बहुजन क्रांती मोर्च्याचा जनआक्रोश

 बहुजन क्रांती मोर्च्याचा  जनआक्रोश 

भाजप सरकार हे लोकशाही व संविधान विरोधी असल्याचा आरोप


वेब टीम नगर - देशभरात मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजावर ,महिलांवर होत असलेले सामूहिक अत्याचार, बलात्कार, हत्या, मॉबलिंचींग व इतर घटनांचे वाढत्या प्रमाणाला विरोध व निषेध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सत्ताधारी भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, शहराध्यक्ष गणेश चव्हाण, बहुजन मुक्ती पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भोसले, राजाभाऊ दिवेकर, संजय सावंत, नामदेव राळेभात, संजय संसारे, इमरान जहागीरदार, संजय कांबळे, मनोहर वाघ, राधेलाल नकवाल, जालिंदर निकम, गणेश चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला सहभागी झाले होते.

या आंदोलनास बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा, बुध्दिष्ट इंटर नेटवर्क, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, वाल्मिक संघटना, आदिवासी एकता परिषद, लहुजी क्रांती मोर्चा, भारतीय बौध्द महासभा आदी इतर संघटनांनी पाठिंबा दिला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे नियोजन केले होते. मात्र पोलीसांनी परवानगी नाकारुन हस्तक्षेप केल्याने जुने बस स्थानक येथेच निदर्शन करुन आंदोलनाचा समारोप करण्यात आला. तर पाच व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

 उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर सामूहिक अत्याचार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर सरकारी अधिकार्‍यांनी उच्चवर्णीय समाजातील गुन्हेगारांना वाचविण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मोदी व योगी सरकारच्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून, जातिभेद वर्णद्वेषातून संपूर्ण देशात सामूहिक अत्याचार, हत्या, बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत.

 भाजप सरकार हे लोकशाही व संविधान विरोधी असून, सातत्याने शेतकरी, कामगार, नोकरदार, विद्यार्थी, जनतेच्या संवैधानिक मुलभूत अधिकारांच्या विरोधात नवनवीन कायदे पारीत करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तर यामुळे देशात बेरोजगारी, गरीबी, आर्थिक विषमता आणि असुरक्षितता निर्माण झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच देशात मोदी सरकार विरोधात लाट असताना ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून भाजपने लोकशाही पायदळी तुडवून जनतेशी धोकेबाजी केली असल्याचे आंदोलकांनी म्हंटले आहे.
Post a Comment

0 Comments