गांधी जयंती दिनी काँग्रेस जिल्हाभर धरणे , निदर्शने करणार

 गांधी जयंती दिनी काँग्रेस जिल्हाभर धरणे , निदर्शने करणार

शेतकरी, कामगार बचाव दिवस साजरा करण्यांचा निर्धार 


वेब टीम नगर : मोदी सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेल्या कायद्यांना विरोध करण्यासाठी, तसेच हे कायदे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी उद्या गांधी जयंती दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर धरणे व निदर्शने करण्यात येणार आहेत. जिल्हा मुख्यालय तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही निदर्शने, धरणे होणार आहेत.

अहमदनगर जिल्हा काँग्रेस आणि शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने जिल्ह्याच्या मुख्यालयी नगर मार्केट कमिटीच्या आवारामध्ये गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी ठीक ११.३० वाजता धरणे व निदर्शने करीत काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी व कामगार बचाव दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. 

काँग्रेस पक्षाच्या वतीने सबंध भारतामध्ये याबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून या या धरणे आंदोलनांचे नियोजन देशभरात करण्यात आले आहे. 

महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील याबाबत आक्रमक भूमिका घेत आंदोलनांचे आयोजन करण्यात आले आहे. 

गांधी जयंती असल्यामुळे वाडिया पार्क येथील गांधीजींच्या पुतळ्याला हार घालून यावेळी अभिवादन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती मध्ये धरणे आंदोलने  पार पडणार आहेत. 

राहता, कोपरगाव, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, नगर शहर, नगर तालुका, श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा, पाथर्डी, कर्जत, जामखेड, राहुरी,पारनेर आदी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी हे आंदोलन पार पडणार आहे. प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुन तसेच मास्क वापरून ही आंदोलने करण्यात येणार असून यावेळी सर्वतोपरी खबरदारी बाळगण्यात येणार असल्याचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी म्हटले आहे. 


आंदोलनासाठी विशेष निरीक्षकांची नियुक्ती 



काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या आंदोलनासाठी प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. नगर शहरासाठी धुळ्याचे डॉ. अनिल भामरे तर ग्रामीणसाठी नाशिकचे ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वरती या आंदोलनाच्या साठीची विशेष जबाबदारी निरीक्षक म्हणून सोपवण्यात आली आहे. दोन्ही निरीक्षकांची आंदोलनासाठी जिल्ह्यात प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

Post a Comment

0 Comments