इसळक-निंबळक येथील प्रस्तावित जागेची बेघरांनी केली प्रत्यक्ष पहाणी

 इसळक-निंबळक येथील प्रस्तावित 

जागेची बेघरांनी केली प्रत्यक्ष पहाणी

बेघरांना जागेसाठी मोफत अर्जाचे वाटप

वनश्री बलभिम आण्णा डोके नगर स्थापन करण्याचे प्रस्ताव पूजन

वेब टीम नगर - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेतंर्गत इसळक-निंबळक येथे घरकुल वंचितांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून, या जागेची रविवारी (दि.१ नोव्हेंबर) घरकुल वंचितांनी प्रत्यक्ष पहाणी केली. तर यावेळी वनश्री बलभिम आण्णा डोके नगर स्थापन करण्याचे प्रस्ताव पूजन करण्यात आले. तसेच बेघरांना जागा मिळण्यासाठी मोफत अर्जाचे वाटप करण्यात आले.

प्रारंभी कै. बलभिम आण्णा डोके यांच्या प्रतिमेस व त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी साकारलेल्या जंगलपेर काठीस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश भंडारे, वीरबहादूर प्रजापती, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, देविदास येवले, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, संतोष लोंढे, लता शिंदे, सखुबाई बोरगे, नसीम पठाण, सरस्वती पुंड, उषा निमसे, सुशीला देशमुख, रोहिणी नागापूरे, अस्मिता पांडुळे, अनिता बहिरट, संध्या कदम, सुमन जोमदे, सुनिता वाघ, नंदा औशीकर, कमल दहीहंडे आदींसह घरकुल वंचित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेरे देश मेरा अपना घर आंदोलनाने गेली सहा वर्षे सातत्याने घरकुल वंचितांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी सरकारकडे अर्ज विनंती केले. वेळोवेळी आंदोलने करुन पाठपुरावा केला. परंतु केंद्र आणि राज्य सरकार याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने शहरात घरकुल वंचितांसाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना राबविली जात आहे. घरकुल वंचितांना परवडतील अशा दरात घर बांधण्यासाठी एक गुंठा जमीन मिळवून देण्यासाठी तसेच मूळ जमीन मालकाला बाजारभावाप्रमाणे पैसे देऊन ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. यासाठी इसळक-निंबळक येथील सर्व्हे नं. ५४ या १० एकरच्या खडकाळ पड जमीनीवर २३१ प्लॉट पाडण्यात आले आहे. सदर १ गुंठ्याचे प्लॉट हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून घरकुल वंचितांना अवघ्या ८० हजार रुपयात मिळणार आहे. ज्या घरकुल वंचितांची महापालिकेत नोंद आहे. अशा लाभार्थींना सदर जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर जागा बलभिम आण्णा डोके यांच्या कुटुंबियांच्या मालकीची आहे. संपुर्ण जागेचे पैसे देऊ पर्यंत उद्योजक शिवराज डोके हे या घरकुल वंचितांच्या सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून निवडण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला.

अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, एक भूमी गुंठ्यासाठी घरकुल वंचितांना ८० हजार रुपयाचे चेक किंवा डिमांड ड्राफ्ट जमीन मालक तसेच हाऊसिंग सोसायटीचे मुख्य प्रवर्तक शिवराज डोके यांना प्रत्यक्ष द्यावे लागणार आहे. त्यावेळी व्यवहार होऊन एक गुंठा जमीनीचा ताबा मिळणार आहे. ले आऊट प्लॅन तयार करण्यात आला असून, बिगर शेतीसाठी लवकरच नियमाप्रमाणे प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. येथील सर्व रस्ते ९ मीटर रुंदीचे ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय ओपन स्पेस व अ‍ॅमिनीटीसाठी देखील जागा सोडण्यात आलेली आहे. घरकुल वंचितांचे घराचे स्वप्न साकार होण्यासाठी संघटना प्रयत्नशील असून, ३० नोव्हेंबर पर्यंत व्यवहार करण्याचे त्यांनी सांगितले आहे. अशोक सब्बन यांनी 80 हजार रुपयात जागा घेऊन पंतप्रधान आवास योजने अंतर्गत अनुदान मिळाल्यास घरे देखील सहज बांधता येणार आहे. शिवाय एमआयडीसी जवळ असल्याने रोजगार देखील मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments