जेष्ठ नाट्यकर्मी सतीश लोटके पुन्हा रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर सदस्य

जेष्ठ नाट्यकर्मी सतीश लोटके पुन्हा रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर सदस्य 

वेब टीम नगर - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती, मुंबईचे सहकार्यवाह व बालरंगभूमी परिषद, मुंबईचे प्रमुख कार्यवाह आणि अहमदनगर जिल्हा शाखेचे संस्थापक अध्यक्ष सतीश लोटके यांची रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ (सेंन्साँर बोर्ड) सदस्यपदी निवड झाली लोटके यांना हा मान दुसऱ्यांदा मिळाला आहे.यापूर्वी ते २०१२ या काळात सदस्य होते.

        अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील नाट्य सांस्कृतिक चळवळ,बालनाट्य चळवळ तसेच रंगभूमीवरील हौशी कलाकारांच्या हक्कासाठी लढा उभारणारे नाट्यकर्मी म्हणून गेल्या ३७ वर्षांपासून सतीश लोटके यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अभिनय,दिग्दर्शनाचे अनेक पारितोषिके सतीश लोटके यांना प्राप्त झाले आहेत. राज्यातील सर्व एकांकिका स्पर्धा,पथनाट्य स्पर्धा गाजविल्या असून अहमदनगर जिल्ह्यात नाट्य परिषदेच्या माध्यमातून एकांकिका,बालनाट्य,एकपात्री अभिनय,स्वागत स्पर्धा,अभिवाचन स्पर्धांचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे.काही निवडक टीव्ही मालिका मराठी चित्रपटात देखील त्यांनी अभिनय केला आहे.अहमदनगर येथील २००३ साली ८३ मराठी नाट्य संमेलन सतीश लोटके यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात  झाले.

       हौशी रंगभूमीवरील कलाकार,तंत्रज्ञ आणि सर्वच घटकांना मुख्य प्रवाहात संधी मिळावी,त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांची कला समृद्ध व्हावी म्हणून अहोरात्र कार्यरत असणाऱ्या लोटके यांना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर (सेन्सॉर बोर्ड ) मिळालेली संधी ही अहमदनगर जिल्हाचा सन्मान असून हौशी लेखकांना हक्काचा माणूस त्यांच्या रुपात उपलब्ध असणार आहे अशी भावना रंगकर्मींमध्ये व्यक्त होत आहे.

       सतीश लोटके यांच्या निवडीबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक शशिकांत नजान, नाट्य परिषद नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, नियामक मंडळ सदस्य सतीश शिगंटे, शाम शिंदे, अनंत जोशी, क्षितीज झावरे, संजय घुगे यांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments