नगर टुडे बुलेटिन

 नगर टुडे बुलेटिन 

सूर्यनगर परिसरात शांतता असून धार्मिक तेढ निर्माण करु नका - सुनिल त्र्यंबके

    वेब टीम  नगर : नगर-औरंगाबाद रोडवरील तपोवन जवळ असलेल्या सूर्यनगर मधील घटनेचा अर्धवट माहिती देऊन सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करुन धार्मिक तेढ निर्माण केला जात असल्याची भावना येथील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.  वैयक्तिक भांडणाचे भांडवल करुन धर्माच्या नावावर राजकारण करण्याचे काम कोणी करु नका, असे पत्रक नागरिक या नात्याने सुनिल नारायण त्र्यंबके यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

     या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सध्या या परिसरात शांतता असून, येथील नागरिक आरती करतात, मंदिरात आरती करण्यास कुठलीही अडचण नसून, त्यामुळे बाहेरील व्यक्तींनी या ठिकाणी येऊ नये. घडलेली घटना दुर्दैवी आहे, मात्र या घटनेला धार्मिक रंग देऊन राजकीय स्वरुप देऊ नये, असे आवाहन त्र्यंबके यांनी केले आहे.

सूर्यनगर परिसरात नागरिकांना कोणताही त्रास नसून संपूर्ण परिसर शांत आहे. घटलेल्या घटनेचा गैरअर्थ काढून दोन समाजामध्ये दुही निर्माण करु नका. शहरातील वातावरण बिघडवू नका, बाहेरील लोकांनी सूर्यनगर परिसरात येऊ नये असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले असल्याचे सुनिल त्र्यंबके यांनी पत्रकात नमुद केले आहे.

    सूर्यनगरमधील घटना घडताच तोफखाना पोलिस स्टेशनचे स.पो.नि. सुरोशी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, बाहेरील नागरिकांनी या भागात येऊ नये, कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, असे आवाहन सुरोशी यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मानवतेचा कुंभमेळा वार्षिक निरंकारी संत समागम

 5, 6 व 7 डिसेंबर रोजी व्हर्च्युअल रुपात

     वेब टीम नगर : मागील ७२ वर्षांची परंपरा कायम ठेवत ‘७३ वार्षिक निरंकारी संत समागम’यावर्षीजगाची वर्तमान परिस्थिति लक्षात घेऊन व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात येत आहे.  शुभारंभ शनिवार दि. ५डिसेंबर, २०२० रोजी होत आहे. या संत समागमामध्ये देश-विदेशातील अनेक संस्कृती, सभ्यता आणि बहुरंगी छटांचे दर्शन होईल.

     समागमाचा प्रारंभ ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सत्संगाच्या रुपात होईल ज्यामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपला ‘मानवतेच्या नावे संदेश’  प्रेषित करतील. त्यानंतर सत्संग कार्यक्रमाच्या शेवटी रात्री ८.३०  ते ९.०० वाजेपर्यंत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्या दिव्य प्रवचनाद्वारे आपले पावन आशीर्वाद प्रदान करतील. समागमाचे प्रसारण तिन्ही दिवशी मिशनच्या वेबसाईटवर सायंकाळी ४. ३० से रात्री ९. ०० वाजेपर्यंत तसेच संस्कार टी.व्ही.चॅनलवर सायंकाळी ५. ३० ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रसारित करण्यात येईल.

     समागमाच्या दुसर्‍या दिवशी ६ डिसेंबर रोजी सकाळी ११. ३०ते दुपारी १ वाजेपर्यंत सेवादल रॅली आयोजित करण्यात येईल. या रॅलीमध्ये भारतवर्ष तसेच विदेशातील सेवादल बंधु-भगिनी शारीरिक व्यायाम, खेळ, विविध कसरती तसेच मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिका दर्शविण्यात येतील. ही रॅली सद्गुरु माताजींच्या आशीर्वचनांद्वारे संपन्न होईल. सायंकाळी ४. ३० पासून सत्संग कार्यक्रम आयोजित होईल. सत्संग समारोहाच्या शेवटी रात्री ८.३० ते ९ या वेळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्या दिव्य प्रवचनांद्वारे समस्त भाविक-भक्तगणांना आपला आशीर्वाद प्रदान करतील.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

केंद्र सरकारचे नवे कृषी विधेयक शेतकरी विरोधी

भुजबळ : बाजार समितीसमोर शहर काँग्रेसचे धरणे आंदोलन

    वेब टीम  नगर : केंद्र सरकारचे नवे कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याची टिका शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले. नव्या कृषी विधेयका विरोधात शेतकर्‍यांनी नवी दिल्ली येथे सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नगर शहरात शहर काँग्रेसच्यावतीने गुरुवार दि. ३ सकाळी ११. ३०वा. धरणे आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ आणि भिंगार अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या समोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होते.

     नवी दिल्ली येथे गेल्या सप्ताहापासून देशातील विविध भागातून आलेले शेतकरी आंदोलन करीत असून, केंद्र सरकारने हे नवे धोरण बदलत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा शेतकरी संघटनांचा प्रयत्न आहे. या त्यांच्या प्रयत्नाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ठिकठिकाणी आज आंदोलन करणार आहे. त्यात नगर शहर काँग्रेस श्री.भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन प्रदेश काँग्रेसच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.

    या आंदोलनात श्रीमती शरदा वाघमारे, फिरोज शफी खान, शामराव वाघस्कर,  मार्गारेट जाधव, अज्जूभाई शेख,  विवेक येवले, हनिफ शेख, सुमन काळापहाड,  रुपसिंग कदम, अनिल वराडे, राजेश बाठीया,अॅड.नरेंद्र भिंगारदिवे,आर.आर पाटील ,जाहिदा शेख   आदिंसह तालुक्यातील शेतकरी सहभागी झाला होते.

     आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत नव्या कायद्याला विरोध केला. या आंदोलनामुळे देशातील शेतकर्‍यांमध्ये जागृती झाली असून, केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्याची टिका भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकर्‍यांच्या पाठिशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून, काँग्रेसजण शेतकर्‍यांसाठी यापुढे तीव्र आंदोलन करेल, असा इशारा अ‍ॅड.पिल्ले व फिरोज खान यांनी धरणे आंदोलन प्रसंगी दिा. पदाधिकारी आणि तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शहरातील वाहतूक नियंत्रित करून अपघातांना लगाम घाला

 जागरूक नागरिक मंचची मागणी : वाहतूक निरिक्षकांना ट्रॅफिक केबिनची प्रतिकृती देवून अनोखी गांधीगिरी

वेब टीम नगर :  ३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो, याचे औचित्य साधूत नगरमधील जागरूक नागरिक मंचच्या वतीने अध्यक्ष सुहास मुळे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे निरिक्षक अविनाश शिळीमकर यांना शहरातील नागरिकांना दररोज अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने अर्ध्याहून अधिक लोक आधीच वेगवेगळ्या प्रकारे आपंग झालेले आहेत. त्यामध्ये अजून रस्ते अपघाताची भर पडू यासाठी यासाठी वाहतूक शाखेने गर्दीच्या प्रत्तेक ठिकाणी वाहतूक शाखेच्या कार्माचारींची कायम नियुक्ती करावी तसेच नगर शहराचे नाक असलेला व्हीआरडीई चौक व शक्कर चौकातील बंद पडलेले सिग्नल तातडीने चालू करावीत या मागणीचे निवेदन दिव्यांग जेष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते देवून शहरातील बेशिस्त वाहतूक नियंत्रित करून अपघातांना लगाम घालावे अशी विनंती केली. जागरूक नागरिक मंचच्या मागण्याचे स्मरण राहावे म्हणून सुहास मुळे यांनी टाकाऊ वस्तु पासून तयार केलेली ट्रॅफिक केबिनची छोटीशी प्रतिकृती वाहतूक शाखेचे निरिक्षक अविनाश शिळीमकर यांना यावेळी भेट देवून अनोखी गांधीगिरी केली.

         जागतिक अपंग दिननिमित्त राबव्यात आलेल्या या उपक्रमात प्रास्ताविक धनेश बोगावत यांनी केले. जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास भाई मुळे यांनी शहरातील मुलभूत समस्या आणि वाहतुकीच्या संदर्भात आजवर मंचाने स्वखर्चाने निधी उभारून केलेली कामगिरी याचा आढावा घेतला. सचिव कैलास दळवी यांनी आभार मानले. यावेळी धनेश बोगावत, सचिव कैलास दळवी, भैरवनाथ खंडागळे, प्रा. सुनील पंडित , सुनिल कुलकर्णी, शारदा होशिंग, सुरेखा सांगळे, प्रकाश भंडारे आदी उपस्थित होते. 

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, एखाद्या महायुद्धामध्ये देखील मारले जात नसतील किंवा अपंग होत नसतील इतकी माणसे दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडत आहेत, आणि अपंग होत आहेत. असा एन सी आर बी चा रिपोर्ट आहे. २०१९ साली एकट्या भारतामध्ये तर प्रत्येक२४ तासात ११५१व्यक्ती रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत होत्या. म्हणजेच दरवर्षाला साडेचार लाख लोक रस्त्यावर अपघातात मृत्युमुखी पडले आहेत व सुमारे सहा लाख लोक मागील वर्षी अपंगत्व ला सामोरे गेलेले आहेत.  राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान हा तर वेगळाच भाग आहे. ही खरेतर अतिशय गंभीर बाब आहे. आणि याला कारण आहे, स्वतः नागरिकांमध्ये नियमांविषयी व वाहतुकीविषयी रस्त्यावरती असलेला बेजबाबदारपणा आणि शासनाचा विना दबाव कडक कारवाई करण्याचा अभाव. यामुळे दिवसेंदिवस हे वाढतच चाललेले आहे. याविषयी गंभीर विचार करणे आजच्या जागतिक अपंग दिवसानिमित्त क्रमप्राप्त झालेले आहे.

 आम्ही जागरूक नागरिक मंचातर्फे गेल्या चार वर्षापासून अहमदनगर शहरांमध्ये स्वखर्चाने आजपर्यंत चार चौकांमध्ये प्रत्येकी चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत .,तसेच  लॉकडाउन काळामध्ये रस्त्याचे डिव्हायडर दुरुस्त करून महत्त्वाच्या चौकांमध्ये रिफ्लेक्टर व सोलर कॅट आय बसवण्याचे देखील काम केलेले आहे, नगर शहर हे दुर्दैवाने वाहतुकीच्या बाबतीत अतिशय बेशिस्त शहर म्हणून पंचक्रोशी मध्ये ओळखले जाते,. अहमदनगर ला प्रत्येक दोन वर्षानंतर कधीकधी तर सहा ते आठ महिन्यातच पोलीस निरीक्षक बदलले जातात, नवीन आलेले पोलीस निरीक्षक दोन-तीन महिने खूप काम करत असल्यासारखे दाखवतात,,. खुप कडक वागतात आणि त्यानंतर सर्व काही  रहस्यमयरित्या जैसे थे पूर्वस्थितीवर येते, हा नगरकरांचा आजवरचा अनुभव आहे.

 या दिवाळी मध्ये सालाबादाप्रमाणे प्रचंड गर्दीत आम्हाला एसटी स्टँड, दिल्ली गेट , कापड बाजार, सक्कर चौक व कायनेटिक चौक आणि  यामध्ये पूर्णवेळ वाहतूक पोलीस दिसल्याने समाधान वाटले, परंतु हे समाधान अल्पायुषी ठरू नये, या चौकांमध्ये कायम वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे आपल्या निदर्शनाला आले असेल की, आपल्या शहराचे प्रवेशद्वार अतिशय महत्त्वाचे असलेले २ चौक ते म्हणजे कायनेटिक चौक आणि सक्कर चौक येथील नवीन कोरे बसवलेले लाखो रुपयांचे सिग्नल, गेल्या पाच सहा वर्षांमध्ये गंजून गेलेले आहेत ,परंतु चालू झालेले नाहीत, आमच्या महानगरपालिकेला तर निधी साठी कायम भिकेचे डोहाळे लागलेले असतात,, या पार्श्वभूमीवर आम्ही जागरूक नागरिक मंचातर्फे पाठपुरावा करून माननीय आमदार संग्राम जगताप यांना साकडे घातले असता, त्यांनी सदर चौक स्वतः दत्तक घेऊन त्याचा देखभालीचा खर्च करण्याची तयारी दाखवलेली आहे, तरी आपण यासंदर्भात पुढाकार घेऊन या दोन चौकामधील सिग्नल कसे चालू होतील, याविषयी कृपया पाठपुरावा करणे अपेक्षित आहे, नवीन वर्षाचे स्वागत जर आपण येथील सिग्नल चालू करून आणि चक्क पूर्णवेळ वाहतूक पोलीस उभा करून केले तर नगरकरांना आनंद होईल. यासाठी जागरूक नागरिक मंचातर्फे हवी ती मदत आम्ही करायला तयार आहोत.

आपण या शहराची बेशिस्तपणा ची ओळख निश्चित पुसून टाकाल आणि आपल्या अखत्यारीत जमेल तेवढे वाहतुकीचे साहित्य उदाहरणार्थ सिग्नल व ट्रॅफिक केबिन, रिफलेक्टर व तोडलेले डिव्हायडर इत्यादी बाबत धडाडीने  पुढाकार घेऊन बॅकलॉग भरून काढाल.. अशा सद्भावनेने सह व सहकार्याने आपले स्वागत करीत आहोत, व त्या प्रित्यर्थ टाकाऊ वस्तु पासून तयार केलेली ट्रॅफिक  केबिन ची छोटीशी प्रतिकृती आपणास माननीय प्रकाश कुलकर्णी या दिव्यांग जेष्ठ पत्रकार व्यक्तीच्या हस्ते भेट देत आहोत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वकिलांची कोविड चाचणी करून लॉयर्स डे साजरा

 न्या.  श्रीकांत आणेकर : करोना मुक्त होवून २०२१ नव्या वर्षात आपण प्रवेश करू

वेब टीम नगर : जिल्हा न्यायालयाचे कामकाज आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशा परीस्थीतीत वकिलांची करोना चाचणीचा अत्यावश्यक उपक्रम शहर वकील संघटनेने राबवला आहे. येत्या २०२१ नव्या वर्षात आपण करोना मुक्त होवून प्रवेश करू, येणाऱ्या काळात पूर्वीप्रमाणेच सर्व काही सरू होईल अशी अपेक्षा आहे. बार असोशीएशन दरवर्षी लॉयर्स डेनिमित्त वकिलांसाठी चांगले उपक्रम राबवत आहेत, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी व्यक्त केले.

          शहर वकील संघटनेच्या वतीने लॉयर्स डेनिमित्त जिल्हा न्यायालयात कोणत्याही समारंभाचे आयोजन न करता वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे यांच्या संकल्पनेतून संघटनेच्या वकील सद्स्यंची कोविड-१९ ची आरटीपीसीआर व एंटीजन चाचण्या 

घेण्याचा उपक्रम राबवण्यात आला. कार्याक्रमचे अध्यक्ष प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या हस्ते लॉकडाऊन काळात गरजू वकिलांना मदत करणाऱ्या वकिलांना सन्मानपत्रे देण्यात आले. महानगरपालिकेच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमास मनापा आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे, जिल्हा न्यायाधीश अशोक भिलारे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, आरोग्यधिकारी डॉ.अनिल बोरगे, वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. सुहास टोणे, सचिव ॲड. अमोल धोंडे, खजिनदार ॲड. चेतन रोहाकले आदींसह सोशल डीस्टंसचा नियम पाळत वकील उपस्थित होते.

          प्रास्ताविकात ॲड. भूषण बऱ्हाटे म्हणाले, लॉकडाऊन मुळे जिल्हा न्यायालयाचे कामकाज थांबले होते. सुमारे आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षे नंतर कोर्टाचे कामकाज १ डिसेंबर पासून सुरु झाले आहे. सुरक्षीततेच्या दृष्टीने कोविड १९ चा फैलाव वाढू नये यासाठी जारी केलेल्या सर्व आदेशांचे पालन काटेकोरपणे करणे सर्वांना बंधनकारक आहे. लॉयर्स डेनिमित्त दरवर्षी मोठ्या समारंभाचे आयोजन करत असतो. मात्र यावर्षी कोणत्याही समारंभाचे आयोजन न करता वकील सद्स्यंची कोविड-१९ ची आरटी पीसीआर व एंटीजन चाचण्या घेण्याचा अत्यावश्यक उपक्रम वकील संघटनेने राबवला आहे. तसेच गरजू वकिलांना मदतीचा हात देणाऱ्या वकिलांचा सन्मानही केला आहे.

          यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी करोना महामारी पासून वाचण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड. अमोल धोंडे यांनी केले, ॲड. सुहास टोणे यांनी आभार मानले. यावेळी विशेष सरकारी वकील सुरेश लगड, अतीरिक्त सरकारी वकील अनिल सरोदे, ॲड.विष्णू भोरडे, वकील संघटनेचे सदस्य ॲड. रियाज शेख, ॲड. सुनील तोडकर, ॲड. दीपक वाउत्रे, माजी अध्यक्ष ॲड. शेखर दरंदले, ॲड. शिवाजी कराळे, ॲड. सतीशचंद्र सुद्रिक, ॲड. सुमतीलाल बलदोटा, ॲड. लता वाघ, ॲड. विक्रम वाडेकर, नगरसेवक राजेश कातोरे आदी उपस्थित होते.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोनाच्या संकटकाळात पत्रकारांनी समाज जागृतीचे कार्य केले 

देवदान कळकुंबे : मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आरोग्य दिन म्हणून साजरा

शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची नेत्र तपासणी

वेब टीम नगर :  मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापन दिन राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा केला जात असताना शहरात मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबीराचे उद्घाटन कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यसेवा देणारे व गरजूंसाठी आधार ठरलेल्या बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे व सामाजिक कार्यकर्ते साहेबान जहागीरदार यांच्या हस्ते झाले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, डॉ.इमरान शेख, नेत्रतज्ज्ञ डॉ. अरबाज शेख, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, ज्येष्ठ छायाचित्रकार राजू शेख, नफिस चुडीवाले आदिंसह पत्रकार, छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले. देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्या मराठी पत्रकार परिषदेची स्थापना ३ डिसेंबर १९३९ रोजी झाली होती. राज्यात कोरोना आणि तत्सम आजाराने ४२ पत्रकारांचे बळी गेले आहे. ४०० पेक्षा जास्त पत्रकार पॉझिटीव्ह झाले होते.पत्रकारांचे स्वतःच्या तब्येतीकडे होणारे दुर्लक्ष आणि शासन आणि व्यवस्थापनाची पत्रकारांच्या बाबतची उदासिन भूमिका या पार्श्‍वभूमीवर परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांच्या संकल्पनेतून हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले असून, राज्यभर विविध शिबीर घेऊन 5 हजार पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी त्यांच्या कुटुंबीयांसह केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले.

रफिक मुन्शी म्हणाले की, शोध पत्रकारितेचा वारसा जिल्ह्यातील पत्रकार चालवित आहे. कोरोना काळात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. पत्रकारांचे नेतृत्व करीत असताना सामाजिक भावनेने मन्सूर शेख यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्यांचा दूरदर्शीपणा व बहुआयामी व्यक्तीमत्व कौतुकास्पद असल्याचे सांगितले. देवदान कळकुंबे यांनी बुथ हॉस्पिटलने कोरोनाच्या संकटकाळात नगरकरांच्या आरोग्य सांभाळले तर पत्रकारांनी समाज जागृतीचे कार्य केले. पत्रकारांच्या हातात लेखणीचे धारदारशस्त्र असून, शुध्द भावनेने केलेल्या पत्रकारितेने समाजाला दिशा दिली आहे. कोरोनाच्या संकटकाळात  बुथ हॉस्पिटलने पोलीस व पत्रकारांच्या आरोग्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

झेंडीगेट येथे झालेल्या या शिबीरात नेत्रतज्ज्ञ डॉ. अरबाज शेख यांनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची डोळ्यांची तपासणी केली. तर डोळे उत्तम राहण्यासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. शिबीरार्थींच्या डोळ्याचे नंबर तपासून त्यांना चष्म्यांचेही वाटप करण्यात आले. पत्रकारांनी या शिबिराचा सहकुटुंब लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका धारवाले यांनी केले. आभार आफताब शेख यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेतकर्‍यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन केंद्र सरकार भांडवलदारांच्या दावणीला बांधले गेले 

प्रा. अशोक डोंगरे : दिल्लीतील शेतकरी आंदोलनास आम आदमी पार्टीचा पाठिंबा

वेब टीम नगर : विविध राज्यातून आलेल्या शेतकर्‍यांचे गेल्या सात दिवसापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनास आम आदमी पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. मार्केटयार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करुन शेतकरी आंदोलकांचे मागण्या मान्य करीत शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनात शहर जिल्हा संघटक प्रा.अशोक डोंगरे, शहर महिला आघाडी अध्यक्षा सुचिता शेळके, रेव्ह. आश्‍विन शेळके, राजू शेख, अण्णा आळकुटे, रावसाहेब चिंधे, विकास निमसे, सतीश बेरड आदि उपस्थित होते.

भाजपप्रणित मोदी सरकारने बहुमताचा फायदा घेत शेती विधेयक पारित केल्यापासून संपुर्ण देशातील शेतकरी पेटून उठले आहेत. तिन्ही शेतकरी विरोधी कायदे रद्द होण्यासाठी दिल्लीत मागील सात दिवसापासून आंदोलन सुरु असून, सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाची दखल घेत नसल्याने दिवसंदिवस या आंदोलनाची धग वाढत आहे. शेतकरी आंदोलकांचे मागण्या मान्य करुन शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे व आंदोलक शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.  

शेतकर्‍यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन केंद्र सरकार भांडवलदारांच्या दावणीला बांधले गेले आहे. काद्याला विरोध दर्शविणार्‍या शेतकर्‍यांवर लाठी हल्ला, अश्रूधुर व पाण्याचे फवारे मारुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकरी कोरोनातील टाळेबंदी, नैसर्गिक संकटाने ग्रासलेला असताना शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकर्‍यांना आत्महत्येच्या दरीत लोटण्याचा हा प्रकार सुरु आहे. तातडीने संसेदत विशेष अधिवेशन घेऊन शेतीविषयक कायदे रद्द करण्याची गरज असल्याचे प्रा.अशोक डोंगरे यांनी सांगितले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ओबीसी, व्हीजे-एनटी आरक्षणासंदर्भात शनिवारी बैठक

वेब टीम नगर : ओबीसी व्हीजे-एनटी आरक्षणासंदर्भात शनिवार दि.५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जालना-औरंगाबाद रोड येथील छत्रपती लॉनमध्ये (जि. औरंगाबाद) राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस अहमदनगर जिल्ह्यातून सर्व समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाअध्यक्ष आनंद लहामगे, जिल्हाध्यक्ष रमेश सानप, मदनशेठ पालवे, बाबासाहेब वाघ तसेच सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केले आहे.

या बैठकिला मंत्री विजय वडेट्टीवार, ओबीसी नेते बाळासाहेब सानप, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, अशोक सोनवणे तसेच राज्यातील सर्व ओबीसी आमदार मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकिला नगर जिल्ह्यातून समता परिषदेचे अंबादास गारुडकर, भगवान फुलसौंदर, दत्ता जाधव, प्रा.माणिक विधाते, हरीभाऊ डोळसे, प्रकाश सैंदर, बाबासाहेब सानप, नगरसेवक रामदास आंधळे, अशोक बडे, बाळासाहेब बोराटे, काका शेळके, डॉ.श्रीकांत चेमटे, अ‍ॅड. बाळासाहेब खांडरे, अमोल ढापसे, जालिंदर बोरुडे, कैलास गर्जे, विशाल वालकर, संजय आव्हाड, निशांत दातीर, शशीकांत पालवे, दिपक कावळे, शरद मुर्तडकर आदिंसह तेली, माळी, धनगर, न्हावी, वंजारी, गवळी, ओबीसी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकित ओबीसी, व्हीजे-एनटी आरक्षणासंदर्भात चर्चा करुन, सदर आरक्षण मिळण्यासाठी पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. सर्व समाज बांधवांनी या बैठकिस उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments