प्रशासनाचा किराणा विक्रेत्यांना सक्त इशारा

प्रशासनाचा किराणा विक्रेत्यांना सक्त इशारा 

चढ्या भावाने किराणा वस्तूंची विक्री करणार्‍या रिटेलर आणि होलसेल व्यापार्‍यांवर कारवाई होणार

            वेब टीम नगर,दि.१७ - किराणा दुकानदार जीवनावश्‍यक किराणा वस्‍तूंची चढया भावाने विक्री करीत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. तसेच ग्राहकांना खरेदी मालाचे बिल देत नसल्‍याच्‍या  तक्रारी  प्राप्‍त झाल्‍या आहेत. व्‍यापारी संघटनेच्‍या वेळोवेळी घेतलेल्‍या बैठकीमध्‍ये सर्वच टप्‍यावरच्‍या व्‍यवहाराची पक्‍की बिले ठेवणे व ग्राहकाला बिल देण्‍याबाबतच्‍या सूचना यापूर्वीच दिल्या असतानाही अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुकानांची पथकामार्फत तपासणी करावी आणि सकृतदर्शनी तक्रारीत तथ्य आढलल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी सर्व तहसीलदार आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांना दिल्या आहेत.

            रिटेल, होलसेल दुकानदारांनी पक्‍की बिले ग्राहकांना दिली नाहीत अथवा ग्राहकांची अडवणूक केली असल्‍यास कारवाई करणे तसेच प्रत्‍येक वस्‍तूंचा दर फलक दुकानबाहेर लावण्‍याच्‍या सूचनाही देण्‍यात आल्‍या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन होत नसल्‍याचे निदर्शनास येत आहेत. तहसीलदार यांनी आपल्‍या कार्यक्षेत्रातील किराणा दुकानदाराची  पथकामार्फत तपासणी  करुन दोषी आढळयास संबंधीत दुकानदार यांच्‍यावर अत्‍यावश्‍यक वस्‍तू अधिनियम १९५५,आपत्‍ती व्‍यवस्‍थापन २००५ व साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ मधील उचित तरतूदीनुसार फौजदारी स्‍वरुपाची कारवाई करावी, अशा सूचवा त्यांनी दिल्या आहेत.

            दरम्यान, तसेच जिल्‍हयातील जे किराणा दुकानदार वस्‍तू व सेवा कर चुकविण्‍याकरिता ग्राहकांना पक्‍की बिले देत नाहीत तसेच दुकानदार यांनी ज्‍या होलसेल व्‍यापा-याकडून माल खरेदी केला आहे तेही कर चुकविण्‍याकरिता पक्‍की बिले देत नाहीत, असे प्रकार निदर्शनास येत असून यासंदर्भातील तक्रारी येत आहेत. असे  दुकानदार व सर्व होलसेल व्‍यापारी तसेच कायद्याचे अवहेलना करत असलेल्‍या जिल्‍हयातील सर्व दुकानदारांची  चौकशी करुन वस्‍तू व सेवाकर अधिनियमांतर्गत त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्‍हा पुरवठा अधिकारी श्रीमती माळी यांनी वस्तू व सेवाकर विभागाच्या उपायुक्तांना दिल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments