उत्तर प्रदेशमध्ये रामजानकी मंदिराच्या पुजाऱ्याची हत्या

 उत्तर प्रदेशमध्ये रामजानकी  मंदिराच्या पुजाऱ्याची हत्या 


जमिनीच्या वादातून घडली  घटना  

वेब टीम लखनौ :अगोदरच जंगलराज म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री योगींच्या उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक मोठी गुन्हेगारी घटना घडली आहे.  गोंडा येथे एका मंदिराच्या पुजाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे आता स्थानिक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत आता सर्वांच्याच मनात प्रश्न निर्माण झाला आहे.

 शनिवारी मध्यरात्री या पुजाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून पुजाऱ्याची हत्या झाली असल्याची माहिती समोर येत आहे. अतुलबाबा उर्फ सम्राट दास हे येथील राम-जानकी मंदिरात पुजारी होते. मागील दोन वर्षांपासून ते या ठिकाणी राहत होते. हे मंदिर गोंडा येथील इटियाथोक पोलीस ठाणे अंतर्गत तिर्ते मनोरमा येते आहे. रात्री साधारण २ वाजेच्या सुमारास अतुलबाबा यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात हे समोर आले आहे की, चार हल्लेखोरांनी पुजाऱ्याची हत्या केली आहे. या सर्वांविरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, आतापर्यंत एकही आरोपी पकडला गेलेला नाही. भू माफियांद्वारे ही हत्या घडवण्यात आली असल्याचाही पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.  पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.


Post a Comment

0 Comments