"मोठ्या मुलांच्या दत्तक विधानासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे "- सुधीर पाटील

  "मोठ्या मुलांच्या दत्तक विधानासाठी

 समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे "- सुधीर पाटील

वेब टीम नगर : भारतात लहान बाळांना दत्तक घेण्यासाठी पालकांची प्रतीक्षा यादी ३० हजारांवर गेली आहे.  नोंदणीनंतर मुल मिळण्यासाठी सुमारे  अडीच वर्षांचा काळ लागतो आहे .तर दुसरीकडे हजारो मोठ्या वयाच्या अनाथ-बेघर मुलांना पालकांची प्रतीक्षा आहे. ही दरी मिटवण्यासाठी मोठ्या मुलांच्या दत्तक विधानाबाबत  समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन नूतन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुधीर पाटील यांनी केले. 

महिला - बाल विकास विभाग आणि  स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या  संयुक्त  विद्यमाने दत्तक विधान प्रचार व प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. १४ ते २१ नोव्हेंबर दरम्यान या सप्ताहात निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केडगाव येथील  वात्सल्यमुर्ती रुपाली जयकुमार मुनोत बाल संकुल येथे दत्तक विधान सप्ताहाचे उद्घाटन  पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अहमदनगर जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख,प्रवीण मुत्याल  आणि इतर सदस्य उपस्थित होते.

          स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने मागील ५ वर्षात भारतात सर्वाधिक दत्तक विधाने केली.त्यामुळेच भारताच्या दत्तक विधानाची धोरण ठरविणाऱ्या कारा संस्थेच्या  केंद्रीय सुकाणू समितीवर स्नेहांकुर ला सदस्यत्व मिळाले. बालसेवा आणी दत्तकविधानाचा दर्जा आणि गुणवत्तेसाठी स्नेहांकुर करीत असलेल्या कामाने बाल विकासाच्या क्षेत्रात  नगर जिल्ह्यची प्रतिष्ठा उंचावण्याचे  पाटील यांनी यावेळी नमूद केले.

          यानिमित्ताने नगर जिल्ह्यात दत्तक इच्छुक पालकांचे समुपदेशन आणि प्रबोधन , दत्तक घेतलेल्या कुटुंबांशी दत्तकेच्छुक  कुटुंबांचा संवाद, रेडिओ आणि वृत्तपत्राद्वारे दत्तक विधान प्रक्रिया बद्दल चे प्रबोधन, दत्त बालकांशी संवाद आणि मुलाखत, नगर जिल्ह्यातील दत्तक बालकांच्या सद्यस्थितीचे सर्वेक्षण, रस्त्यावरील अनौरस - बेघर - अनाथ मुलांचा शोध घेणे, त्यांना दत्तक विधानाच्या प्रक्रियेत आणणे, ग्रामस्तरावर ग्रामसभांच्या तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रबोधन करणे,वंचित बालकांची आरोग्य तपासणी आदी उपक्रमांचे आयोजन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राद्वारे करण्यात आले आहे.             बालकांवरील वाढते अत्याचार, बाल विवाह, बाल कामगार प्रथा यातून मुक्त केलेल्या बालकांच्या कौटुंबिक पुनर्वसनाबाबत  हनीफ शेख आणि बाल संरक्षण अधिकारी सर्जेराव शिरसाठ  यांनी उपस्थितांशी संवाद केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  बाळासाहेब वारुळे यांनी केले.

यावेळी महिला व बाल विकास विभागातील अधिकारी संध्या राशिनकर, अहमदनगर बाल कल्याण समितीचे सदस्य  ॲड.बागेश्री जरंडिकर, ॲड.विनायक सांगळे, ज्योत्स्ना कदम, स्नेहालयचे सहसंचालक अनिक गावडे, संतोष धर्माधिकारी, शितल घोडके, राघवेश्वर आपटे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments