बोठे अटकपूर्व जामीन प्रकरण : दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण ; निकाल उद्या देणार

 बोठे अटकपूर्व जामीन प्रकरण 

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण ; निकाल उद्या देणार 

वेब टीम नगर :  रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे व  सागर भिंगारदिवे हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, असा दावा सरकार पक्षातर्फे कोर्टात करण्यात आला. तर भिंगारदिवे याने जुन्या रागातून बोठेला अडकविल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालय बुधवारी  निकाल देणार आहे.

बाळ बोठेच्या वतीने करण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर.नातू यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपीतर्फे ॲड . महेश तवले यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी बोठे याने  'हनी ट्रॅप'संबंधी वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यात  एका भागात सागर भिंगारदिवे याच्याबद्दल लिहिले होते. त्याचे उद्योग उघडकीस आल्याने त्या रागातून त्याने या गुन्ह्यात बोठेचे नाव घेतले आहे.  असल्याचे  तवले यांनी सांगितले.

जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी , या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हनी ट्रॅपचेच कारण आहे का हेही अद्याप पुढे आलेले नाही. केवळ भिंगारदिवे याने नाव घेतल्याने  बोठेला आरोपी करण्यात आले नाही. तर पोलिसांना त्याच्या विरोधात सबळ पुरावे मिळालेले आहेत.जर भिंगारदिवे आणि बोठे यांच्यात वितुष्ट होते तर ते घटनेच्या काळात तसेच  २४ नोव्हेंबर व घटना घडली त्या ३० नोव्हेंबर या दिवशी या दोघांत मोबाइलवरून वेळोवेळी संभाषण झाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. याव्यतिरिक्त जरे यांच्या घराच्या झडतीत त्यांच्याच हस्ताक्षरातील एक पत्र मिळाले असून, त्यात आरोपीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे लिहिले आहे. या सर्व पुराव्यांची तपासणी  करायची आहे. त्यासाठी आरोपीची अटक आवश्यक असल्याचे पाटील यांनी कोर्टात सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यावर आता  बुधवारी निकाल देण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments