तहसीलदाराला चिरडून ,मारण्याचा प्रयत्न

तहसीलदाराला चिरडून ,मारण्याचा प्रयत्न 


वेब टीम  सांगली :  अवैध वाळू उपसा आणि वाहतूक थांबवण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर पिकअप वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार शनिवारी (ता. २१) दुपारी एकच्या सुमारास तासगावमधील कपूर ओढ्यात घडला. या पूर्वी नगर जिल्ह्यातही असे प्रकार घडले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती सांगली जिल्ह्यातही घडली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तहसीलदार  ढवळे (वय ४४, रा. तासगाव) यांनी मंगळवारी रात्री उशिरा तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अनिकेत अनिल पाटील (रा. पुणदी रोड, तासगाव) याच्यासह आणखी एका अनोळखी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तासगाव शहरापासून जवळच असलेल्या कपूर ओढ्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांना मिळाली होती. माहितीची खात्री करून त्या शनिवारी दुपारी एकच्या सुमारास कर्मचाऱ्यांसह कपूर ओढ्यावर पोहोचल्या. यावेळी एका पिकअप वाहनात अवैधरित्या वाळू भरण्याचे काम सुरू होते. तहसीलदार ढवळे यांनी उपस्थितांना काम थांबवण्याची सूचना केली. वाहन जप्तीची कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनिकेत पाटील आणि त्याच्या सहकाऱ्याने तहसीलदारांच्या कारवाईला विरोध केला.

 अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच बाजूला झाल्याने तहसीलदार बचावल्या. स्वतःचा बचाव करताना जमिनीवर पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. याबाबत तहसीलदार ढवळे यांनी मंगळवारी रात्री उशिरा तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत पाटील याच्यासह त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल केला.

Post a Comment

0 Comments