शरद पवारांच्या उपस्थितीत खडसे राष्ट्रवादीत

शरद पवारांच्या उपस्थितीत खडसे राष्ट्रवादीत 

वेब टीम मुंबई : मागील ४० वर्षांपासून भाजपात कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज राजकीय सीमोल्लंघन केलं. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांनी राष्ट्रवादीत पाऊल ठेवलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशासाठी एकनाथ खडसे गुरुवारीच हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थकही पक्षात प्रवेश  केला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. 

दानवे यांची प्रतिक्रिया 

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यामुळेच आपण पक्षत्याग करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. याचसोबत त्यांनी एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा गंभीर आरोपही केला होता. यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, “भाजपामध्ये सामूहिक पद्धतीने निर्णय घेतले जात असून कोणतीही एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. एकट्या देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष चालत नाही. मी प्रदेशाध्यक्ष असताना काही गोष्टी फडणवीसांना मान्य नव्हत्या, पण मी पटवून दिल्यावर त्यांनाही मान्य कराव्या लागल्या. त्यामुळे एकटे फडणवीस पक्ष चालवतात हा आरोप चुकीचा आहे”.

Post a Comment

0 Comments