।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।।

।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।। 

"स्वच्छता असे जेथे, लक्ष्मी वसे तेथे" 

 स्वच्छतेचा वसा सर्वांपर्यंत पोहोचविणारी संवादिनी : स्वच्छतादूत शारदा होशिंग.

"स्वच्छता हीच आरोग्य संपदा"  असा शारदा ताईंच्या आईचा दंडकच होता. त्यांच्या आईचे घराबरोबरच परिसरातील स्वच्छतेवरदेखील लक्ष असायचे. परिसरात जर कोणी अस्वच्छता केली तर आईचे त्या व्यक्तीला शब्द प्रबोधन असायचे, त्यामुळे स्वच्छतेचे महत्व लहानपणीच कळाल्याचे जिल्हा स्वच्छतादूत शारदा होशिंग सांगतात. 

विज्ञान विषयात पदवी घेतलेल्या शारदा होशिंग अहमदनगरच्या सांगळे गल्लीतील श्री समर्थ विद्या मंदिर येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.विज्ञान आणि पर्यावरण हे विषय त्यांच्या अध्यापनाचे आहेत. त्यामुळे पर्यावरणीय शास्त्रीय रचना त्यांनी जवळून अभ्यासली आहे. पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत.यामध्ये शालेय विद्यार्थ्यांमधे जनजागृती करण्याबरोबरच,  निबंध ,वक्तृत्व, चित्रकला, यांसारख्या स्पर्धांमध्ये जाणीवपूर्वक पर्यावरणाशी निगडित असलेले विषय त्या देतात.

कित्येक वर्ष त्या 'एक विद्यार्थी- एक झाड' हा प्रकल्प राबवत आहेत.पर्यावरणावर आधारित अनेक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. वृक्षारोपण करणे, वृक्षारोपण करण्यासाठी प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांना व समाजाला वृक्ष लागवडीचे फायदे समजावून सांगणे, असे कार्यक्रम त्या आवर्जून घेत असतात. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य याच्या त्या सध्या राज्यस्तरावर सचिव म्हणून कार्यरत आहेत. या मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे तसेच वृक्ष संवर्धनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले आहेत.सामाजिक वनीकरण विभागाच्या अनेक कार्यक्रमात त्या सहभागी होत असतात.  तसेच तो कार्यक्रम सर्वांपर्यंत कसा पोहोचेल, याकडेही त्या जाणीवपूर्वक लक्ष देतात. 

शारदा होशिंग यांना सूत्रसंचालनाचीआवड आहे. प्रत्येकवेळी सूत्रसंचालन करताना नवीन मुद्दे अंतर्भूत करायचे ,त्यामुळे अनेक पुस्तकांचे वाचन झाले आणि वाचन साधना अविरत चालू आहे, असे त्या सांगतात.  कुटुंब सांभाळून आपली आवड जोपासताना महिलांना तारेवरची कसरत करावीच लागते, शारदा होशिंग यांनासुद्धा चुकली नाहीच परंतु या सर्व प्रवासात आई कै. सुमन, वडील कै. महादेव पुणतांबेकर सासुबाई कै. सुशीला यांचे, तसेच पती श्री. अनंत व मुलं अवंती आणि आश्विन यांचे नेहमीच सहकार्य मिळते असे त्या आनंदाने सांगतात.

रसिक ग्रुपच्या कार्यक्रमात तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट झाली. त्यांच्याशी पर्यावरणपूरक कामाविषयी चर्चा झाली आणि हीच चर्चा पर्यावरणपूरक कामांसाठी टर्निंग पॉईंट ठरली. भारत सरकारच्या स्वच्छता उपक्रमास शारदा होशिंग जोडल्या गेल्या. शारदा होशिंग यांची सामाजिक कामाची आवड पाहून त्यांना जिल्हा स्वच्छता दूत म्हणून निवडण्यात आले. आणि त्यांनी स्वच्छता दूत या पदाला पुरेपूर न्याय दिला. अस्वच्छता विरोधातील लढाई प्रत्यक्ष एक आव्हान आहे हे शारदा होशिंग यांनी जाणले आणि विचारपूर्वक कामाची मांडणी व आखणी केली. अस्वच्छता दूर करण्यासाठी संवाद प्रबोधन, प्रत्यक्ष कृती, समूह सहभाग नियोजन, नियोजनाची अंमलबजावणी , त्यातील सातत्य आणि कामाचा पाठपुरावा , असं नियोजन त्यांनी केलं. तत्कालीन माननीय जिल्हाधिकारी अनिल  कवडे, तत्कालीन  महापौर सुरेखाताई कदम,  आयुक्त मंगळे यांच्यासह विविध शाळा, संस्था, कॉलेज, महिलावर्ग, बचत गट, सार्वजनिक कार्यालय, शुभ कार्य, काही आयोजित केलेले कार्यक्रम अशा ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी स्वच्छतेवर शारदा होशिंग  यांनी संवाद साधला. आजही यात कुठेही खंड पडलेला नाही, आजही या विषयावर त्या तितक्याच संवेदनशील आहेत. कचऱ्याच्या वर्गीकरणापासून ते प्लास्टिकच्या कचऱ्याच्या पुनर्वापरावर शारदाताई खुबीनं समोरच्याच्या मनात संवादातून मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन करतात.  पर्यावरणपूरक उपक्रम व स्वच्छता दूत म्हणून काम करताना पर्यावरण वाचविण्याचा व स्वच्छतेचा संदेश अधिक समर्पक पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी लेखन सुरू केले. पथनाट्यलेखन, एकांकिका, घोषवाक्य लेखन, आदींच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले. आजपर्यंत स्वच्छतेवर आधारित पथनाट्याचे शंभर प्रयोग त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत, त्याबद्दल विविध स्तरातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पथनाट्य करताना प्रत्यक्ष कृतीदेखील त्या करतात. तत्कालीन पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे ते जिल्हाधिकारी अभय महाजन आदींनी प्रबोधनासाठी केलेल्या पथनाट्याचे विशेष कौतुक केले आहे.

शारदाताई या विज्ञान विषयाच्या शिक्षिका असल्याने विज्ञान विषयक नाटकांचे , एकांकिकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यातूनही जीवनासाठी आवश्यक असणारे संदेश समाजापर्यंत पोहोचवले आहेत. त्यांच्या एकांकिकांचे सादरीकरण जिल्हा , विभाग , व राज्य स्तरापर्यंत झाले आहे. समाजासाठी उपयुक्त असणारे विज्ञान उपकरणे बनवण्यासाठी त्यांचे विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन आणि मार्गदर्शन असते. त्यांच्या विद्यार्थ्यांची उपकरणे आत्तापर्यंत अनेक वेळा राष्ट्रीय स्तरापर्यंत गेली आहेत,  याचा त्यांना विशेष अभिमान वाटतो. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे त्यामुळे अभ्यासाबरोबरच त्यांचे आचरण, व्यवहारी दृष्टिकोन , नैतिक मूल्य हे ही तितकेच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आपल्या विषयामधून त्या नेहमीच याविषयी जागृती करत असतात. आतापर्यंत त्यांनी बारा विज्ञान नाटिका लिहिल्या आहेत. पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता या विषयांवर व्याख्यानांद्वारे आजपर्यंत जवळ-जवळ वीस हजार विद्यार्थी आणि सात हजार महिलांशी त्यांनी संवाद साधला आहे व स्वच्छतेसाठीच्या बदलाची ज्योत त्यांच्या मनात पेटवली आहे.


स्वच्छतेचा संदेश पोचवण्यासाठी 10,000 कापडी पिशव्या स्वच्छता संदेशासहित वितरीत केल्या आहेत. समाजाला नैतिक मूल्यांचे महत्त्व पटावे यासाठी त्या सतत कार्यरत असतात. त्या उत्तम समुपदेशक आहेत, त्याचबरोबर विविध संस्थांशी निगडीत आहेत. यामध्ये हरियली , पोलिस मित्र संघटना, शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, तसेच विज्ञान अध्यापक संघात त्या सक्रिय कार्यरत आहेत. तसेच समर्थ सत्संग परिवाराच्या त्या सचिव आहेत. समर्थांच्या कृपेने आणि मंदारबुवांच्या मार्गदर्शनाने समर्थ वांग्मयाचा त्या अभ्यास करीत आहेत. मनाचे श्लोक यावर त्यांचे आत्तापर्यंत 116 लेख प्रसिद्ध झाले आहेत. विविध अंकांमधून त्या विविध विषयांवर लेखन करीत असतात. लायनेस क्लब ऑफ अहमदनगर मिड टाउन च्या त्या सचिव आहेत व अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ मानव सेवा प्रकल्पाच्या त्या विश्वस्त आहेत. एकंदरीतच समाजामध्ये सामाजिक, नैतिक, आरोग्य, स्वच्छता याबाबत ज्ञानदानाचे एक अभूतपूर्व कार्य करणारी ऊर्जा म्हणजे "शारदा होशिंग" . त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अहमदनगरमधील तसेच जिल्हा व राज्यातील अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले आहे.एक उपक्रमशील शिक्षिका व समाजप्रबोधनकार म्हणून नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे आदराने  पाहिले जाते.

या सर्व कार्यामध्ये प्रसार माध्यमांचे मोठे योगदान आहे, हे त्या आवर्जून सांगतात. तसेच शाळेचे संस्थाचालक यांचेही सहकार्य लाभते , असे त्या सांगतात.

आदिशक्ती, आदिमाया विश्वामध्ये विविध रुपात कार्यरत असते , तसेच मानवी देहात देखील कार्यरत असते , असे या शांतपणे , प्रसन्न मुद्रेने स्थिर विचाराने , चैतन्यवृत्तीने समाजहितासाठी निस्वार्थ व सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या शारदा ताईंकडे पाहिले की खरे वाटते.अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या शारदाताईंचा परिचय या सदरातून वाचकांना देता आला यातच "नगर टुडे परिवार" धन्यता मानतो.  

शारदाताई तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! 


Post a Comment

0 Comments