काँग्रेसची विचारधारा कधीही न संपणारी

 काँग्रेसची विचारधारा कधीही न संपणारी 


डॉ.सईद काझी : इंदिराजींच्या पडत्या काळात साथ देणार्या काँग्रेसजणांचा सत्कार संपन्न

वेब टीम नगर - काँग्रेसची विचारधारा ही कधीही न संपणारी आहे. सध्याच्या काळात या विचारधारेच्या दिव्याला काजळी आली असून, ती काजळी काढून पुन्हा दीपप्रज्वलीत करण्याची गरज आहे. काँग्रेस पक्षाने देशाला समतेचा आणि एकात्मतेचा विचार दिला. मात्र काही पक्षांनी देशात विद्वेषाचे राजकारण पेटवलं. मात्र, काँग्रेसची विचारधारा भविष्यात आजच्यापेक्षा जास्त जोमाने उभी राहील, असे विचार धन्वंतरी मेडिकल कॉलेज शैक्षणिक फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.सईद काझी यांनी व्यक्त केले. 

पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिराजींच्या पुण्यतिथी निमित्त इंदिराजींच्या पडत्या काळात पक्षाचे काम करणार्या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष विजयसिंह परदेशी होते.

यावेळी पुढे बोलतांना डॉ.काझी म्हणाले, इंदिराजींच्या नंतरच्या काळात काँग्रेस पक्षाची शिस्त काहीशी रयाला गेली त्यातून अंतर्गत कुरघुडीचे राजकारण सुरु झालं, त्यामुळे ब्रिजलाल सारडा कुटूंबियासारखी माणसं विचारांनी नव्हे तर शरीराने इतर पक्षात आहे. मात्र, विचाराने ही काँग्रेसची मंडळी आहे. आज इंदिराजींसारखे सक्षम नेतृत्व आपल्याकडे नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

एस.एम.आय.असीर, प्रा.श्रीकांत बेडेकर यांच्यासारख्या सर्वसामन्य लोकांकडे काँग्रेस पक्षाची धुरा होती. मात्र ही सर्वमंडळी देशप्रेमाने भारलेली होती, नंतर पक्ष आणि इंदिराजी असाच त्यांचा प्राधान्यक्रम लावावा लागेल. १९७२ साली पोखरणमध्ये अणुचाचणी घडवून भारत ही जगातील मोठी शक्ती आहे, हे त्यांनी दाखवून दिल्याने देशाने इंदिरांजींचं नेतृत्वही मान्य  केले, असे विचार हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी यावेळी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात श्री.परदेशी यांनी ‘दुर्दैवाने आज देशामध्ये नेहरु मोठे की सरदार वल्लभभाई मोठे’ अशी स्पर्धा सुरु ठेवण्यात विरोधक यशस्वी झाले आहेत. वास्तविक पाहता ब्रिटीशांनी एक संघ भारताच्या ठिकर्या उडविण्याच्या राजकारणाला सरदार वल्लभभाई पटेलांच्या खंबीरपणामुळे साडेतीनशे संस्थान एकसंघ भारतामध्ये विलिन झाली. सरदार वल्लभभाई पटेलांची गांधीजींच्या अहिंसा तत्वावरची अढळ श्रद्धा आणि नेहरु बद्दल कमालिचा आदर होता, या नेत्यांनी कधी सत्ता स्पर्धा केली नाही. गुजरातमध्ये त्यांनी उभारलेली विद्यापीठ, अमूल दूध अशी कित्येक स्मारक पटेलांनी उभी केली. दुर्दैवाने आज नेत्यांच्या महत्तेबद्दल लोकांच्या मनात द्विधा निर्माण करण्याचं काम विरोधक करत आहेत.

ते पुढे म्हणाले, काँग्रेसचा जन्म बंडखोरीतून झाला आहे. हुतामा व्हावं लागलं तरी चालेल पण त्यासाठी मागे न जाता पुढे जाणारे जे नेते होते, त्यात इंदिराजीही आहेत. तेल्या-तांबोळ्यांचे नेते लोकमान्य टिळक यांची सभा इमारत कंपनीमध्ये  झाली, त्यामध्येच त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असे ब्रिटीशांना ठणकावून सांगितले. ज्या राष्ट्रीय सभेचे काँग्रेसमध्ये रुपांतर झाल्यानंतर टिळकांनी, दादाभाई नौरोजींना तेथे नेतृत्व केले. 

इंदिराजींच्या पडत्या काळात इंदिरांजींच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून पक्षकार्य आणि सर्वसामान्यांची एकजूट करणारे सर्वश्री डॉ.सईद काझी, श्री.परदेशी, श्री.सारडा, अशोक जाधव, ॲड.साहेबराव चौधरी, सुभाष त्रिमुखे, जरिना पठाण, मच्छिंद्र शिंदे, विठ्ठलराव भोरे, पं.स.माजी सभापती सूर्यभान पोटे, बाबासाहेब सुडके महाराज आदिंचा सत्कार करण्यात आला. इंदिराजींची प्रतिमा सत्कारमूर्तींना देण्यात आली. डोळ्यांची शस्त्रक्रियेमुळे प्रा.श्रीकांत बेडेकर, प्रकृती अस्वास्थामुळे डी.एम.कांबळे, प्रा.अजीज अंबेकर, प्रा.देवदत्त रानडे आदिं यावेळी उपस्थित राहू शकले नाही, त्यांचा कार्यक्रमानंतर त्यांच्या निवासस्थानी जावून सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, ॲड.चौधरी आदिंनी या उपक्रमाचे कौतुक करुन सत्कारमुर्तीचे अभिनंदन केले. कवी विवेक येवले यांनी आपल्या कवितेतून सत्कारमूर्तींचा गौरव केला. स्वागत पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान यांनी तर प्रास्तविक शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले. शेवटी आभार भिंगार अध्यक्ष ॲड.आर.आर.पिल्ले यांनी मानले.

जि.प.माजी सदस्य डॉ.टी.के.पुरनाळे तसेच विनायक देशमुख यांच्या मातोश्री सुलोचनाबाई यांना प्रारंभी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  पदाधिकारी सर्वश्री रवी सूर्यवंशी, शामराव वाघस्कर, अज्जूभाई शेख, शशिकांत पवार, अभिजित कांबळे, सुभाष रणदिवे, श्रीमती शारदा वाघमारे, मुकुंद लखापती, माजी पोलिस निरिक्षक एम.आय.शेख, राजेश बाठिया, अनिल परदेशी, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, रजनी ताठे, सौ.किरण आळकुटे, ॲड.नरेंद्र भिंगारदिवे, मिना घाडगे, इंटकचे हनीफ शेख, फजल शेख, विठ्ठल शिंदे, आर.आर.पाटील, सौ.शिल्पा दुसुंगे, ॲड.सलिम रंगरेज, संतोष कांबळे आदिंनी परिश्रम घेतले



Post a Comment

0 Comments