गोरगरीब भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारु नये

गोरगरीब भाजी विक्रेत्यांवर 

कारवाईचा बडगा उगारु नये

माहेर फाऊंडेशनच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन

भाजी विक्रेत्यांना उठवल्याने  कुटुंबीयांची उपासमार

वेब टीम नगर - कोरोना महामारीच्या संकटातील टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक नागरिक भाजी विक्रीचा व्यवसाय करीत आहे. मात्र महापालिकेतील कर्मचारी ऐन सणासुदीच्या काळात त्यांना भाजी विक्री करणार्‍यांना मज्जाव करुन रस्त्याच्या कडेला बसण्यास विरोध करुन त्यांना उठवले जात असताना आर्थिक परिस्थिती सुरळीत होईपर्यंत त्यांना रस्त्याच्या कडेला भाजी विक्रीचा व्यवसाय करु देण्याची मागणी माहेर फाऊंडेशनच्या वतीने आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अध्यक्षा रजनीताई ताठे, शबाना शेख, रोहिनी कांबळे, फरजाना शेख, रेखा शिंदे आदींसह भाजी विक्री करणार्‍या महिला उपस्थित होत्या.  आयुक्त मायकलवार यांनी महिलांच्या शिष्टमंडळास सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.  

कोरोनाच्या संकटकाळात झालेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. महिलांना बचत गटाचे हप्ते भरणे, मुलांचा शिक्षणाचा खर्च, घर भाडे, लाईट बील, वैद्यकिय खर्च, दैनंदिन खर्च भागवणे कठिण झाले आहे. अनेकांनी तर या खर्च भागविण्यासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे. टाळेबंदीत अनेकांचा रोजगार बुडाला तर अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. अशा संकटमय परिस्थितीमध्ये अनेक महिला, पुरुष व युवकांनी रस्त्याच्या कडेला बसून किरकोळ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यातून त्यांचा दैनंदिन खर्च भागत आहे. सध्या मनपा प्रशासनाचे कर्मचारी रस्त्याच्या कडेला बसलेल्या सर्वसामान्य गोरगरीब भाजी विक्रेत्यांना उठवत असल्याने ऐन सणासुदीच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


शहरातील भाजी विक्रेत्यांना वाहतुकीला अडथळा होणार नाही याप्रमाणे फिजीकल डिस्टन्सचे पालन करुन भाजी विक्री व्यवसाय करु द्यावा, आर्थिक परिस्थिती सुरळीत होत  नाही तो पर्यंत मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारुन सर्वसामान्य भाजी विक्रेत्यांना त्रास देऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  




Post a Comment

0 Comments