किल्लारीचा भूकंप अजूनही अंगावर शहारे आणणारा .......


किल्लारीचा भूकंप अजूनही अंगावर शहारे आणणारा ....... 


वेब टीम नगर : 
आज ३० सप्टेंबर  किल्लारीच्या  भूकंपाला आज ३० वर्ष पूर्ण होत आहेत.  अंगावर अजूनही शहारे उभे राहतात त्या ३० वर्षांपूर्वीच्या  आठवणींनी 

 पहाटे तीनची वेळ औसा, किल्लारी ही सारी गाव साखर झोपेत पहुडलेले असतानाच जवळपास ६ ते ७ रिस्टर स्केलचा भूकंप झाला आणि आक्खीच्या अक्खी  गावं  कायमस्वरूपी निद्रेच्या आधीन झाले. खरंतर हे सगळं एक प्रकर्षाने आठवण्याचं कारण म्हणजे मी अनंतचतुर्दशीच्या मिरवणुक रात्री एक वाजता संपवून नुकताच घरी आलो होतो. झोपण्याच्या तयारीत असताना तीनच्या दरम्यान हादरे बसायला सुरुवात झाली. घरातील मांडणीतील ठेवलेले डब्बे भांडे पडू लागले आणि एका विचित्र पद्धतीचे कंपन होत होते नगरसारख्या शहरातही लोक पटापट जागी झाली.  मोकळ्या जागेत येऊन उभी राहू लागली.सगळीकडे एकच हाहाकार माजला भूकंप झाला ........ भूकंप झाला ........  कशीबशी रात्र जागून काढली आणि सकाळी बातम्यांसाठी रेडिओ लावल्यावर मात्र लातूर जवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला जसजसा सूर्य डोक्यावर येऊ लागला तसतसा चित्र अधिक स्पष्ट होत गेलं.  दुपारपर्यंत किल्लारी,औसा या गावांची नावं  ज्याच्या त्याच्या तोंडी ऐकायला येऊ लागले. 


 इतक्यात घरचा फोन खणाणला .....  हॅलो,  मी महादेव कुलकर्णी बोलतोय, किल्लारीला जायचेय येणार का असा प्रश्न आला आणि तत्काळ किल्लारीला जायला निघालो शहरातल्या बन्सीमहाराज मिठाई वाले यांनी एक जीप काढली आणि त्यात ६-७ पोती फारसाण आणि  तीन-चार दिवस टिकेल असे अन्नपदार्थ घेऊन आमची गाडी किल्लारी कडे रवाना झाली.  


दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच किल्लारीला पोहोचलो बरोबर  नेलेले टिकाऊ अन्नपदार्थ इतर साहित्य मदत प्रशासनाच्या हवाली केल्या नंतर आम्ही गावची पाहणी करण्यासाठी बाहेर पडलो जिकडे पाहावे तिकडे प्रेतांचे ढीग नजरेस पडत होते.  बघतो तर काय गावच्या गाव उध्वस्त झालेली जिकडेतिकडे माती आणि त्याखाली दबलेली माणसं असं  चित्र पाहायला मिळालं. गावांची  इतकी  मनुष्य हानी झाली होतीकी , अक्षरशः  रडायला माणूस शिल्लक नव्हता.आम्ही किल्लारी ला पोहोचल्यानंतर प्रशासनाने त्या गावाकडे जाणारे सगळे रस्ते सील करून टाकले त्यामुळे गावात सैनिकी पोशाखातील माणसं, संघाचे स्वयंसेवक आणि आम्ही माध्यमांची माणसं एवढीच काय ती गर्दी  .......  

मातीचे ढिगारे उपसायला  सुरुवात झाली प्रत्येक ढिगाखाली माणसं, बाया , कच्ची -बच्ची पोरं दबलेली. ढीगच्या खालून सापडलेल्यांच्या प्रेतांची रास लावण्यात येत होती . एकीकडे मातीचा ढिगारा तर दुसऱ्या बाजूला प्रेतांचा ढिगारा असं चित्र दिसायला लागलं. 

 सैनिकी पोशाखातील जवानांनी अखेर या प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला, तर प्रेत जाळायला लाकडं कमी पडू लागली लातूर आणि आजूबाजूच्या गावातून अक्षरशः ट्रकमधून लाकडे आणली जाऊ लागली एका एका सरणावर दहा-दहा प्रेतं जळू लागली एकाच कुटुंबातील की वेगवेगळ्या कुटुंबातील याचा मात्र काही थांगपत्ता लागत नव्हता. बैलगाडीतून प्रेत आणली जात होती आणि सरण रचून जाळली जात होती असं  विदारक चित्र आजूबाजूला पाहायला मिळायचं, अक्ख गावच चित्र दिसत होतं.  हे कमी होतं म्हणून की काय पुन्हा वादळ सह  वारा आणि पाऊस सुरू झाला. तो संततधार पाऊस इतका जोरदार होता की आम्ही नगरला पोहोचलो तरी कपडे मात्र ओलेचिंबच होते.तीस वर्षापूर्वीचा ३० सप्टेंबर आठवला  तरी आजही अंगावर शहारे उभे राहतात आणि कटू आठवणी पुन्हा जाग्या होतात.

Post a Comment

0 Comments