बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आर्थिक , सांस्कृतिक आक्रमण भारतासाठी विनाशकारी – प्रा.मदन दुबे

बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आर्थिक , सांस्कृतिक 

आक्रमण भारतासाठी विनाशकारी – प्रा.मदन दुबे  

वेब टीम नगर ,दि. २०-भारतात सरकार आणि सत्ताधारी पक्ष बदलले जात असले ,तरीही बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आर्थिक आणि सांस्कृतिक आक्रमण रोखण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत नाहीत. या कंपन्यांकडून उपलब्ध होणारे काळे धन भारतीय राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा आधार असल्याने त्यांच्या विरोधात प्रस्थापित पक्ष आणि संघटना प्रत्यक्ष कृती करीत नाहीत, असे प्रतिपादन स्वदेशी संकल्प यात्रेचे प्रवर्तक प्राध्यापक मदन दुबे यांनी आज येथील नागरी स्वदेशी संमेलनात केले.
भारतासाठी विनाशकारी असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणाविरुद्ध व्यापक जनआंदोलन करण्याचे आवाहन  प्रा.दुबे यांनी केले.
 वर्धा येथील स्व.भाई राजीव दिक्षीत मेमोरियल ट्रस्टने देशव्यापी स्वदेशी संकल्प यात्रा सुरू केली आहे. या  यात्रेचे अहमदनगर मध्ये बुधवार, दि.  १९ फेब्रुवारी  रोजी आगमन झाले. काल आणि आज या संकल्प यात्रेचे विविध कार्यक्रम नगर शहरात आयोजिण्यात आले होते स्नेहालय संस्थेच्या युवानिर्माण प्रकल्पाने या उपक्रमांचे आयोजन केले होते.
स्वदेशी आंदोलनाचे  पुरस्कर्ते असलेल्या स्व.भाई राजीव दीक्षित यांनी भारताच्या बहुराष्ट्रीयकरणाचा कट 30  वर्षे अव्याहत प्रचार - प्रबोधन करून भारतीयांच्या निदर्शनास आणला. राजीव यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे आई-वडील  मिथिलेश आणि राधेश्याम दीक्षित तसेच निकट सहकारी मदन दुबे व इतरांनी  हे कार्य पुढे चालू ठेवले. यात्रे सोबत असलेल्या राजीव दीक्षित यांच्या अस्थिकलशाचेही  उपस्थितांनी दर्शन  घेतले. तसेच मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर यावेळी घेतले गेले. या शिबिराचा अहमदनगरमधील   १५० लोकांनी लाभ घेतला.
यानिमित्ताने युवानिर्माण प्रकल्पाने स्वदेशी या विषयावर युवकांचे एक शिबिर घेतले त्यात राजीव दीक्षित यांचे आई-वडील तसेच प्रा. दुबे यांनी तरुणाईशी संवाद केला.
भगवान श्रीकृष्ण,छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी , डॉ. आंबेडकर यांच्या जीवन कार्याचे दाखले देत  'स्वराज्य' हाच स्वदेशी आणि स्वातंत्र्य या संकल्पनांचा पाया असल्याचे राधेश्याम दीक्षित यांनी स्पष्ट केले.
 सौ. मिथीलेश दीक्षित यांनी नमूद केले की,बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे स्थापित होत असलेल्या नवीन साम्राज्यवादाच्या विरोधात तरुणाईने उभे राहावे.
 भारतीय शिक्षण, भारतीय भाषा, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय उपचारपद्धती ,स्वदेशी आधारित कृषी व्यवस्था, भारतीय संस्कृतीला अनुरूप न्यायव्यवस्था, आणि सर्वत्र स्वदेशी संस्कृतीचा पाया असलेला नवा समाज निर्माण करण्यासाठी राजीव दीक्षित यांनी सुरू केलेले कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी स्वदेशी ची  प्रतिज्ञा यावेळी उपस्थित दोनशे युवक कार्यकर्त्यांनी घेतली.
स्नेहल हिच्या युवा निर्माण प्रकल्पाचे संचालक गोरक्षनाथ वेताळ म्हणाले की,आपल्या गावात तयार होणारी वस्तू अथवा सेवा आपल्याच गावात देण्यात आली तर, गावे स्वयंपूर्ण होऊन, भारत महासत्ता होण्यास उशीर होणार नाही.यावेळी आहार आणि जीवनशैलीवर  मदन दुबे यांनी मार्गदर्शन केले. भारतातील ८५टक्के  लोक  विविध आजारांनी पिडीत आहेत. याला कारणीभूत  त्यांची दूषित आहारपद्धती आणि दिनचर्या  आहे.यासाठी आपणच स्वतःचे डॉक्टर कसे बनू शकतो ,हे त्यांनी सांगितले.युवा निर्माण प्रकल्पाचे समन्वयक विशाल अहिरे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. तर संघटक पूजा पोपळघट, योगेश गवळी,  मीरेन गायकवाड , वैभव देशमुख, रोहित तनपुरे  आदींनी या स्वदेशी शिबिराचे आयोजन केले होते.

Post a Comment

0 Comments