नगर बुलेटीन

 नगर बुलेटीन 

दहा महिन्यानंतर झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयास मोठा प्रतिसाद

हजारो प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने  निकाली, सुमारे एकोणीस कोटी रुपयांची वसुली

वेब टीम नगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघटनांच्या संयुक्त विदयमाने जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या लोकन्यायालयास जिल्ह्यातून मोठा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन करत काळजी घेण्यात आली. तसेच गर्दी टाळण्यासाठी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयात उद्घाटन समारंभाचे आयोजन न करता न्यायधीशांच्या नियोजन बैठकीत न्या. श्रीकांत आणेकर यांनी औचारिकपणे लोकन्यायालयाच्या कामास सुरवात केली. यावेळी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, न्या. ए. एम. शेटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे, सरकारी अभियोक्ता अॅड. सतीश पाटील, सेन्ट्रल बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष काकडे, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. भूषण ब-हाटे आदींसह सर्व न्यायिक अधिकारी, पॅनल सदस्य वकील व कर्मचारी उपस्थित होते. कोव्हीड -१९ रोगाचा प्रादुर्भाव असतांना देखील जिल्हयात राष्ट्रीय लोकअदालतीस उदंड प्रतिसाद मिळाला.

या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये नगर जिल्हा न्यायालयात दिवाणी प्रकरणे, फौजदारी, एन. आय. ॲक्ट प्रकरणे, बँकांच्या कर्ज वसुली प्रकरणी, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्या खालील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, इलेक्ट्रीसिटी  ॲक्टची समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या आगोदरचे दाखलपुर्व प्रकरणे आपसी समझोत्या करीता ठेवण्यात आले होते. यामध्ये एकूण २०,४१८ प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी २,७७३ प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. यावेळी १९,०२,६७,७०३ रुपये रक्कम वसुल करण्यात आली.

          यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर व न्यायाधीशांनी यांनी सर्व पॅनलला भेटी देवून कामकाजाचा आढावा घेतला. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करा असे आवाहन करत होते.

          प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे म्हणाल्या, न्यायालयाचे कामकाज आता पूर्व पदावर आले आहे. दीर्घ काळानंतर लोकन्यायालय झाल्याने पक्षकर व वकिलांनी मोठा प्रतिसाद लोकन्यायालयास दिला आहे. सर्वांचे करोना पासून संरक्षणाची पूर्णपणे खबरदारी घेण्यात आली आहे. कोर्ट हॉल मध्ये गर्दी होवू नये यासाठी वेगळ्या उपाययोजना राबवयात आल्या आहेत. सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग व पक्षकारांनी भरपूर सहकार्य केल्याने हे लोकन्यायालय यशस्वी झाले आहे.

         ॲड. भूषण ब-हाटे म्हणाले, करोनामुळे गेल्या ९ महिन्यांपासून कोर्टाचे काम जवळजवळ बंद होते. त्यामुळे बहुतांशी पक्षकरांची प्रकरणे मोठ्याप्रमाणात प्रलंबित होती. त्यामुळे या लोकन्यायालयास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सुरक्षितेची खबरदारी घेत याठिकाणी कामकाज झाले असून मोठ्यासंख्येने प्रकरणे सामुचाराने निकाली निघाली आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे यांच्या सह सर्व कर्मचारी नवे असले तरी लोकन्यायालयाचे उत्कृष्ठ काम झाले आहे.

            ॲड. सुभाष काकडे म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहेत. खूप जुने वाद याठिकाणी सामुचाराने मिटली असून दोन्ही बाजूचे पक्षकार गुण्यागोविंदाने परतत आहेत. त्यामुळे अत्यंत महत्वाचा वेळ व पैसा वाचला आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या नेतृत्वाखाली फार चांगले आयोजन या लोकन्यायालाचे झाले आहे.

          जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व जिल्हा न्यायालयाच्या कार्माचारींनी लोकन्यायालयाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बारा टक्के  लाभांश  सभासदांसाठी चांगली आर्थिकप्राप्ती ठरेल

 नगर तालुका उपनिबंधक किशन रत्नाळे : पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे लाभांष वाटप

वेब टीम नगर : करोना मुळे सहकारी पतसंस्थांच्या कामकाजाला काही प्रमाणात ब्रेक लागला होता. आता पुन्हा नव्या जोमाने पतसंस्था सेवा देत आहेत. या संकटकाळात पंडित दीनदयाळ पतसंस्था देत असलेला १२ टक्के  लाभांश  सभासदांनासाठी चांगली आर्थिकप्राप्ती ठरेल. पतसंस्थेने बचतगटांना दिलेले आर्थिक पाठबळ महिलांना सक्षम करणारे आहे. पंडित दीनदयाळ उपाध्यांच्या नावाने अर्थसेवा देणाऱ्या या संस्थेची प्रगती व अत्याधुनिक सुविधा कौतुकास्पद आहेत. असेच चागले काम करत पुढीलवर्षी १५ टक्के  लाभांश  द्यावा, असे प्रतिपादन नगर तालुका उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी केले.

          पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने सभासदांना १२ टक्के  लाभांशाचे वितरण नगर तालुका उपनिबंधक किशन रत्नाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, मानद सचिव विकास पाथरकर, अनिल सबलोक, मुकुल गंधे, व्यवस्थापक निलेश लाटे, उपव्यवस्थापक सुखदेव दरेकर आदींसह सभासद, ठेवीदार व महिला बचतगटांच्या सदस्या उपस्थित होते.

     अध्यक्ष  वसंत लोढा म्हाणाले, पतसंस्थेच्या २९ वर्षाच्या कारकिर्दीत दरवर्षी १५ टक्के  लाभांश  सभासदांना देत आलो आहे. मात्र यावर्षी आलेल्या करोनासंकटां मुळे १२ टक्के लाभांश  देऊन ही परंपरा कायम ठेवली. सभासदांच्या हिताला बाधा येणार नाही, ठेवीदारांचा कष्टाचा पैसा पूर्णपणे सुरक्षित ठेवून नाठाळ कर्जदारांना वठणीवर आणून प्रगती साधणे या त्रिसूत्रीवर दीनदयाळ पतसंस्था काम असल्याने या संकटांतही भक्कमपणे उभी आहे. आता लवकरच अत्याधुनिक मोबाईल बँकिंग सेवा सुरु करून बँकांना मागे टाकून अशी प्रगती पतसंस्था करत आहे. दीनदयाळ पतसंस्थेच्या सर्व अत्याधुनिक सुविधांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुल गंधे यांनी केले. अनिल सबलोक यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी सभासद नाथा देवतरसे, प्रमोद मुळे, मिलिंद गंधे, प्रशांत मोहळे, सुहास पाथरकर, अजय कविटकर, बचतगटांच्या अलका परदेशी, पूजा मिसाळ, अश्विनी जुनीवाले, रेणुका गरदास, दीपा लंगोटे आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्वांगीण विकासासाठी राजयोगा जीवन पद्धती उपयुक्त 

 डॉ.सुधा कांकरिया : सविता रमेश फिरोदिया प्रशालेमध्ये राजयोगा मेडिटेशन कोर्सची सांगता

वेब टीम नगर :  आजकाल सर्वांचे दैनंदिन जीवनमानात ताण-तणाव वाढत आहेत, त्याचा परिणाम आपल्या कामावर त्याचप्रमाणे आपल्या आरोग्यावर न कळत होत आहे. यातून प्रत्येकाला मन:शांतीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत राजयोग मिडिटेशन कोर्स हा आपले वैयक्तिक, कौटूंबिक व शैक्षणिक जीवनमान उंचविण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये सांगितलेल्या उपायांमुळे मनुष्यात अंतरिक बदल होऊन नकारात्मक विचार जाऊन तो सकारात्मकतेकडे वळतो. त्यामुळे सभोवातलची परिस्थितीही त्यास अनुकूल वाटू लागते. जीवनात चैतन्य निर्माण होऊ आयुष्य हे सुंदर वाटू लागते. त्यामुळे राजयोग मेडिटेशन हे आपल्या जीवन पद्धतीसाठी उपायुक्त टॉनिक असल्याचे प्रतिपादन राजयोगिनी बीके डॉ.सुधा कांकरिया यांनी केले.

     सविता रमेश फिरोदिया प्रशालेमध्ये साप्ताहिक राजयोग मेडिटेशन कोर्स घेण्यात आला. राजयोगिनी बीके डॉ. सुधा कांकरिया यांनी मार्गदर्शन केले.  अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ खोसे हे होते समवेत प्रमुख पाहुणे सेक्रेटरी र.धों. कासवा, खजिनदार अ‍ॅड. विजय मुनोत, विश्‍वस्त मनसुखलाल पिपाडा व रमणलाल गांधी उपस्थित होते.

     यावेळी उपाध्यक्ष दशरथ खोसे यांनी  मेडिटेशन आपल्या जीवनावर कसे सकारात्मक परिणाम करते जीवनाच्या प्रत्येक वळणावर मेडिटेशन सहायक ठरते. जीवन निरोगी आनंदी व समृद्ध बनण्याची राजयोगा मेडिटेशन ही जीवन पद्धती आहे. तिचा अवलंब सर्वांनी केला पाहिजे.

     याप्रसंगी र.धों.कासवा म्हणाले, संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांसाठीही विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. सध्याच्या मानसिक व शारिरिक ताण-तणावाच्या वातावरणात शिक्षकांचे मनोबल वाढविण्यासाठी राजयोग मेडिटेशन कोर्सचे आयोजन केले आहे, त्यामुळे शिक्षकांना तणावमुक्तीचा अनुभव मिळाल्याचे सांगितले.

       अ‍ॅड.विजय मुनोत म्हणाले की, मेडिटेशनमुळे मनाची व बुद्धीची शुद्धता होते. त्यामुळे जीवनातील निर्णय शक्ती बळकट होण्यास मदत होते तसेच ताण तणाव घालवण्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे.

       सुरुवातीस मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.  जयश्री कोदे यांनी सूत्रसंचालन केले. जालिंदर भाकरे,  निता लांडगे, अनिता बेरड व  निशा दुशिंग यांनी अनुभव व्यक्त केले. वर्षा गोरे यांनी आभार मानले. विनोदकुमार कटारिया व प्रिया सोनटक्के यांनी सहकार्य केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांच्या कामाना प्राधान्य दिले 

 विक्रम राठोड :  हॉटेल राज पॅलेस ते श्री मार्बल येथील रस्ता डांबरीकरण व ड्रेनेज कामाचा शुभारंभ

वेब टीम  नगर - प्रभागातील नागरिकांना मुलभुत सुविधा देणे हे नगरसेवकांचे प्रथम कर्तव्य आहे. या मुलभुत सुविधांबरोबरच प्रभागाचा विकास कसा होईल, याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची नाळ सर्वसामान्यांशी जोडली गेलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विकास कामांना खिळ बसली होती. या काळातही शिवसेनेने विकास कामांबरोबरच नागरिकांना दिलासा देणारे उपक्रम राबविलेे. परंतु आता परिस्थित सामान्य होत असतांना सुविधाही देणे गरजेचे आहे. त्यासाठी मनपा आयुक्तांकडे शिवसेनेच्या नगरसेवकांनी निधीची मागणी केली आहे, त्यातून विकास कामांना चालना मिळेल.  शिवसेना नगरसेवक हे कायम नागरिकांच्या संपर्कात असल्याने अनेक कामे मार्गी लागत आहेत, असे प्रतिपादन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केले.

     नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या प्रयत्नातून हॉटेल राज पॅलेस ते श्री मार्बल येथील रस्ता डांबरीकरण व ड्रेनेज कामाचा शुभारंभ युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम, दत्ता जाधव, गणेश कवडे, दिपक खैरे, प्रशांत गायकवाड, संतोष गेनप्पा, योगीराज गाडे, हरजिभाई पटेल, पुरुषोत्तम पटेल, नरसीभाई पटेल, हिंमतभाई पटेल आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी सुवर्णा जाधव म्हणाल्या, प्रभागातील प्रत्येक भागातील कामांना प्राधान्य देऊन ते सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहेत. निधी अभावी अनेक कामे रखडलेली आहेत. परंतु टप्प्याटप्प्याने ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहेत. टिळक रोड परिसरातील रस्ता व  ड्रेनेज लाईनच्या सुरु होणार्‍या कामामुळे या भागातील  प्रश्‍न कायमस्वरुपी सुटणार आहे. चांगले काम होण्यासाठी नागरिकांनीही होणार्‍या कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. आम्ही आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी तत्पर राहू, असे सांगितले.

     याप्रसंगी अनिल शिंदे म्हणाले, प्रभागाच्या विकासात आम्ही सर्व नगरसेवक एकत्रित प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच प्रत्येक भागात विकास कामे होत आहे. भविष्यातही अनेक कामे होतील. विकास कामास विलंब होत असला तरी  आमचा कायम पाठपुरावा सुरु असतो. प्रभागातील नागरिकांना चांगली सेवा देणे हे आम्ही आमचे आध्य  कर्तव्य समजतो.

     यावेळी गणेश कवडे यांनीही शिवसेना नगरसेवक नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडवित आहेत. त्यासाठी प्रसंगी आंदोलने करण्यात आली आहेत. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांचे कामांबाबत नेहमीच आग्रही असतात.

     यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम आदिनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मंजीभाई पटेल, अमृतभाई शाह,  जिवराजभाई पटेल, मौजीभाई पटेल, मगनभाई पटेल, इसहाक शेख, रमेशभाई पटेल,  इकबाल शेख, परागभाई पटेल, चंदनभाई पटेल, अविनाश पटेल, योगेश पटेल, विनायक कानडे, प्रविण कानडे, हर्षल भणभने, गणेश जाधव, सुरज जाधव, ऋषीकेश जाधव, रवी जाधव, विशाल जाधव, विशाल गायकवाड, आदेश जाधव, बाळासाहेब बेल्हेकर आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपण सक्षम आहोत या आत्मविश्‍वासाने महिलांचे सक्षमीकरण बळकट होईल

योगेश पिंपळे : जिवा सेना संघटनेने केला महिलांचा सन्मान सोहळा

 वेब टीम  नगर : सर्व क्षेत्रातील असमानता झुगारुन समानता प्राप्त करु शकतील असे सामर्थ्य महिलांमध्ये असते. आपण सक्षम आहोत, या आत्मविश्‍वासाने महिलांचे सक्षमीकरण बळकट होईल, असे प्रतिपादन जिवा सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पिंपळे यांनी केले.

     साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व जिवा सेना संघटनेने नगर जिल्ह्यात व शहरात महिलांसाठी सबलीकरण, सक्षमीकरण,  सशक्तीकरणाचे कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान सोहळा नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात पिंपळे यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

     या सन्मान सोहळ्यात नगर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षपदी वनिता बिडवे यांची निवड झाल्याबद्दल श्री.त्र्यंबके यांच्या हस्ते त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाती पवळे, सीमा त्र्यंबके, रेश्मा पवने, वंदना दडगे, अनिल निकम, माऊली गायकवाड, रमेश बिडवे, आशिष ताकपिरे, संदिप सोनवणे आदि उपस्थित होते.

पिंपळे पुढे म्हणाले, दैनंदिन जीवनात महिला विविध भुमिका पार पाडत आहे. समाजाच्या त्या आधारस्तंभ आहेत. कधी वात्सल्यपूर्ण माता तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती कुशलतेने आणि कोमलतेने निभावतात वनिताताईंनी जनआरोग्य फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णसेवा करुन, सर्वसामान्यांना आधार दिला. जिवा सेनेच्या माध्यमातून सर्व समाजातील महिलांना विविध माध्यमातून आत्मसन्मान मिळवून दिला आणि आता राष्ट्रवादी पक्षाच्या त्या नगर तालुकाध्यक्ष झाल्याने त्यांचे पक्षवाढीसाठी मोठे योगदान मिळेल, अशी अपेक्षा पिंपळे यांनी व्यक्त केली.

 नगरसेवक त्र्यंबके यांनी महिलांच्या कार्याचा गौरव करुन राष्ट्रवादी पक्षामुळे ३३टक्के आरक्षण महिलांना मिळाले, त्याचा फायदा सर्व स्तरावर झाला असल्याचे सांगितले.

     यावेळी वनिता बिडवे यांनी सन्मान सोहळ्यात केलेला सत्कार आमच्या कामाला पाठबळ देईल. महिलांच्या प्रत्येक प्रश्‍नात संघटना, पक्षाच्या माध्यमातून लक्ष घालू तसेच श्री साई-संघर्ष प्रतिष्ठान व जिवा सेना संघटनेने आम्हाला मान व सन्मान दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

     सूत्रसंचालन आशिष ताकपिरे यांनी केले तर संदिप सोनवणे यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 शानदार सोहळ्यात जाकीर शेख‘लिजेंड दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित

     वेब टीम नगर : मुंबई येथील कृष्णा चौहान फौंडेशनच्यावतीने चित्रपटसृष्टी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तींचा लिजेंड दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड २०२० देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अंधेरी, मुंबई येथे झालेल्या या शानदार सोहळ्यात चित्रपटातील कला-अभियानाबद्दल नगरचे जाकीर हुसेन शेख यांना राज्यस्तरीय ‘लिजेंड दादासाहेब फाळके पुरस्कार२०२०’ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी फाऊंडेशनचे संस्थापक कृष्णा चौहान, सुधाकर शर्मा, संगीतकार दिलीप सेन, गायक शाहिद मालया, अभिनेते सुनिल पाल, अजाज खान, डॉ.योगेश लखानी, अरविंद वाघेला, अभिनेत्री रुबी अहमद आदि मान्यवर उपस्थित होते.

     याप्रसंगी कृष्णा चौहान म्हणाले, फौंडेशनच्यावतीने दरवर्षी चित्रपटसृष्टी व सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तींना चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात येत आहे. आपआपल्या क्षेत्रात काम करुन सामाजिक दायित्व जपणार्‍या व्यक्तींनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा, हा यामागील हेतू आहे.

     ज्येष्ठ सिनेअभिनेते जाकीर हुसेन शेख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नगरमध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रमांद्वारे मोठे योगदान दिले आहे. त्यांनी जय हिंद, बालाजी या चित्रपटात भुमिका केल्या असून, जय मोहटा देवी चित्रपटाचे सहनिर्माताही होते. गोरेगांव, अंधेरी, मुंबई येथे किंग फिल्म इंटरनॅशनल प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून चित्रपटाचे काम सुरु आहे. त्यांनी सुरु केलेल्या पर्यटन महोत्सवामुळे नगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळाली. त्याचबरोबर या महोत्सवाच्या माध्यमातून विविध स्पर्धांच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून वृक्षारोपण, आरोग्य शिबीरे, अन्नदान, राष्ट्रपुरुषांचा सन्मान, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन अशा विविध माध्यमातून त्यांचे कार्य सुरु आहे. कोरोना काळातही त्यांनी गरजू लोकांना मदतीचा हात देऊन आधार देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबई येथील फौंडेशनच्यावतीने त्यांचा ‘लिजेंड दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड देऊन गौरव केला आहे.

  जाकीर शेख यांचा राज्यस्तरावर झालेल्या गौरवाबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शाळेवर चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या पूर्णवेळ नियुक्तीस स्थगिती देणार्‍या

राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?


वेब टीम नगर  :  शासन निर्णयाद्वारे शाळेवर असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या पूर्णवेळ नियुक्तीस राज्य सरकारने स्थगिती दिली असताना सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा प्रश्‍न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. मंत्र्यांच्या कार्यालयासह बंगल्यात देखील चतुर्थश्रेणी कर्मचारी चालतो मात्र समाज घडविणार्‍या शाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरण्यास बंदी टाकणे हा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप करीत सदर शासन निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, शिक्षण व क्रीडा विभागाचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठविण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये शिपाई, प्रयोगशाळा परिचर, नाईक, पहारेकरी, सफाई कामगार, कामाठी, चौकीदार, व सुरक्षारक्षक इत्यादी चतुर्थ श्रेणीतील पदे भरण्यास शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे स्थगिती दिली आहे. शाळेची साफसफाई, शाळेची प्रार्थना, तासिका मधील सुट्टीची घंटा वाजविणे, शिक्षण विभागातील कामाची कागदपत्रे पोहोचविणे, प्रशासनात व अध्यापन प्रक्रियेत सहकार्य करणे, विद्यार्थी व शिक्षकांना आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यास मदत करणे इत्यादी कामाची धुरा शिपाई व अन्य चतुर्थश्रेणी कर्मचारी सांभाळत असतात. चतुर्थ श्रेणीतील पदे न भरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्यामुळे शिक्षणाची प्रक्रिया प्रभावित होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मंत्र्यांच्या कार्यालयात, बंगल्यावर, मंत्रालयात व शासकीय कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची पदे भरणे कायम ठेवून समाज घडविणार्‍या शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची पदे न भरण्याचा निर्णय तुघलकी स्वरूपाचा असून, भेदभाव करणारा व विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

शासकीय तिजोरीतील पैसा कंत्राटदारांच्या घशात घालून शासन व प्रशासनाने आर्थिक मोबदला कमी होण्याच्या दृष्टीने शासन निर्णय निर्गमित केला असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. या शासन निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात कंत्राटी पद्धतीचा समावेश झाला आहे. ही बाब शिक्षण क्षेत्राची मृत्यूघंटा आहे. तरी शासनाने चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या पूर्णवेळ नियुक्त न करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करून शिक्षण क्षेत्राचे अस्तित्व पावित्र्य कायम ठेवण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मानसिक समाधान हेच जीवनाचे खरे सूख 

सागर बोरूडे : निंबळकच्या ध्यान आश्रम उभारणीसाठी सिमेंटची मदत

वेब टीम नगर : निंबळक (ता. नगर) येथील प.पू. माताजी श्री निर्मला देवी प्रणीत सहजयोग ध्यान आश्रम उभारणीच्या कामासाठी मनपाचे नगरसेवक सागर बोरूडे यांनी ३० सिमेंटच्या गोणी भेट दिल्या. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश घोगरे पाटील, अशोक कोतकर, दीपक कळसे, शिवशंकर मतकर, शांतिलाल काळे, श्रीमंत किंकर, जाधव साहेब, नानासाहेब कुसमाडे, महेश म्हसे, उमेश तोगे, अभय ठेंगणे, चव्हाण काका, सौरभ बोर्डे, महेश घोगरे आदि उपस्थित होते.

नगरसेवक सागर बोरूडे म्हणाले की, मानसिक समाधान हेच जीवनाचे खरे सुख आहे. ध्यानधारणेने हे सुख जीवनात अनुभवता येतो. स्पर्धेच्या व धावपळीच्या जीवनात मनुष्य जीवन जगण्याचा आनंद विसरत चालला आहे. ध्यानामुळे मनुष्यात आत्मविश्‍वास वाढून नवीन विचाराला चालना मिळून मन एकाग्र होते. ग्रामीण भागातील नागरिकांना ध्यानधारणेचे धडे घेता यावे या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या ध्यान आश्रमास मदत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्यवस्थेला दोष देण्याची प्रवृत्ती म्हणजेच मानवाधिकाराचे उल्लंघन

 पद्मश्री पोपट पवार : दीपस्तंभ पुरस्कार२०२० प्रदान

वेब टीम नगर : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिम्मित्ताने कोरोना काळात मानवाधिकार संरक्षणासाठी महत्वपूर्ण भूमिका घेवून दीपस्तंभासारखे उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मानवाधिकार अभियानामार्फत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात  आहे.  पुरस्काराचे वितरण समारंभ सी.एस.आर.डी. समाजकार्य महाविद्यालय या ठिकाणी आयोजीत करण्यात आला होता.

हजारो स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत ठरलेल्या सी.एस.आर.डी. चे संचालक डॉ.सुरेश पठारे, भिंगार भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी ठरलेले भिंगार छावणी परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, रस्त्यावर उतरून लोकांना शिस्त लावल्यासोबतच अनेकांच्या गरजा भागवनारे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, अहमदनगर महानगरपालिका मार्फत कम्युनिटी किचन सुरू करून रोज हजारो लोकांना मोफत भोजन व्यवस्था करणारे अहमदनगर महानगरपालिकाचे पाणी पुरवठा अधिकारी परिमल निकम, ग्रामीण भागात कोरोणाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योगदान देणारे खातगाव टाकळीचे उपसरपंच ज्ञानेश्‍वर पठारे तसेच आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय योगदनाबद्दल बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांना विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी मानवाधिकार अभियानचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संतोष गायकवाड, संध्या मेढे, सॅम्युअल वाघमारे, अनिल गंगावणे, योगेश तुपविहीरे, विठ्ठल कोतकर, जालिंदर बोरुडे, गणेश ननावरे, संजय कांबळे, दिपक पुरी, प्रकाश पाचारणे, राजेंद्र सातपुते, आशा हरे, दिपक अमृत, दिपक गायकवाड, हर्षल कांबळे, विवेक भिंगारदिवे, अविनाश भोसले, किरण दाभाडे, राहूल आल्हाट, राहूल गायकवाड, लखन शिंदे, रामदास गायकवाड, अविनाश कांबळे, इंजि. विजय काकडे, प्रमोद मुळे, श्याम कांबळे, संदीप शेलार, आनंद शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, समाज बिघडला तर व्यवस्था बिघडते. व्यवस्थेला दोष देण्याची प्रवृत्ती म्हणजेच मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. मनुष्य हा सुरक्षित राहण्यासाठी प्राण्याच्या कळपातून बाहेर पडला व मानवीहक्काचे संरक्षण करु लागला. मानवीहक्काचे उल्लंघन होत असताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदिंसह महापुरुष व संतांनी पुढाकार घेऊन समाज घडविण्याचे कार्य केले. कोरोना हे संकट मनुष्यसेवेची संधी म्हणून आली होती. अनेकांनी या संधीद्वारे मनुष्यसेवा केली. पैश्याने व उच्च शिक्षण घेऊन जग बदलत नाही. अंतर्मनाची, संस्काराची व मायेची जोड मिळाल्यास समाजात परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संध्या मेढे यांनी संविधान प्रास्ताविक वाचन केले. मानवाधिकार अभियानचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संतोष गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. आभार अहमदनगर दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष गंगावणे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमचा समारोप करण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वेतनवाढसाठी अवतार मेहेरबाबा कामगार युनियन आक्रमक

चर्चेला येण्यास ट्रस्टची टाळाटाळ : ८ ते १२ हजार रुपया पर्यंत वेतनवाढ देण्याची मागणी

१७ डिसेंबरला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर आंदोलन

वेब टीम नगर : अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकनुसार ८ ते १२ हजार रुपया पर्यंत वेतनवाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांकडे गेले असताना तारखेला हजर न राहता एकूण वेतनाच्या फक्त ७ टक्के वेतनवाढ करण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या ट्रस्टच्या विरोधात लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर अरणगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकित गुरुवार दि.१७डिसेंबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले.

या बैठकीसाठी भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचरणे, सुनिता जावळे, बबन भिंगारदिवे आदिंसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवतार मेहेरबाबा ट्रस्टने लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या सभासद नसलेल्या इतर कामगारांना शंभर रुपये तर पर्यवेक्षकांना तीनशे रुपये जास्तीचे वेतन दिले होते. युनियनच्या वतीने आंदोलन करुन उर्वरीत रक्कम मिळवण्यात आली. ट्रस्ट व युनियनचा वेतनवाढीचा करार २०`१७ रोजी झाला होता. त्याची मुदत मार्च २०२०मध्ये संपली आहे. कोरोना महामारीचे कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत असल्याने, युनियनने सहा कामगार आयुक्तांकडे दाद मागितली. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात तीन तारखा होऊन देखील ट्रस्टचे विश्‍वस्त उपस्थित राहिलेले नाही. हा प्रश्‍न त्वरीत सोडविण्यासाठी कामगारांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.  

अ‍ॅड. कॉ.सुधीर टोकेकर म्हणाले की, कोरोनाकाळात कामगारांना पगार देण्यात आलेला नाही. या संकटकाळात सर्व कामगारांनी समजूतदारपणे मान्य केले. मात्र पगार वाढ न करणे व आडमुठीपणाचे ट्रस्टचे धोरण कामगारांना मान्य नाही. कोरोना काळात ट्रस्ट खरेदी व्यवहार करतात, मात्र कर्मचारी वर्गासाठी पगार वाढ दिली जात नाही. ट्रस्टचे इतर खर्च कमी केल्यास कामगारांना पगारवाढ देणे सहज शक्य होणार आहे. कामगारांचे सेवापुस्तक नसल्याने अनेक हक्कापासून त्यांना वंचित रहावे लागत आहे. महागाई निर्देशांकनुसार  ८ते १२हजार रुपया पर्यंत वेतनवाढ  होऊन त्यांचे पगार१८ते २२हजार पर्यंत होणे अपेक्षित आहे. अवतार मेहेरबाबा ट्रस्टचा संपुर्ण डोलारा कामगारांवर टिकून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व हा वाद मिटवण्यासाठी ट्रस्टच्या विश्‍वस्तांना चर्चेला येण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. कॉ.सुभाष लांडे म्हणाले की, समान कामाला समान वेतन मिळणे हा कामगारांचा हक्क आहे. इतर देवस्थान ट्रस्टच्या तुलनेत अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांना तोकडे वेतन देत आहे. महागाई वाढली असताना कामगारांना जगणे कठिण झाले आहे. सेवापुस्तक हे कामगारांचा आरसा असून, त्यांना सेवापुस्तक मिळणे देखील गरजेचे आहे. हक्काच्या मागण्यांसाठी कामगारांचा हा संघर्ष असून, ट्रस्टने हा विषय चर्चेने सोडविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments