भ्रमंती माझ्या जिल्ह्याची

 भ्रमंती माझ्या जिल्ह्याची 

शासनाने पर्यटन व्यवसायाला अजूनही पूर्ण परवानगी दिलेली  नाही.मात्र ५ किंवा त्यापेक्षा कमी व्यक्तींना प्रवास करण्याची परवानगी  दिली असल्याने जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रांना भेटी देऊन कोरोनाच्या काळात घरात बसून आलेला शिण घालवता येईल. कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झालेला असला तरी धोका मात्र  कायम आहे. मात्र पुरेपूर काळजी घेऊन प्रवास केल्यास आपण सुरक्षित राहू शकू , शिवाय पर्यटन स्थळांना भेटी देऊन त्या ठिकाणच्या अर्थकारणालाही गती देता येऊ शकेल. म्हणूनच छोटेखानी पर्यटन  मनाला चैतन्य देऊन कोरोनाच्या प्रभावातून बाहेर पडण्यास मदत शकेल.चला तर मग छोटेखानी पर्यटन करूया. 

 निघोज कुंड (रांजणखळगे)

अहमदनगरला निसर्गाने खूप भरभरून दिलंय ह्याचच एक उदाहरण निघोज चे रांजणखळगे अहमदनगरहून पुण्याकडे जाताना शिरूरच्या अलिकडेच उजवीकडे एक फ़ाटा जातो.अंदाजे ५-६  कि.मि.आत गेल्यावर निघोज गाव लागते.या गावात "श्री मळगंगा माउली"चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे.रांजणखळगी गावापासून ३ कि.मी अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात आहे.

तिथे पोहोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेत/कॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं आणि निसर्गाच्या चमत्काराचा क्षणोक्षणी प्रत्यय येतो. 

सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजणखळगी  कोरली  गेले आहेत.

नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार झाली आहेत. काही रांजणखळगी खूप खोल आणि बरेच लांब होते. भूगर्भशास्त्रज्ञाच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रीयेमुळे नदीच्या पात्रात हे रांजण खळगे तयार झाले आहेत.

या खळग्यातून लांबून जोरात वहात आलेले पाणी तिथल्या तिथेच एखाद्या छोट्या धबधब्याप्रमाणे कोसळत होते. काही खळग्यांच्या धारदार काठांवरून पाण्याचे तुषार उडताना दिसतात.पाणी एका रांजण खळग्यातून दुसऱ्यात लपंडाव खेळत उड्या मारत पुढे जाताना बघून आपण जणू संमोहितच होतो.

या रांजणखळग्यातून वहात पुढे ही कुकडी नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र दऱ्यांमधून  वहात जाते.

या रांजणखळग्यांच्या वरच्या भागात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. एकंदरीतच सगळीकडे पाणी आणि हिरवाई बघून डोळ्यांचं पारणे फिटतात.

या रांजण खळग्यांना ओलांडून गेलं की तिथे मळगंगा मातेचं मंदिर आणि भक्त निवास आहे. एक मोठा सभामंडप आहे. रांजण खळग्यांचा हा प्रवाह ओलांडण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटनस्थळ म्हणून या जागेचे सौंदर्य वाढले आहे.या रांजण खळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. या कुंडातील पाणी दुष्काळातही आटत नाही असे म्हणले जाते.  

दरवर्षी भरणाऱ्या मळगंगेच्या यात्रेच्या वेळी याच कुंडातून मळगंगेची घागर निघते अशी आख्यायिका सांगितली जाते. 

नगर - पारनेर च्या मार्गे निघोजला गेल्यास ते अंतर ६२ कि.मी असून नगर -पुणे महामार्गावरून गेलास ७२ कि.मी इतके अंतर पडते . दुचाक्यांवरूनही हा प्रवास करण्यासारखा आहे. 

विशेष सुचना - पर्यटनाला पूर्ण परवानगी नसल्याने हे छोटेखानी पर्यटन असल्याने सामाजिक अंतरपथ्याचे नियम तसेच अपघात  नाहीत याची काळजी घ्यावी. सुरक्षितता बाळगावी.

Post a Comment

0 Comments