जिल्ह्यातील पतसंस्थांंसाठी शिर्डी येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

जिल्ह्यातील पतसंस्थांंसाठी शिर्डी येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

    वेब टीम नगर,दि. १२ - अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघ, राज्य पतसंस्था फेडरेशन व नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या मान्यतेने जिल्ह्यातील पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचार्‍यांकरीता शुक्रवार दि.१४ व शनिवार १५ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथील पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या सभागृहात विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर, सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या प्रशिक्षण शिबीरात राज्यातील सहकार क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीमत्वांचे  विविध महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शनही होणार आहे. तसेच सहकार उद्यमी व्यवसाय विकास केंद्र बाबत माहिती, नुकत्याच झालेल्या नेपाळ अभ्यास दौऱ्याबाबत माहित देऊन नेपाळ मधील पतसंस्थांचे कामकाज यावर मार्गदर्शन व चर्चा होणार आहे, अशी माहिती नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी दिली.
     प्रशिक्षण शिबीराबद्दल अधिक माहिती देतांना स्थैर्य निधीचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यात स्थैर्यनिधीच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांपासून जिल्ह्यातील पतस्थांच्या आर्थिक स्थैर्यासाठी प्रशिक्षणातून विकासासाठी आणि कर्ज वसूली अशा विविध पातळीवर कार्य करत आहे. त्याच बरोबर शासनाकडे पतसंस्थांच्या प्रश्‍नांबाबत सातत्याने पत्र व्यवहार, पाठपुरवठा व आंदोलनही करत आहेत. तसेच विविध उपक्रमही राबवत आहेत. या उपक्रमांतर्गतच जिल्ह्यातील पतसंस्थांना सक्षम करण्यासाठी व त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी, यासाठी  शिर्डी येथे विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे.  या प्रशिक्षण शिबीरात बुवासाहेब नवले पतसंस्थाचे अध्यक्ष मधुकर नवले, नागेबाबा मल्टीस्तेत्च काडूभाऊ काळे, सहकार कायदा तज्ञ गणेश निमकर, सी.ए. दत्तत्रेय खेमकर, बँकिंग कायदा तज्ञ संजय गोखले, निखिलेश मानुरकर आदींचे मार्गदर्शन व व्याख्यान होणार आहे.
     जिल्ह्यातील जास्तीत जास्त पतसंस्थांच्या पदाधिकारी, संचालक व कर्मचार्‍यांनी या विशेष प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थैर्यनिधी संचालक मंडळाने केले आहे.

Post a Comment

0 Comments