भ्रमंती

 भ्रमंती 

कोटबाग निजाम" ५३१ वर्षाच्या इतिहासाची

साक्ष देणारा नगरचा भुईकोट किल्ला 




अहमदनगर काना मात्रा वेलांटी नसलेलं गाव असा नगर शहराचा लौकिक, मात्र ऐतिहासिक दृष्ट्या या शहराचं महत्व तसं आजही अलौकिकच म्हणावं लागेल.

 नुकताच नगर शहरानं ५३१ वा वर्धापनदिन साजरा केला. पंचशताब्दी नंतरही ही अहमदनगर शहरात तत्कालिन अनेक वास्तू आपल्या इतिहासातील वैभवाची साक्ष देत उभ्या आहेत."कोटबाग निजाम” म्हणजेच नगरचा सुप्रसिद्ध भुईकोटकिल्ला. "नवं नगर'च्या उभारणीतील ही पहिली वास्तु, नगरच्या निजामशाहीच्या उदयापासून ते भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळ्या पर्यंतच्या अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार...

आदिलशाही, कुतूबशाही, हैद्राबादची निजामशाही आदी विरूद्ध बहामनी सेनेचं आक्रमण थोपविण्याची जबाबदारीअहमदनिजाम शहावर पडल्यानंतर आपल्या अतुलनीय शौर्यानं ज्या ठिकाणी बहामनी सेनेला धूळ चारून विजय मिळविला तो गर्भगिरी पर्वत रांगालगतचा हा निसर्ग रम्य प्रदेश, या ठिकाणी अहमद-निजामशहानं मिळविलेल्या विजयाला नंदनवनातील विजय असं संबोधलं. लढाईतील विजयाचं स्मारक म्हणून १४९० मध्ये या यशदायी जागेत राजवाडा उभारला, भोवताली सुंदर उद्यानं उभारली. या वास्तुचं त्याने 'कोटबाग निजाम' असं नामकरण केलं कालांतराने संरक्षक्षणाच्या दृष्टीनं राजवाड्या सभोवती खंदक,मातीची तटबंदी अशा सुधारणा करण्यात आल्या. आज अस्तित्वात असलेली दगडी भक्कम तटबंदी म्हणजेच आजचा किल्ला १५६० सालचं हे त्याचं नवं रुपडं...


नगरच्या भुईकोट किल्ल्याला प्राप्त झालेलं सामारिक महत्व तेव्हा पासून आजतागायत टिकून आहे. १ मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला आशिया खंडातील मोठ्या किल्ल्यांपैकी अग्रक्रमावर असलेला किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकड्या यामुळे सहजासहजी शत्रुच्या दृष्टीपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी. टेकड्यांमुळे बुरूजांवर तोफा डागणं अशक्य त्यामुळे किल्ल्याची अभेद्यता वाढली. वर्तुळाकार असलेल्या किल्ल्याला २२ बुरूज आहेत. अहमद निजामशहानं आपल्या कर्तबगार, मुत्सद्दी प्रधान, सेनापती आदींची नावे बुरूजांना देऊन त्यांचा सन्मान केल्याचं दिसून येतं. तटबंदीच्या आतील बाजूस एकूण सहा राजमहाल होते. सोनमहल, मुल्क आबाद, गगन महल, मीना महल, रुपमहल, बगदाद महल, अशी त्यांची नावं. इमारतींच्या मध्यभागी एक मदरसाही बांधला होता. या मदरशातच राजघराण्यातील मुलांचे शिक्षण होत असे. दिलकशाद,हबशीखाने अशा इतर वास्तुंची निर्मिती गरजेप्रमाणे होत गेली. छोटेखानी गांवच किल्ल्याच्या तटबंदीआड वसलं होतं. या साऱ्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चार मोठ्या विहिरीही खोदण्यात आल्या. गंगा, यमुना, मछलीबाई, शक्करबाई अशी त्यांची नावं होती. आता या विहिरींचं आणि महालांचं अस्तीत्व दिसत नाही. 'कोटबाग निजाम' आणि आसपासच्या इतर देखण्या वास्तूंमुळे येथे वैभवशाली नगरी वसली. त्या काळी या नगरीची तुलना बगदाद, कैरो, सारख्या तत्कालिन सुंदर नगरांशी झाल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. निजामशाही, मोगलाई, पेशवाई, ब्रिटीश अशा अनेक राजवटी या किल्ल्यानं अनुभवल्या. राजवटीनुरूप या वास्तुच्या जडणघडणीतही बदल घडले. निजामांनी किल्ल्यात वास्तव्य केले. मोगलांनी किल्ल्याचा सामरिक वापर केला. तर ब्रिटीशांनी या किल्ल्याचा वापर कारागृह आणि दारूगोळा निर्मिती केंद्र म्हणून केला.


इतिहासातील अनेक कटूगोड स्मृती "कोटबाग निजाम"ने आपल्या उदरात सामावून ठेवल्या आहेत. कधी या किल्ल्याने तत्कालिन परदेशी मुस्लिमांच्या शीरकाणाने प्रचंड नरसंहार अनुभवला. तर कधी फंदफितुरीची अनेक कारस्थानं इथच शिजली.अनेकदा भाऊ बंदकीची नाट्यं घडली. अनेकदा शौर्याचे प्रसंग या किल्ल्याने अनुभवले. कित्येकदा किल्ल्याला वेढा पडून तहाचे प्रसंग उद्भवले. जिथे सुलताना चाँदच्या शौर्याचा दिमाख इथल्या शिळांनी अनुभवला तिथेच चाँदच्या भीषण हत्येचा साक्षीदार याच पाषाणचिरांना व्हावं लागलं. मोगलांनी किल्ला सर करण्यासाठी जंगजंग पछाडलं, तर पेशव्यांनी बंदुकीची गोळीही न उडविता मुत्सुद्दीगिरीने किल्ला काबीज केला. किल्ल्यासाठी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनाही या किल्ल्याने भुरळ घातली होती. या किल्ल्याचे सामरिकदृष्ट्या असलेलं महत्व ते जाणून होते. त्याही पेक्षा आपल्या वाडवडिलांची कर्मभूमी असल्याने हा किल्ला आपल्या अंमलाखाली असावा, असं शिवाजी महाराजांना नेहमी वाटत असे. महाराजांच्या सेन्यानं हा प्रांत तीनवेळा लुटला यावरून इथल्या सुबत्तेची कल्पना येते. मोगलांचा किल्लेदार मुफलतखान याने सर्वसंपत्ती किल्ल्यात आणून ठेवल्याने मराठी सैन्याच्या हाती फारसे काही लागलं नाही. किल्ला जिंकणं ही शिवाजी महाराजांची मनिषाही अपूर्णच राहिली.

सुलताना चाँदच्या हत्येनंतर सन १६०० मध्ये पहिल्यांदा हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. पुढे मोघलांचा सरदार कवी जंग याला वैयक्तिक जहागिरी बहाल करून पेशव्यांनी कोणत्याही रक्तपाताविना, मुत्सुद्देगिरीनं हा किल्ला पेशवाईच्या अंमलाखाली आणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं. कालांतराने ब्रिटीशांनी पेशव्यांकडून हा किल्ला हस्तगत केला. किल्ल्यात प्रवेश करण्यापुर्वी इंग्रजसेनापती जनरल ऑर्थर वेलस्ली याने खंदकाशेजारील चिंचेच्या झाडाखाली बसून न्याहारी केली. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी चार तोफा ठेवण्यात आल्या आहेत.

इंग्रज राजवटीच्या विरोधात चलेजाव आंदोलनाचे लोण १९४२ साली देशभर पसरल्यानंतर आंदोलनाचे नेते पंडीतजवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, गोविंद वल्लभपंत, आचार्य नरेंद्र देव, सरदार वल्लभभाई पटेल, पंडीत हरिकृष्ण मेहताब, आचार्य कूपलानी, डॉ. सय्यद महेबुब, डॉ. पट्टाभी सितारामय्या, अरूणा असफअली, डॉ. पी. सी. भोज, आचार्य शंकरराव देव आदी नेत्यांना या किल्ल्यात डांबण्यात आले होते. बंदीवासात असताना पंडीत नेहरू यांनी “डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हा ग्रंथ लिहिला. अबु कलाम आझाद यांनी 'गुबारे खातीर” या ग्रंथाचे लेखन याच किल्ल्यात केले. चौथ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गुढमृत्यूही याच किल्ल्यात झाला. ब्रिटीशांच्या काळात किल्ल्यात बरेच बदल झाले. किल्ल्याच्या पुर्वेला असलेला झुलता पूल १९३२ साली ब्रिटीशांनी बांधला. काडतुसे निर्मितीची प्रयोगशाळा किल्ल्यात उभारली. तिला रॉकेटरूम म्हटले जायचे.


भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून १५ ऑगस्ट १९४७ साली दिल्लीत झेंडावंदन सुरू असतानाच या किल्ल्यावरीलब्रिटीशांचा "युनियन जॅक"  उतरविण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सवी सोहळा याच किल्ल्यात पार पडला. भारतीयस्वातंत्र्यानंतर या किल्ल्याचं महत्वं जरी वाढलं तरी हा किल्ला लष्करी हद्दीत असल्यानं तेथे लष्करी कार्यालये सुरू करण्यात आले.तेव्हापासूनच पुरातत्व खात्याचं या किल्ल्याकडं दुर्लक्ष झालं. खंदकात प्रचंड झाडी वाढली, इलाही बुरूजाकडे जाणारा पुलकोसळला. दगडी तटबंदीतून झुडूपे वाढल्याने किल्ल्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला.

या ऐतिहासिक किल्ल्याला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. 

Post a Comment

0 Comments