वैद्यकीय यंत्रणा जवानां सारखी लढतेय

वैद्यकीय यंत्रणा जवानां सारखी लढतेय -उध्दव ठाकरे 

वेब टीम मुंबई,दि. १९ - वैद्यकीय  यंत्रणा जवानांप्रमाणे लढतेय, त्यांच्यावर ताण आणू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेला केलं. कोरोनासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या साठा देखील आहे. घाबरुन जाऊ नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जनतेला धीर दिला. कृपा करा, गर्दी कमी करा, अनावश्यक प्रवास टाळा आणि वर्क फ्रॉम होम करा, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला.
हे व्हायरस विरोधात युद्ध आहे. तुम्ही सहकार्य करावे ही माझी अपेक्षा आहे. तुम्ही घर सोडू नका, बाहेर जाऊ नका पण डॉक्टर्स, नर्सेस हे त्यांचं घर सोडून तुमच्यासाठी काम करत आहेत, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली. अनावश्यक प्रवास तरीही होत आहे. आपल्याकडे केसेस वाढत आहे. काळजी घ्यावी लागणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हा विषाणू हळूहळू पावलं पुढे टाकत आहे. आपण त्याला थोपवत आहोत. आपल्याकडचे रुग्ण बाहेरुन आलेले आहेत. अनावश्यक असेल तर घरातून अजिबात बाहेर पडू नका, बस, रेल्वेमधील गर्दी आणखी कमी करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
बाहेरच्या देशातून जे लोक येत आहेत ते आपलेच आहेत. सगळ्यांनी सुरक्षित राहावे. दिलेल्या सूचना पाळाव्यात. हातावर क्वारंटाईन  स्टॅम्प मारलेले लोक इथे-तिथे फिरत आहेत. आपली ट्रॅवल हिस्टरी लपवत आहेत, हे योग्य नसल्याचंही ते म्हणाले.
कोरोना हे एक युद्ध आहे. आपल्याकडे पुरेशा गोष्टी आहेत. आपण घाबरु नका, सरकार तुमच्यासोबत आहे. युद्धाचा आनुभव फार वाईट असतो. पण युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत, पण यंत्रणेवरील भार कमी करणं ही आपली जबाबदारी आहे. यंत्रणा सांभाळणारी हीसुद्धा माणसंच आहेत. कळत नकळत त्यांच्या मनातही धोका आहेच, पण तो धोका पत्करुन ते 24 तास काम करत आहेत. सरकारकडून ज्या सूचना दिल्या  जात आहेत, त्या पाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करणार, असं त्यांनी आश्वासन दिले आहे. ज्या सूचना सरकारने दिल्या आहेत, त्या पाळा. सर्वधर्मियांना विनंती आहे, हे संकट जातपात-धर्म यांच्या पलिकडचे आहे. एकजुटीने लढूयात, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

Post a Comment

0 Comments