कोरोना उपचारासाठी अधिक बिल घेणार्‍या हॉस्पिटलकडून पैश्याची परतफेड मिळावी

 



-----

कोरोना उपचारासाठी अधिक बिल घेणार्‍या 
हॉस्पिटलकडून पैश्याची परतफेड मिळावी

मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

रक्कम वसुल करण्याची कार्यवाही करण्याची मागणी


वेब टीम नगर - शहरातील खाजगी हॉस्पिटलनी कोरोना वैद्यकिय उपचारासाठी रुग्णाकडून शासकीय दरापेक्षा जास्त बिल आकारले असताना सदर हॉस्पिटलला नोटीस बजावून अधिक रकमेची परतफेड तातडीने करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भुतारे, गणेश शिंदे, अमोल बोरुडे उपस्थित होते.  

कोरोनाच्या संकटकाळात शहरातील खाजगी हॉस्पिटलनी कोरोना बाधित रुग्णाकडून वैद्यकिय उपचारासाठी शासकीय दरापेक्षा अधिक दराने बिल आकारले असल्याचे तपासणी अहवालात उघड झाले आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी यांनी महापालिकेला अधिक बिल आकारणार्‍या हॉस्पिटलवर कारवाई करुन पैश्याची अधिक रक्कम रुग्णाला परतफेड करण्याचे आदेश दिले असून, मनपा प्रशासन याबाबत टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकाकडून हॉस्पिटलने अवास्तव बिले आकारुन लाखो रुपयाची वसूली केली आहे. 

महाराष्ट्र शासनाने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा हे बील अधिक लावण्यात आले होते. सर्वसामान्यांची लूट करणार्‍या हॉस्पिटलवर कारवाई करण्यासंदर्भात व अधिक बिलाची रक्कम रुग्णाला परत मिळण्यासाठी मनसेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे. लाखो रुपयांची वसुली करुन अधिक रक्कम रुग्णांना मिळाल्यास या संकटकाळात त्यांना मोठा आधार मिळणार असल्याचे नितीन भूतारे यांनी म्हंटले आहे. महापालिकेने तातडीने यासंबंधी सदर हॉस्पिटलला नोटीस बजावून अधिक बिल भरणार्‍या रुग्णांच्या पैश्याची परतफेड करण्याची मागणी मनसेने केली आहे. मनपा आयुक्त मायकलवार यांनी दोन दिवसात सदर हॉस्पिटलला नोटीस काढून कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

Post a Comment

0 Comments