अजित पवारांच्या हस्ते विठुरायाचा अभिषेक

उपमुख्यमंत्र्यांची कार्तिकी वारी


वेब टीम पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सपत्नीक पंढरीच्या विठुरायाची शासकीय महापूजा केली.अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत कवडू भोयर व कुसुमबाई भोयर या वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दाम्पत्याला राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं देण्यात येणारा प्रवास सवलत पास सुपूर्द करण्यात आला. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे, पार्थ आणि जय पवार यांचीही यावेळी उपस्थिती होती. 

महापूजेनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जग करोनामुक्त होवो, असं साकडं विठुरायाला घातल्याचं त्यांनी सांगितलं. ‘सध्या संपूर्ण जगापुढं करोनाचं संकट आहे. आपणही संकटाला सामोरं जातोय. मधल्या काळात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं पाहायला मिळत होतं. पण पुन्हा एकदा रुग्ण वाढताहेत. त्यामुळं आपल्याला पुन्हा एकदा काही बंधनं पाळणं, खबरदारी घेणं गरजेचं आहे’, असं आवाहनही त्यांनी केलं. आषाढीप्रमाणे कार्तिकी वारीलाही सरकारनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पंढरपुरात गर्दी न केल्याबद्दल अजित पवारांनी वारकरी संप्रदायाचे आभार मानले. 

'राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:ख हलकं करण्याची ताकद सरकारला दे, असं साकडंही अजित पवार यांनी पांडुरंगाला घातलं. करोना रोखायचा असेल तर सर्व काही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. सरकारनं घालून दिलेले सर्व नियम लोकांनी काटेकोरपणं पाळणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments