शेतकऱ्यावर सुलतानी आणि आसमानी संकट


शेतकऱ्यावर सुलतानी आणि  आसमानी संकट 

वेब टीम पुणे ,दि. २४-  वातावरण बदलामुळे पुढील ५ दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मुंबई आणि पुण्यातही पावसाचा अंदाज आहे .  अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा, तर काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच अनेक भागात वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ऐन पीक काढण्याच्या काळात होणारा हा बेमोसमी पाऊस पिकांचं मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे.

कोकणात पुढील ६ दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मुंबईत २७ आणि २८ मार्चला काही ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्रात चार-पाच दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल‌‌. सोमवारी आणि मंगळवारी काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल‌. शिवाय दोन दिवस गारपीटीचीही शक्यता आहे. विदर्भात २५ ते २८ मार्चच्या दरम्यान हलक्‍या पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण राहील. ३० मार्चपर्यंत हे ढगाळ वातावरण राहील. मंगळवारपासून काही ठिकाणी शहरात आणि जिल्ह्यात तुरळक पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. त्याच बरोबर वादळ वाराही असेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे हवामान विभाग प्रमुख डॉ अनूप कश्यपी यांनी याबाबत माहिती दिली.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात आणता येत नाही. त्यातच आता पुढील ५ दिवस हवामान विभागानं राज्यात सर्वत्र कमी-अधिक स्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होणार आहे. कोरोना व्हायरस पाठोपाठ शेतकऱ्यांवर अवेळी पावसाचंही संकट आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच शेतातील पिकाला बाजारपेठा बंद असल्याने विकता येईना. त्यात आता पावसानेही हजेरी लावल्यास शेतकऱ्याला एकाचवेळी आसमानी  आणि सुलतानी  संकटाला समोरं जावं लागणार आहे.

Post a Comment

0 Comments