आय.एम.ए.चा ११ रोजी देशव्यापी संप

 आय.एम.ए.चा ११ रोजी देशव्यापी संप 

वेब टीम नगर - आयुर्वेद विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियेची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचनेविरुद्ध आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने राष्ट्रीय पातळीवर आजपासून आंदोलन सुरु केले आहे.  आयएमए संघटनेच्या डॉक्टरांनी एकत्रितपणे जमून या विरोधात निषेध व्यक्त केला आहे. या अधिसूचनेमध्ये बी.एम.एस.झालेल्या आयुर्वेद शाखेतील विद्यार्थ्यांना ५८ अ‍ॅलोपॅथीक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. या विरोधातच ११ डिसेंबर रोजी आय.एम.ए.ने देशव्यापी संप पुकारला आहे. या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाच्या प्रसंगी आयएमएचे नगर शाखेचे प्रेसिडेंट डॉ.अनिल आठरे, सेक्रेटरी सचिन वहाडणे, डॉ.बाळासाहेब देवकर, डॉ.प्रताप पटारे, डॉ.महेश वीर, डॉ.रामदास बांगर, डॉ.निसार सय्यद, डॉ.सुप्रिया वीर, डॉ.सौ.व श्री.भोसले, डॉ.दिलिप फाळके, डॉ.सौ.दिपाली फाळके, डॉ.दिपाली पठारे, डॉ.अशोक नरवडे, डॉ.सुजाता नरवडे,डॉ निसार शेख,डॉ पांडुरंग दौले ,डॉ सुभाष तुवर ,डॉ  नरेंद्र व डॉ सौ वानखेडे,डॉ दिलीप बगल ,डॉ संतोष चेडे डॉ अमित करडे  डॉ गणेश बंड  ,डॉ रेश्मा चेडे , डॉ संदीप  व डॉ हेमा  सुराणा , डॉ सोनाली वहाडणे डॉ अर्जुन शिरसाठ आदिंसह डॉक्टर्स उपस्थित होते.

     याप्रसंगी डॉ.अनिल आठरे म्हणाले, सीसीआयएमने आधुनिक वैद्यकीय, शस्त्रक्रियेचे नामांतर संस्कृत शद्बात करुन या सर्व मूळ आयुर्वेद शस्त्रक्रिया असल्याचा खोटा दावा केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आयुर्वेद पदव्युतर विद्यार्थी आधुनिक वैद्यकाच्या विविध विशेष शाखांमधील शस्त्रक्रिया करण्यास पात्र ठरणार आहे. थोडक्यात एकच आयुर्वेद वैद्य अ‍ॅपेंडीक्सचे, किडणी स्टोनचे, कानाचे व डोळ्यांच्या मोतीबिंदूचे देखील ऑपरेशन करेल, त्यालाच पित्ताशयातील खडा काढण्याची अवघड शस्त्रक्रिया करण्याची परवानगी असेल, तोच डॉक्टर दातांची शस्त्रक्रिया करण्यासही पात्र ठरेल, ही बाब अतिशय धोकादायक असून आधुनिक वैद्यक शास्त्रातील ज्येष्ठ आणि कुशल शल्यचिकित्सांनादेखील शस्त्रक्रियेतील एवढ्या विस्तृत निवडीचे कायदेशीर परवानगी नाही. या आयुर्वेद वैद्यांना एम.एस. ही पदवी लागू होणार आहे, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे.

     डॉ.आठरे पुढे बोलतांना म्हणाले, शस्त्रक्रिया नाजूक प्रक्रिया आहे, जी जीवन आणि मरण यातील सुक्ष्म रेषा असते. आधुनिक वैद्यकीय सर्जन सर्व आजारांचा सुक्ष्म अभ्यास करत असते, त्यातून तो शस्त्रक्रिया करत असतो. आयुर्वेदातील अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियेचे हे मिश्रण आयुर्वेदासारख्या प्राचिन शाखेचा विकास खुंटवेल आणि भविष्यात आयुर्वेदाचे शास्त्रही नाहीसे होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमची आधिसूचना आपण मागे घ्यावी. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी रसमिसळ करण्यासाठी तयार  केलेल्या चार समित्या रद्द कराव्यात अशी आयएमएची प्रमुख मागणी आहे.

     यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशानने आंदोलनाची रुपरेषा ठरविली असून, ११  डिसेंबर २०२० रोजी भारतातील सर्व दवाखाने, क्लिनिक व ओपीडीच्या सेवा सकाळी ६ ते सायं. ६ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम सर्वसामान्यापर्यंत पोहचवा, हाच उद्देश आहे. कारण या आधिसूचनेचे अंतिम दुष्परिणाम संबंधित रुग्णांच्या आयुष्यावर व पर्यायाने आरोग्यावर होणार आहे. यासाठी जनजागृतीपर संवेधीकरण आयएमए शाखेच्यावतीने  संपूर्ण भारतात करण्यात येत आहे.

आंदोलनामध्ये शासकीय व खाजगी महाविद्यलयातील पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी देखील सक्रिय सहभाग घेणार आहेत. या आंदोलनामध्ये आधुनिक वैद्यकशास्त्रातील सर्व स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिटी शाखा, शासकीय डॉक्टरांच्या संघटना, मेडिकल कॉलेजमधील शिक्षक संघटना यांनी या आंदोलनास संपूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे 

Post a Comment

0 Comments