२६ नोव्हेंबरचा देशव्यापी संप यशस्वी करण्यासाठी संयुक्त संघर्ष समितीची स्थापना
केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी: शेतकरी, कामगार, सरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर संघटना एकवटले
वेब टीम नगर - टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने हे हक्क आणि अधिकार अबाधित ठेऊन केंद्र सरकारने घेतलेल्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. जगातील पहिली कामगार, शेतकरी रशियन समाजसत्तावादी क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे पार पडलेल्या बैठकित जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, सरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर संघटनांनी एकत्र येत एल्गार पुकारुन संप यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर शेतकरी, कामगार संयुक्त संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.
प्रारंभी हुतात्मा स्मारक येथील चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतिस्थळी पुष्पहार अर्पण करुन बैठकीची सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाला तसेच खाजगीकरण, कंत्राटीकरणाला विरोध करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी होणार्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील सर्व संघटना उतरणार असून, हा संप यशस्वी होण्यासाठी सर्व संघटनांनी पुढाकार घेतला आहे. झालेल्या बैठकित आयटकचे अॅड.कॉ. सुभाष लांडे, अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, अंबादास दौंड, हमाल मापाडी संघटनेचे अविनाश घुले, सिटूचे कॉ. महेबुब सय्यद, महादेव पालवे, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, शिक्षक संघटनेचे राजेंद्र लांडे, आप्पासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोटे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेचे सतीश भूस, विद्रोही संघटनेचे डॉ.बापू चंदनशिवे, बाळासाहेब सागडे, मीनानाथ थोरात, वैभव कदम, हरीभाऊ रौंदळ, लहू लोणकर आदी उपस्थित होते.
या बैठकित प्रत्येक संघटनेशी संलग्न युनियन, कामगार, शिक्षक, सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना २६ नोव्हेंबरला काम बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व स्तरातून केंद्र सरकार विरोधात असंतोष असून, सर्वच संघटना उत्सफुर्तपणे या बंद मध्ये सहभागी होणार आहे. अनेक संघटनांनी शेतकरी, कामगार संयुक्त संघर्ष समितीला पाठिंबा दिला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बुधवार दि.१८ नोव्हेंबर रोजी हमाल पंचायत येथे संयुक्त बैठक घेतली जाणार असून, यामध्ये २६ नोव्हेंबरच्या संपाचे नियोजन ठरणार आहे.
0 Comments