साईंच्या दर्शनासाठी ऑनलाईन पास आवश्यक

 साईंच्या दर्शनासाठी ऑनलाईन पास आवश्यक 

नाताळ, दत्त जयंती निमित्त गर्दीची शक्यता लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाच्या सूचना 

वेब टीम नगर : शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर लॉकडाउन नंतर साईभक्तांना दर्शनासाठी खुले झाल्यापासून तब्बल सव्वा ३ लाख  साईभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. सध्या दररोज साधारणतः बारा हजार साईभक्तांना मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश दिला जातो . , असे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितले. नाताळ व नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी ऑनलाइन दर्शन पास मिळाल्यानंतरच दर्शनाला या, असे आवाहन संस्थानने केले आहे.

मंदिर खुले झाल्यापासून प्रत्येक गुरुवारी, शनिवारी व रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर शिर्डीत गर्दी होत आहे. सुट्टीच्या दिवशी तर वीस हजारपेक्षा जास्त लोक दर्शन काउंटरवर गर्दी करत असल्याचा अनुभव आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे कोणीही ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय शिर्डी दर्शनाला येऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या आठवड्यात नाताळ सुट्टी आहे. तर २९ व ३० डिसेंबर रोजी दत्त जयंती कार्यक्रम असून ३१ डिसेंबरला वर्ष अखेर आहे. हे सर्व पाहता शिर्डीमध्ये साईभक्तांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण कोणीही दर्शन पास ऑनलाइन घेतल्याशिवाय शिर्डीत थेट येऊ नये. कारण दररोज संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या दर्शन पास पैकी ७० टक्के पास हे ऑनलाइन असून उर्वरित पास हे ऑफलाइन पद्धतीने शिर्डीत दर्शन पास काउंटर देण्यात येतात. हे पास संपल्यावर दर्शन पास काऊंटर बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पास न मिळाल्यास भक्तांची गैरसोय होऊ शकते. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊनच कोणीही ऑनलाइन दर्शन पास घेतल्याशिवाय शिर्डीत येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments