणजे फोटो आणि वैयक्तिक गिफ्ट आर्टिकलसाठी चितळे रोड वरील प्रसिद्धदालन आहे . अनेक वर्षांपासून नगरकरांचे लग्न सोहळा असो वाढदिवस असे अनेक कार्यक्रमांचे फोटो किंवा अल्बम, गिफ्ट आर्टिकल्स्, डेकोरेटीव्ह वस्तूंसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नगरकरांच्या सेवेत सदैव अग्रगण्य आहे.

     प्रश्‍न समजण्यासाठी सुरवि डिजिटल लॅबच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज ला लाईक किंवा मो.९२०९६६००३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सुरवि डिजिटल लॅबद्वारे करण्यात आले आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 माथाडी कामगारांना रु. ५ लाख विमा सुरक्षा -अविनाश घुले

            वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यातील २४१० नियमित पगार घेणाऱ्या माथाडी कामगारांना अहमदनगर माथाडी कामगार मंडळाकडून कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास रु.५ लाख अपघात विमा योजनेचा लाभ त्यांचे कुटुंबीयास मिळणार आहे. तसेच रु.१ लाखापर्यंत वैद्यकीय खर्चासाठी विमा योजना लागू करण्यात आल्याचे अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस कामगार नेते अविनाश घुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

           यापूर्वी माथाडी कामगारांना रु.३ लाख अपघात विमा व रु. ७५ हजार पर्यंत वैद्यकीय विमा योजना घेण्यात आली होती. परंतु वाढत्या महागाईचा विचार करता माथाडी मंडळाचे अध्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त  चंद्रकांत राऊत साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्ह्यातील माथाडी कामगारांना रु.५ लाख अपघात विमा व रु.१लाख पर्यंत वैद्यकीय विमा योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यास माथाडी मंडळाचे अध्यक्ष कामगार आयुक्त श्री.चंद्रकांत राऊत साहेब यांनी मंजुरी देऊन दि. १४ डिसेंबर-२०२० पासून जिल्ह्यातील माथाडी कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंबीयास  रु.५ लाख अपघात विमा व रु.  १ लाख पर्यंत वैद्यकीय खर्चासाठी विमा योजना लागू करून या विमा योजनेचा संपूर्ण हाप्ता अहमदनगर माथाडी मंडळाने भरला आहे.  याकामी माथाडी मंडळाचे निरीक्षक सुनील देवकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे अविनाश घुले यांनी सांगितले. या विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील २४१० कार्यरत म्हणजेच मंडळात नियमित पगार भरणाऱ्या माथाडी कामगारांना मिळणार आहे.  

 याबाबत सविस्तर माहिती देताना अविनाश घुले यांनी सांगितले की अहमदनगर शहर व जिल्ह्यातील मार्केटयार्ड, किराणा ग्रोसरी बाजार, ट्रान्सपोर्ट, रेल्वे मालधक्के, वेअरहाऊस, शासकीय व निमशासकीय गोदामे यामध्ये काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांना माथाडी कायद्याचे संरक्षण मिळाले असून या कायद्यामुळे कामगारांचे जीवनात स्थैर्य प्राप्त झाले असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. माथाडी मंडळात नोंदीत असणाऱ्या व नियमित पगार घेणाऱ्या माथाडी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युइटी, दिवाळी बोनस, वैद्यकीय सुविधा, अपतकालीन आर्थिक मदत, विमासुरक्षा यासह महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या विविध फायद्यांचा लाभ मिळत आहे. असे सांगून माथाडी मंडळाचे अध्यक्ष व सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत  व निरीक्षक सुनील देवकर यांचे आभार व्यक्त केले आहे.

           सर्व माथाडी कामगारांनी परस्पर मालकाकडून मजुरीची रक्कम न घेता आपली दरमहा होणारी मजुरी व लेव्ही माथाडी मंडळात भरणा करून पगार घ्यावा व जास्तीत जास्त कामगारांनी माथाडी मंडळात कामगार नोंदणी करून माथाडी कामगार मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन  मंडळाचे अध्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत  व हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वडारवाडी मधील गरजू महिलांना व्यावसायीक प्रशिक्षण अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

स्पर्श सेवाभावी संस्था व सामाजिक समता विचारधारा फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम

वेब टीम नगर : शहरात विविध भागात काच, कागद, कचरा व भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या दुर्लक्षित महिला वर्षानुवर्ष उपेक्षित जीवन जगत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी स्पर्श सेवाभावी संस्था व सामाजिक समता विचारधारा फाउंडेशने पुढाकार घेतला असून शहरात विविध भागातील गरजू महिलांना मदत करत आहेत. स्पंदन उपक्रमांतर्गत आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या वडारवाडी मधील वीस लाभार्थी महिलांची निवड करण्यात आली असून त्यांना शिवणकाम, विणकाम, लोणचे पापड तयार करणे, मसाले बनवणे, ब्युटी पार्लर, मेहंदी इत्यादी व्यवसायांच्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला सुद्धा बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. कागद कचरा गोळा करणाऱ्या २० गरजू महिलांना करोना पासून बचावासाठी देण्यात आलेल्या सेफ्टी किट मध्ये सॅनिटरी पॅड, हॅण्ड ग्लोज, गमबुट, हॅण्ड वॉश, मास्क, कपड्याचा व अंगाचा साबण इत्यादी महत्वाच्या वस्तू देण्यात आल्या. अशी माहिती स्पर्श संस्थेचे सचिव प्रवीण साळवे यांनी दिली.

          भिंगार येथील वडारवाडी येथे राबवण्यात आलेल्या उपक्रमामध्ये सामाजिक समता विचारधारा फाउंडेशन चे अध्यक्ष सुनिल भोसले,  मीना भोसले, संजय ससाणे, पै. गणेश घोरपडे आदी सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी संजीवनी मेडिकल स्टोअर वडारवाडी, ॲड. जयदीप देशपांडे व अतुल महानौर, राजेंद्र सामल यांनी सहकार्य केले. 

स्पर्श सेवाभावी संस्था, वडारवाडी व सामाजिक समता विचारधारा फाउंडेशन यांच्या वतीने आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांना दानशुरांच्या मदतीची गरज आहे. दानशुरांनी सेफ्टी किटसाठी व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संस्थेस मदत करावी. अधिक माहितीसाठी ९०७५५१२८०२, ७३८५०८४५४५  या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन स्पर्श सेवाभावी  संस्थेचे सचिव प्रवीण साळवे व सामाजिक समता विचारधारा फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील भोसले यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नवीन पिढीला उर्दू साहित्याकडे आकर्षित करण्याची आवश्यकता

 सलीम खान : मखदुम सोसायटीतर्फे उर्दू साहित्यातील  कमर कोकणी, प्रा.खलील मुजफ्फर आठवणींना उजाळा

     वेब टीम नगर : भुतकाळात अहमदनगर मध्ये उर्दू साहित्यात काम करणारे भरपूर माणसे होती. ज्यांनी भरपूर उर्दू साहित्यात कार्य केले व त्यांच्या मागे साहित्यात काम करणारी नवी माणसे तयार केली. त्यामुळे आज ती माणसे साहित्यात काम करत आहे. पण येणार्‍या नवीन तंत्रज्ञानाच्या काळात उर्दू साहित्यात काम करणारी माणसं फार कमी होत आहे. त्यासाठी सध्या कार्यरत असणार्‍या साहित्यकांनी नवीन पिढीला उर्दू साहित्याकडे आकर्षित करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उर्दू साहित्यिक व कवी सलीम खान यांनी केले.

       मखदूम सोसायटीच्या वतीने अहमदनगरचे दिवंगत उर्दू साहित्यकार व कवी कमर कोकणी व प्राध्यापक खलील मुजफ्फर यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक कवींचा मुशायरा रहमत सुलतान सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी सलीम खान, माजी प्राचार्य कादिर सर, सुफी गायक पवन नाईक, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ. कमर सुरूर, रुग्णमित्र नादिर खान, कमरुद्दिन शेख, खालील चौधरी, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद आदी उपस्थित होते.

    पुढे बोलताना सलीम खान म्हणाले, कमर कोकणी हे व्यवसायाने टेक्स्टाईल कॉन्ट्रक्टर होते. पण त्यांना उर्दू भाषेची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या साहित्यिक संघटनांच्या माध्यमातून ऊर्दू साहित्यासाठी कार्य केले. त्याचप्रमाणे प्रा.खलील मुजफ्फर यांना तर अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांना उर्दू भाषेची फार आवड होती. म्हणून त्यांनी मराठी साहित्यातील नामवंत साहित्यिकांचे साहित्य उर्दूत भाषांतर केले. त्यांच्या या कार्याचे अनेक साहित्यिकांनी भरभरून कौतुक केले.   असे सांगून अनेक मराठी साहित्यकारांच्या पुस्तकांची व नावांची यादीही सादर केली. त्याचप्रमाणे कादिर  व पवन नाईक यांनीही दिवंगत साहित्यकांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

     यावेळी झालेल्या मुशायरा मध्ये बिलाला अहमद, अ.रशिद कुरेशी, शरीफ खान, मुशताक , ॲड . मन्सूर जहागिरदार, सलीम खान, डॉ . कमर सुरूर, नफिसा हया, आसिफ, हबीब पेंटर, मुन्नवर हुसेन यांनी आपल्या रचना सादर केल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचा फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण ही करण्यात आला. ज्याला शेकडो रसिकांनी त्याचा आनंद घेतला.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ  यांनी केले. तर आभार आबीद दुलेखान यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शफकत सय्यद, तारीक शेख, सलीम खान व मगदूम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समाज हिताचे काम करणार्‍यांना पाठबळ देणे आवश्यक 

अशोकराव तुपे : श्री संत सावता माळी युवक संघ व फुले ब्रिगेड यांच्यावतीने सन्मान

वेब टीम नगर : समाजातील वंचित घटकांसाठी काम करणार्‍या अनेक संघटना आहेत. समाजातील दु:ख कमी करण्यासाठी या संघटना, व्यक्ती आपआपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. यातून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्त होत आहे. आपण करत असलेल्या कामातून संघटन करुन समाजहितासाठी काम करणार्‍या व्यक्तींच्या कार्याची दखल ही नेहमीच घेतली जात असते. हेमंत जाधव व स्वप्नील कुर्‍हे यांनी आपल्या कार्यातून समाजापुढे एक आदर्शवत काम केले याबद्दल त्यांना मिळालेला पुरस्कार हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचे कार्य पुढेही असे निरंतर सुरु राहील. त्यांच्या कार्यास पाठबळ देण्याचे काम सर्वांना करावयाचे आहे, असे प्रतिपादन श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे यांनी केले.

     श्री संत सावता माळी युवक संघ व फुले ब्रिगेड यांच्यावतीने सह्याद्री भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हेमंत जाधव व कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वप्नील कुर्‍हे यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, समता परिषद महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, फुले बिग्रेडचे अध्यक्ष दिपक खेडकर, दिग्दर्शक स्वप्नील मुनोत, प्रदेश सोशल मिडियाचे दिपक साखरे, उद्योजक संजय जाधव, आशिष भगत, संतोष हजारे, शरद कोके आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी दिपक खेडकर म्हणाले,   हेमंत जाधव व स्वप्नील कुर्‍हे यांनी मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या नि:स्वार्थ कार्याची पावती आहे. समाजासाठी ते आदर्शवत असेच आहे. त्याच्या कार्याचा उचित सन्मान झालाही आमच्या दृष्टीने गर्वाची गोष्ट आहे. समाजहित जोपासर्‍या व्यक्तींचा मागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे, त्यांच्या कार्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, यासाठी त्यांच्या कार्यात प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या सन्मानातून केले असल्याचे सांगितले.

     याप्रसंगी हेमंत जाधव व स्वप्नील कुर्‍हे यांनी सत्काराबद्दल आभार मानून सांगितले की, आपण करत असलेल्या कामाबरोबरच सामाजिक भाव जपला पाहिजे. हे आपले कर्तव्यच आहे या भावनेतून काम करत राहिले, अनेक लोक आपल्याशी जोडले जातात आणि एक चांगले काम उभे राहत असते. या सत्कारामुळे आम्हाला काम करण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.

     याप्रसंगी प्रा.माणिकराव विधाते, दत्ता जाधव आदिंनी आपल्या मनोगतातून हेमंत जाधव व स्वप्नील कुर्‍हे यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक साखरे यांनी केले तर आभार शरद कोके यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

वेब टीम नगर  : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक नुकतीच महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभाग संपर्कप्रमुख मिलिंद बागवे, मराठवाडा विभाग प्रमुख किशोर वाघ उपस्थित होते. याप्रसंगी मिलिंद बागवे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.

सुरेश झुरमुरे यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका व उद्दिष्टे समजावून सांगितली. किशोर वाघ यांनी कार्यकारिणी सदस्यांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सदस्यांची ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या.

जिल्हा कार्यकरिणीमध्ये भगवान जगताप (जिल्हा संघटक), विशाल आठवले (जिल्हा युवा संघटक), डॉ.यशवंत पाटील (जिल्हाध्यक्ष), गोरख आळेकर (जिल्हा कार्याध्यक्ष), बाबासाहेब शेलार (जिल्हा उपाध्यक्ष), गणेश सांगळे ( जिल्हा सचिव), सुदेश गायकवाड (जिल्हा कोषाध्यक्ष), संगीता मालकर (जिल्हा महिला अध्यक्षा), रघुनाथ गायकवाड (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख) तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनील जगधने, सतीश मुंतोडे, अविनाश कुटे, नागेश शिंदे, गणेश केंदळे, प्रविण बळीद, राजू काळे, योगेश महाले, नारायण डुकरे, दिपक पारखे, डॉ. जगदीश राठोड, संजय वारभोर यांची निवड करण्यात आली आहे. 

तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार आहेत, तरी संघटनेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी  भगवान जगताप (संघटक) (९९२२५८९५५३), डॉ.यशवंत पाटील (जिल्हाध्यक्ष) (८८०५०२०१२३), गणेश सांगळे (जिल्हा सचिव) (९४२०१७९५४४) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. यशवंत पाटील यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लसच्या विद्यार्थ्यांचे यश

राष्ट्रीय ओलम्पियड अबॅकस स्पर्धेत अथर्व लोटके द्वितीय

वेब टीम नगर : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लस क्लासच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये तीन विद्यार्थी चमकले असता या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

ऑक्टोबर मध्ये झालेल्या राष्ट्रीय ओलम्पियड अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लस कलासचा विद्यार्थी अथर्व लोटके याने दुसरा क्रमांक पटकावला. त्याने ३ मिनिटांत ८० पैकी ७३ गणिते सोडवले. पार्श बंब आणि आर्य गायकवाड या दोन्ही विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांना संचालक प्रतीक शेकटकर आणि संचालिका शाहीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले . 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भारतीय संविधान परिशिष्ट सातच्या केंद्रीय सुचीचा रविवारी सत्यबोधी सुर्यनामा

महिलांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणार्‍या तृप्ती देसाई यांना शक्तीकर्मा लॉरिस्टरचा सन्मान जाहीर

वेब टीम नगर : स्थानिक रेल्वेचा अधिकार राज्य सरकारला मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने भारतीय संविधानाच्या परिशिष्ट सात मधील केंद्रीय विशेष सुचीचा रविवार दि.२७  डिसेंबर रोजी सत्यबोधी सुर्यनामा करण्यात येणार आहे. तर महिलांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणार्‍या तृप्ती देसाई यांना शक्तीकर्मा लॉरिस्टरचा सन्मान देण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

भारतीय संविधानाच्या परिशिष्ट सात मधील केंद्रीय विशेष सूची मधील २२  नंबरचा रेल्वे हा विषय त्या परिशिष्टाच्या सामायिक यादीमध्ये समावेश न झाल्यामुळे देशात रेल्वेचे जाळे पसरण्यास मर्यादा आल्या आहेत. जपानसह इतर अनेक राष्ट्रांनी स्थानिक रेल्वेचे खाजगीकरण करुन जनतेला मोठ्या प्रमाणात सेवा उपलब्ध करुन दिल्या. स्थानिक रेल्वेचा अधिकार राज्य सरकारला मिळाल्यास अहमदनगर, औरंगाबाद व नाशिकला देखील मेट्रो रेल्वेसेवा उपलब्ध करता येणार आहे. नवीन रेल्वेमार्ग खाजगी गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात पसरविता येणार आहे. राज्यात खाजगी तत्वावर महामार्ग विकसीत करुन टोलनाके उभे करण्यात आले. त्याप्रमाणे देखील राज्यातील रेल्वेचा खाजगीकरणद्वारे विकास साधता येणे शक्य असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

घर बांधण्यासाठी घरकुल वंचितांच्या चळवळीत नेहमीच महिलांचा पुढाकार राहिलेला आहे. या चळवळीत पुरुष पुढे येण्यास तयार नाही. महिला निवार्‍याच्या हक्कासाठी भांडत आहे. महिलांवर घराची जबाबदारी असताना त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असून, निवांत बसून घरे मिळणार नाही. यासाठी योगदान द्यावे लागणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्यात चर्मकार समाजावर अत्याचाराचे वाढते प्रमाण चिंताजनक 

माधवराव गायकवाड :राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जनजागरण अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर नगरला प्रदेशाध्यक्षांची भेट

वेब टीम नगर : राज्यात चर्मकार समाजावर अत्याचाराचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मागील दोन ते तीन महिन्यात अनेक चर्मकार समाजातील महिलांवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. समाजाची परिस्थिती बिकट बनत असताना चर्मकार समाजातील युवकांचा रोजगार व कुटुंबाच्या उदरनिर्वाचा प्रश्‍न बिकट बनत चालला आहे. चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून मागील पाच वर्षाच्या कालावधीत एकही होतकरु युवकाचे कर्ज प्रकरण मंजूर झालेले नाही. चर्मकार समाजावर वाढते अत्याचार थांबण्यासाठी व चर्मकार विकास महामंडळास भरीव निधी उपलब्ध करुन देण्यासह समाजाच्या विविध प्रश्‍नासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची भावना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी व्यक्त केली.

 राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने समाजातील विविध प्रश्‍न शानस्तरावर मांडण्यासाठी जनजागरण अभियान सुरुवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष गायकवाड नगरमध्ये आले असता त्यांनी पदाधिकार्‍यांची भेट घेऊन जिल्ह्यातील चर्मकार समाजाच्या विविध प्रश्‍नाबाबत माहिती घेतली. यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य कैलास गांगर्डे, युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले, शहर उपजिल्हाध्यक्ष अभिनव सुर्यवंशी, उपजिल्हाध्यक्ष संतोष त्रिंबके आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

जुने बस स्थानक येथील एका हॉटेलमध्ये प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकित राज्य कार्यकारणी सदस्य कैलास गांगर्डे, युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे व शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले यांनी जिल्ह्यातील चर्मकार समाजाचे विविध प्रश्‍नांचा आढावा घेतला. अहमदनगर जिल्ह्यात संघटनेचे उत्तमपणे सुरु असलेल्या कार्याचे गायकवाड यांनी कौतुक केले.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments