नगर बुलेटीन २१-१२-२०२०

 नगर बुलेटीन 


शिक्षकांच्या जुनी पेन्शन लढ्याला सर्वांच्या प्रयत्नाने यश : प्राचार्य चंद्रकांत चौगुले

    वेब टीम  नगर : जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १० जुलै ची अधिसूचना अखेर शालेय शिक्षण विभागाने मागे घेतली आहे. त्यामुळे राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व अनुदानित व विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना आता दिलासा मिळाला आहे,  अशी माहिती जुनी पेन्शन समन्वय समितीचे  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा संयोजक प्राचार्य चंद्रकांत चौगुले यांनी दिली.

     दि. १० डिसेंबर २०२० रोजी शिक्षक व पदवीधर आमदारांच्या बैठकीत शिक्षणमंत्री  वर्षाताई गायकवाड यांनी अधिसूचना रद्द करण्याचा निर्णयावर सही केली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व विविध संघटनांनी  केलेल्या आंदोलनामुळे व पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले. ही अधिसूचना मागे घेतल्याबद्दल  शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड  यांचे १ नोव्हेंबर २००५पूर्वीच्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींच्या वतीने अभिनंदन होत आहे.       

     जुनी पेन्शन लागू व्हावी, यासाठी आमदार भगवानराव साळुंके, आमदार ना.गो. गाणार, अरुण कडू, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, परिषदेचे शिक्षक नेते चंद्रकांत चौगुले, बापू जगताप, सुभाष ढेपे, अध्यक्ष शरद दळवी,  विठ्ठल ढगे, सतीश कर्डीले, वसंत राऊत, संपत झावरे, प्राचार्य बाळासाहेब वाकचौरे, डी.पी. कोपणार, पांडुरंग गोणे, दिलीप रोकडे, विजय गरड, मेघा कुलकर्णी, शेख समीना, सय्यद शाहीदा, शेख परवीन, अनिता सरोदे, सुषमा नगरकर, सुरसे दादा, कोतकर सर गोसावी सर आदींनी  परिश्रम घेतले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सामाजिक भावना ठेवून समाजाने अनाथांसाठी आधार देणे महत्वाचे  :  राणीताई लंके

वेब टीम नगर : समाजाने वाळीत टाकलेल्या दुर्लक्षित घटकातील व्यक्तींना एकत्र आणणे महत्वाचे आहे. सामाजिक भावना ठेवून समाजाने अनाथांसाठी आधार देणे आवश्यक आहे. यादृष्टीने  अनाथ निराधार  जोडप्यांचे सामुदायिक  विवाह  वैष्णवी माता देवस्थान ट्रस्ट मंगल कार्यालयात  आयोजित करून स्नेहालयाने एक सामाजिक विकासाला प्रेरणा देणारी क्रांतिकारक कृती केली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन मंडळ सदस्या राणीताई लंके यांनी केले.

एच.आय.व्ही./एड्स सप्ताहनिमित्त स्नेहालय संस्था व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर    ज्योती देवरे (तहसीलदार, पारनेर),काशिनाथ दाते (सभापती, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर), ॲड. ज्योती भोसले (माजी महापौर, मालेगाव)घनश्याम बाळप (पोलीस निरीक्षक, पारनेर पोलीस स्टेशन),  मोहन बोरसे (पोलीस निरीक्षक, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन), रामदास टांगळ (अध्यक्ष, वैष्णवी माता देवस्थान मंगल कार्यालय), शरद राधाकिसन महापुरे  (सामाजिक कार्यकर्ते),बबुशा श्रीपती शिवले  (सामाजिक कार्यकर्ते),    ॲड. श्याम असावा (प्रकल्प संचालक, स्नेहाधार ) डॉ. प्रकाश शेठ (मार्गदर्शक प्रकल्प, स्नेहाधार),  प्रमोद साठे (युवानेते, हंगा)  हनीफ शेख, (अध्यक्ष, बाल कल्याण सामिती, अहमदनगर)  प्रवीण मुत्याल (बाल कल्याण समिती, अहमदनगर),  स्नेहालयाचे  पालक मिलिंद कुलकर्णी,  सुवालाल शिंगवी, अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर,  विश्वस्त जयाताई जोगदंड, संजय बंदिष्टी, राजेंद्र शुक्रे, अनंत  कुलकर्णी,  स्नेहालयाचे  सहसंचालक अनिल गावडे आदी या सोहळ्यात आप्त म्हणून उपस्थित होते.

लंके यांनी  नव दाम्प्यत्यांना आशीर्वाद देतांना योग्य ती आहार, उपचार व  काळजी घेण्याचे आवाहन केले. स्नेहालयानी अलौकिक व अनोख्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.

अनाथ - निराधार व्यक्तींसाठी  २२ नोव्हेंबर २०२०  रोजी नवी उमेद - नवी जीवन - नवी आशा याकरिता सहजीवनाची ओढ असणाऱ्यांसाठी  ऑनलाईन राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात  १५० पेक्षा जास्त वधू - वरांनी आपली नाव नोंदणी केली होती. एकूण ८  वधू - वरांनी आपले जीवन साथी निवडले त्यापैकी ४  नवे दाम्प्यत्यांचे मोठ्या दिमाखात  विवाह सोहळा पार पडला. या  विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेले वधू – वर  सातारा,  औरंगाबाद  नगर  जिल्ह्यातील तर श्रोगोंदा आणि पाथर्डी आदी तालुक्यातील होते. सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी वधू - वरांचे आप्त उपस्थित नव्हते परंतु सामाजिक जाणीव असणारे अनंत कुलकर्णी,  एम.आय.डी.सी. येथील उद्योगपती मा. रामदास टांगळ,  स्नेहालय परिवार आणि इतर संवेदनशील नागरिक यांनी ही कमी भरून काढली. वधुंचे कन्यादान  राणीताई लंके, ज्योती देवरे, शरद राधाकिशन महापुरे,  काशिनाथ दाते, बबुशा श्रीपती शिवले, मोहन बोरसे, घनश्याम बाळप, पुणे येथील शेठ परिवार  यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी वधू - वरांना शुभाशिर्वाद दिले. प्रस्ताविकतेत   जागतिक  एच. आय. व्ही./एड्स  सप्ताह निमित्त दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येते, असे स्नेहालयाचे वरिष्ठ सह संचालक अनिल गावडे  यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जागतिक  एच. आय. व्ही./एडस सप्ताह निमित्त १  डिसेंबर ते  १५  डिसेंबर २०२०   दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या सामुदायिक विवाह सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने  ॲड. ज्योती भोसले (माजी महापौर, मालेगाव) घनश्याम बाळप (पोलीस निरीक्षक, पारनेर पोलीस स्टेशन),  मोहन बोरसे (पोलीस निरीक्षक, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन),  रामदास टांगळ (अध्यक्ष, वैष्णवी माता देवस्थान मंगल कार्यालय),शरद राधाकिसन महापुरे  (सामाजिक कार्यकर्ते),  बबुशा श्रीपती शिवले  (सामाजिक कार्यकर्ते),  असे अनेक दान दात्यांनी वधू वरांसाठी संसारोपयोगी विविध वस्तू देणगी दिलीत.

सामुदायिक विवाह कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैजनाथ लोहार यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिन ढोरमले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत कुलकर्णी, सागर फुलारी, कावेरी रोहकले, विजय गायकवाड, कालिदास खेडकर, विष्णू कांबळे, अशोक अकोलकर, राहुल संत, आणि बालभवन टीम आदींनी परिश्रम घेतले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये  हॉस्पिटलचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याची मागणी

पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

वेब टीम नगर ; सर्वोच्च न्यायालयाने नुकताच सर्वसामान्यांना वाजवी किंमतीत वैद्यकिय उपचार मिळण्याचा अधिकार मुलभूत अधिकाराचा अविभाज्य घटक असल्याचा निवाडा दिला आहे. या निर्णयाचे पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वैद्यकिय उपचार मिळण्याचा अधिकार मुलभूत अधिकाराचा अविभाज्य घटक असल्याच्या निर्णय व हॉस्पिटलचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याची मागणी तसेच रुग्णपिपासू ओळखा आणि सर्वांना कळवाची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय घटनेच्या कलम२१खाली जीविताचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका वर्तमानपत्राच्या बातमीची दखल घेऊन त्याचे जनहित याचिकेत रुपांतर करुन दिलेल्या निर्णयाने गोर-गरिब रुग्णांना वाजवी किंमतीत आरोग्याचा अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अशोक भूषण, आर.सुभाष रेड्डी व एम.आर. शहा यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला आहे. वर्षानुवर्षे सर्वसामान्यांची हॉस्पिटलमध्ये परवड झाली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात अनेक हॉस्पिटलने आर्थिक लूट करुन रुग्णांचे शोषण केल्याचे अनेक प्रकरणातून उघड झाले. या शोषणाची दाद मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा असतित्वात असला तरी वेळ, पैसा जाण्याच्या भितीने कोणी दाद मागण्यास तयार होत नाही. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य रुग्णांची लूटमार होत आहे. नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी रुग्णपिपासू ओळखा आणि सर्वांना कळवाची घोषणा संघटनेच्या वतीने करण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.रुग्णशोषकांना वठणीवर आनण्यासाठी हा प्रयोग असून, शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वैद्यकिय उपचार मिळण्याचा अधिकार मुलभूत अधिकाराचा अविभाज्य घटक असल्याचा निर्णय व हॉस्पिटलचे दरपत्रक लावणे गरजेचे आहे. ज्या रुग्णांचे शोषण झाले आहे. त्यांना ग्राहकमंचच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबध्द असून, त्यांनी संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केले आहे. सर्वसामान्य रुग्णांची परवड थांबण्यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, प्रमिला घागरे, सुरेखा आठरे, बाबासाहेब सरोदे, पोपट भोसले आदि संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 नागोरी मुस्लिम जमातच्या स्वयंघोषित ट्रस्ट्रींचा गैरकारभार

 

निसार बाटलीवाला यांचा पत्रकार परिषदेत आरोप

वेब टीम नगर : नागोरी मुस्लिम जमातच्या स्वयंघोषित ट्रस्ट्रींनी गैरकारभार केला असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निसार पवार (बाटलीवाला) यांनी केली. सदर स्वयंघोषित ट्रस्टी गुन्हेगार प्रवृत्तीचे असून, त्यांच्या आशिर्वादाने लालटाकी येथील ट्रस्टच्या जागेवर अनाधिकृतपणे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आल्याचा आरोप निसार बाटलीवाला यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

शहरात लालटाकी अप्पू हत्ती चौकात पंडित नेहरू यांचे स्मारक आहे. नागोरी मुस्लिम जमातच्या स्वयंघोषित तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ट्रस्टींनी सदर जागेवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करून त्याचे भाडे वसुली केली आहे. महापालिकेला पंडित नेहरू पुतळ्याच्या परिसरातील अनाधिकृत अतिक्रमण काढण्यात वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. स्मारकाच्या जागेवर दारुड्यांचा उपद्रव वाढला आहे. नागोरी मुस्लिम जमातच्या कब्रस्तानमध्येही चोरटे दिवसभरात चोरी करून आणलेला माल रात्री जमा करतात. नंतर गुन्हेगार प्रवृत्तीचे स्वयंघोषित ट्रस्टी हे सदरचा माल विकत घेतात. प्रशासनाने या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर योग्य ती कारवाई करण्याचा मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

अहमदनगर उर्दू हायस्कूलमध्ये व मिजगर कॉलेजमध्ये शिक्षक भरतीमध्ये स्वयंघोषित ट्रस्टी व चेअरमन तनवीर खान, मुनीर खान काटेवाले या लोकांनी भ्रष्टाचाराच्या मार्गाने भरती करुन घेतली. जुना सर्व्हे नं. ११९ व ११८ ही जागा चुन्नू बेग यांना इनामी मिळाली आहे. या जागेची किंमत कोटी रुपये असल्यामुळे स्वयंघोषित ट्रस्टी इमरान शफी अहमद, इमरान जमीर खान, माजिद खान, खलील खान, मुनीर खान, तन्वीर खान काटेवाले, फरहान खान या सर्व लोकांनी जागेची लेन-देन करण्याचा प्रयत्न केला. इम्रान खान यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. तसेच माजीद खान यांच्यावर नगर व शिरुर पोलीस स्टेशन मध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहे. नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहे. लालटाकी येथील कब्रस्तानमध्ये अनाधिकृतपणे वाहनांमध्ये घरगुती गॅसची रिफिलिंग केली जाते. या जागेत गुंड व आरोपी प्रवृत्तीच्या स्वयंघोषित ट्रस्टींच्या अनाधिकृत व्यवसाय चालत असल्याचा आरोप बाटलीवाला यांनी केला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोविडच्या वैद्यकिय बिलांची परिपूर्ती मिळावी

बाबासाहेब बोडखे : २ सप्टेंबर पूर्वलक्षी प्रभावाची तारिख कोरोनाग्रस्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर अन्यायकारक ठरणारी 

वेब टीम नगर : राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यापासून कोरोना आजाराचा समावेश गंभीर स्वरुपाच्या आजारांमध्ये करावा आणि मार्च पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोविडच्या वैद्यकिय बिलांची परिपूर्ती मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे व संघटनमंत्री सुहास हिर्लेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पत्रव्यवहार केल्यानंतर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने १७डिसेंबर२०२० रोजी कोविड आजाराचा शासनाने ठरवलेल्या गंभीर आजारांच्या यादीत समावेश केला आहे. परंतु हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे दि.२ सप्टेंबर २०२०पासून लागू केल्याचे नमूद केले आहे. शिक्षक, शिक्षकेतर यांना जून महिन्या पासून आठवड्यातून २ दिवस उपस्थिती सक्तीची केली होती. शासकीय कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी २ सप्टेंबर पासून मोठ्या प्रमाणात कार्यालयात येऊ लागले. यांचा संदर्भ संबंधित जी.आर. मध्ये दिला असून, हा जी.आर. 2 सप्टेंबर पासून लागू केल्याचा आरोग्य विभागाचा तर्क दिसतो. पण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्या अगोदरही मोठ्या प्रमाणात कर्तव्यावर होते. कोरोनाच्या संकटकाळात शिक्षक, शिक्षकेतर यांना ड्युटीवर लावण्यात आले. यामध्ये अनेक शिक्षक व शिक्षकेतर बाधित झाले. त्यांच्या परिवाराला वैद्यकीय परिपूर्ती पासून दूर ठवणे हा अन्याय आहे. मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. हजारो कर्मचारी कोरोनाने बाधित झाले. त्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. खाजगी रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार करताना बिल वसूल केले. याचा आर्थिक भूर्दंड कर्मचार्‍यांना सोसावा लागला. नोकरदार कर्मचारी या बिलांमुळे कर्जबाजारी झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे २ सप्टेंबर २०२० ही पूर्वलक्षी प्रभावाची तारिख कोरोनाग्रस्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर अन्यायकारक ठरणारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च पासून सुरु झाला व या कोरोनाच्या संकटकाळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी योगदान दिले आहे. कोरोनाच्या बिलाची परिपूर्ती मिळण्यासाठी कोणतीही दिनांकाची अट न ठेवता मार्च पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोविडच्या वैद्यकिय बिलांची परिपूर्ती मिळण्याची मागणी करण्यात आली असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------



Post a Comment

0 Comments