"नगर टुडे" परिवाराच्या
वतीने सर्वांना
"विजयादशमीच्या" हार्दिक शुभेच्छा
जगाचे लक्ष वेधणारी म्हैसूरची दसरा मिरवणूक
वेब टीम म्हैसूर :आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे
चामुंडेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे म्हैसूरच्या संस्थानी दस-याचे विशेष आकर्षण आहे. देश- विदेशातील पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात.संगीत, नृत्य, वाद्यवादन, हत्ती, घोडे, उंट यांची मिरवणूक हे या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे.मैसूरच्या राजवाड्यात नवरात्रोत्सवा निमित्त देवीचे पूजन तर केले जातेच. शिवाय राजवाड्यात असलेल्या सोन्याच्या सिंहासनाची विधिवत पूजन करून त्यावर मैसूरनरेश यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार सिंहासनावर आरूढ होतात, यावेळी त्यांचे सर्व दरबारी पारंपरिक वेशात उपस्थित असतात. हा सोहोळाही पाहण्यासारखा असतो. मैसुरनरेश सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी त्रिशिका कुमारी आणि राजमाता प्रमोदादेवी वाडियार या त्यांना ओवाळतात.
दसऱ्याच्या निमित्ताने मैसूरला निघणाऱ्या मिरवणुकीत हत्ती,घोडे,उंट या व्यतिरिक्त राज्यातील लोककला सादर करणारी आदिवासींची पथके विविध गुणदर्शन करणाऱ्या पथकांचाही समावेश असतो. या परंपरेचे हे ४०७ वे वर्ष असून यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मिरवणुकीवर निर्बंध आले आहेत.यंदा फक्त देवी चामुंडेश्वरीच्या अंबारीची मिरवणूक राजवाड्याच्या प्रांगणात निघणार असून त्यासाठी फक्त पन्नास व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. म्हणून गतवर्षीच्या मिरवणुकीची काही छाया चित्रे आमच्या वाचकांसाठी देत आहोत.
0 Comments