घर बांधणीसाठी दिले जाणार कर्ज

 घर बांधणीसाठी दिले जाणार कर्ज 

 पत नसल्याने बेघरांना कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ,आत्मनिर्भर आवास अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी होणार स्थापन

 वेब टीम नगर - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने घरकुल वंचितांच्या घरासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेद्वारे जागेचा प्रश्‍न सोडविण्यात आला आहे. मात्र बेघरांचा बँकेत पत नसल्याने त्यांना कर्ज देण्यास कोणती बँक तयार नाही. त्यांना कर्ज उपलब्ध करुन घरकुल होण्यासाठी संघटनेने आत्मनिर्भर आवास अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीची स्थापना करणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

घरकुल वंचितांना परवडतील अशा दरात घर बांधण्यासाठी एक गुंठा जमीन मिळवून देण्यासाठी तसेच मूळ जमीन मालकाला बाजारभावाप्रमाणे पैसे देऊन ही योजना संघटनेने कार्यान्वीत केली आहे. इसळक-निंबळक येथील सर्व्हे नं. ५४ या १० एकरच्या खडकाळ पड जमीनीवर २३१ प्लॉट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर १ गुंठ्याचे प्लॉट हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून घरकुल वंचितांना अवघ्या ८० हजार रुपयात मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून मिळणारे अनुदान घरकुल पुर्ण झाल्याशिवाय मिळत नसल्याने घरकुल वंचितांपुढे घर बांधण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बेघरांचे बँकेत पत नसल्याने बँका घर बांधण्यासाठी कर्ज देण्यास तयार नाही. यासाठी आत्मनिर्भर आवास अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीची स्थापना करुन घरकुल वंचितांना सभासद करुन घेतले जाणार आहे. तर घर घेण्यासाठी लाभार्थीं सभासदांना अडीच लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उर्वरीत रक्कम घरकुल वंचितांनी उपलब्ध केल्यास त्यांचा घरांचा स्वप्न साकार होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

घर झाल्यानंतर पंतप्रधान आवास योजनेद्वारे मिळणारे अनुदानातून कर्ज फेड शक्य होणार आहे. प्रस्तावित घरकुल प्रकल्पाच्या जमीन खडकाळ असल्याने पायाचा खर्च वाचणार आहे. तर रस्ते, पाणी देखील सहज उपलब्ध होणार आहे.तीन घरकुल वंचितांचा गट करुन ते एकमेकास जामीनदार राहणार आहे. यासाठी घरकुल गहाण कर्ज योजना क्रेडीट सोसायटीच्या वतीने राबविण्यात येणार आहे. घरकुल वंचितांचे घर करुन त्यांना एकप्रकारे प्रतिष्ठा मिळवून देऊन त्यांना सामर्थ्यवान बनवायचे असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. घरकुल वंचितांचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, देविदास येवले, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, संतोष लोंढे, लता शिंदे, सखुबाई बोरगे, नसीम पठाण आदी प्रयत्नशील आहेत. Post a Comment

0 Comments