कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता गर्दीवर नियंत्रण
विविध कार्यक्रमांना बंदी, सर्व धार्मिक स्थळे नागरिकांना प्रवेशासाठी बंद
अत्यावश्यक सेवांना बंदी आदेशातून वगळले
वेब टीम नगर, दि. १९ - कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात आतापर्यंत दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३० अन्वये विविध बाबींसाठी बंदी आदेश लागू केले आहेत. हे आदेश आजपासून लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणार्यावर दंडनीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.
यात, नगर जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मीक, क्रिडाविषयक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव, मिरवणूक, उरुस इत्यादींना मनाई राहील. जिल्हयातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल्स अथवा अन्य वास्तूंमधील मॅरेज हॉल तसेच अन्य विवाह स्थळांच्या ठिकाणांचा वापर करणेस बंदी राहील. जिल्हयात कार्यशाळा, मेळावा, सभा, मोर्चा, आंदोलन, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग यांचे आयोजनास बंदी राहील. मंदीर, मस्जिद, गुरुव्दारा, चर्च व इतर धार्मिक स्थळे नागरीकांचे प्रवेशासाठी बंद राहतील. जिल्हयात कार्यक्षेत्रात असणा-या दुकाने/सेवा आस्थापना, उपहारगृहे / खादयगृहे/ खानावळ, शॉपींग कॉम्प्लेक्स मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उदयाने, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा, महाविदयालय, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालय, व्हिडीओ पार्लस, ऑनलाईन लॉटरी सेंटर इत्यादी बंद राहतील. जिल्हयातील सर्व परमीट रुम बिअरबार बंद ठेवण्यात येत आहेत. सर्व नागरीकांना विहीत कारणाशिवाय अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील.
सदरचा आदेश खालील बाबतीत लागू होणार नाहीत. यात शासकीय / निमशासकीय कार्यालये सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅण्ड, बस थांबे व स्थानके, विमानतळ व रिक्षा थांबे, अंत्यविधी (गर्दी टाळून), अत्यावश्यक किराणा सामान, दुध/दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालय, पेट्रोलपंप, जीवनावश्यक वस्तू, विक्री/वितरीत करण्यास परवानगी राहील. (गर्दी टाळून), इयत्ता १०वी इयत्ता १२ वी तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून घेण्यात येणा-या सर्व स्पर्धा परिक्षा विदयापिठ/विश्व विदयालयाच्या परीक्षा देणारे विदयार्थी व संबंधीत शैक्षणीक काम पाहणारी व्यक्ती. प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारची दैनिक/नियतकालीके/टिव्ही न्युज चॅनेल इ. ) कार्यालय चालू राहतील. विदयार्थी साठी खानावळ तसेच महाविदयालय/वस्तीगृह यामधील कॅन्टींन /मेस (केवळ परीक्षार्थी)
आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाव्दारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी अहमदनगर जिल्हयामध्ये ही प्रवास करुन आलेले आहेत व काही प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोरोना या विषाणूचा संसंर्ग व प्रादुर्भाव परसण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ न होऊ देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्हयात होण्याची शक्यता लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी जाणे वास्तव करणे इ. बाबी टाळणे आवश्यक आहे. त्याअर्थी कोरोना विषाणूचे प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस/इसमास त्याच्या संपर्कात आलेने होण्याची शक्यता विचारात घेता, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन जिल्ह्यात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी हे बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
0 Comments