छायाचित्र मतदार याद्यांचा पुन:निरिक्षण कार्यक्रम जाहीर

 छायाचित्र मतदार याद्यांचा  पुन:निरिक्षण कार्यक्रम जाहीर

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन

वेब टीम नगर : भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचेकडून दि.१ जानेवारी २०२१ या  दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्‍त पुन:निरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश मतदानापासून वंचित राहिलेल्‍या मतदारांना आणि नवीन मतदार म्‍हणून पात्र असलेल्‍या मतदारांना संधी देणे तसेच नाव नोंदणी वाढविणे व चुका विरहित मतदार याद्या तयार करणे हा आहे. सदर मतदार याद्या पुन:निरिक्षण कार्यक्रम दि. ३०सप्‍टेंबर २०२० पासून राबविला जात असून तो १५ जानेवारी २०२१ पर्यंत  राबविला जाणार आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुन:निरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक १७ नोव्‍हेबर २०२० रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवमतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली असून प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची खात्री करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म नमुना-६ म्हणजेच मतदार नांव नोंदणीसाठी आवश्यक नमुना फॉर्म भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा. ज्या व्यक्तीचे दि. ०१ जानेवारी २०२१ रोजी वय १८ वर्ष पूर्ण होत आहे, परंतु मतदार यादित नांव नाही,अशा व्यक्तीने आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करुन घेणेसाठी फॉर्म नमुना -६ भरुन द्यावा. ज्या मतदाराच्या मतदार यादितील तपशिलात (नांव,वय,लिंग,फोटो) इ. मध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करुन घेणेसाठी फॉर्म नमुना-८ भरुन द्यावा.अहमदनगर जिल्ह्याच्या मतदार यादीत मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांची संख्या अद्यापही आढळून येत असल्यामुळे त्या नावांची वगळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदारांनी स्वत: पुढाकार घ्यावा. व मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नांवे मतदार यादीमधून वगळण्याची कार्यवाही करावी. कुंटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाली असल्यास त्या व्यक्तीचे नांव मतदार यादिमधून वगळण्यासाठी मृत्युच्या दाखल्यासह फॉर्म नमुना-७ भरुन द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या मतदार यादित स्त्री-पुरुष प्रमाण ९२३ इतके आहे. त्यामुळे महिला मतदारांची नांव नोंदणी वाढविण्यासाठी गावातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,महिला बचतग़ट,यांनी यासाठी गावोगावी विशेष मोहिम घेउन गावातील ज्या महिलांचे वय दिनांक १ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षपूर्ण होत आहे. परंतु मतदार यादित नांव नाही अशा महिलांची नांवे मतदार यादित समाविष्ट करुन घ्यावी, असे श्री. पाटील यांनी सांगितले.                    

 नागरीकांसाठी सुविधा :- नागरीकांकडून दावे व हरकती स्वीकारणेसाठी दिनांक १७ नोव्‍हेंबर ते १५ डिसेंबर २०२१ हा कालावधी असून सदरच्‍या हरकती स्‍वीकारणेकामी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय (BLO) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागरीकांच्या मदतीसाठी  तहसिल कार्यालयात मतदार मदत केंद्र (Voters Help Centre) सुरु करण्यात आलेले आहे

नवीन  नाव नोंदणीसाठी - नमुना-६

तपशिलात दुरुस्ती करणेसाठी - नमुना-८

नावाची वगळणी करणेसाठी - नमुना-७

मतदारसंघात नाव बदली करणेसाठी - नमुना-८ A

सदर पुनःरिक्षण कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्‍वाचा असून, राजकीय पक्षांनी आपले प्रतिनिधींची मतदान केंद्रस्‍तरीय प्रतिनिधी (बी.एल.ए.) म्‍हणून नेमणूक करावी. १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष्‍ संक्षिप्‍त पुनःरिक्षण कार्यक्रम असल्‍यामुळे जिल्‍हयातील  सर्व १२ विधानसभा मतदारसंघातील ३७२२ मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांची कार्यालये तथा मतदान केंद्रे या‍ ठिकाणी संक्षिप्‍त पुनःरिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येणार असून, सदर कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविला जात आहे किंवा कसे? याची तपासणी करण्‍याकरीता विशेष उपाययोजना राबविण्‍यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments