अन्यथा भटका - विमुक्त समाज तीव्र आंदोलन छेडणार
ॲड. डॉ. अरुण जाधव - महाज्योतीची त्वरित स्थापन करण्याची मागणीवेब टीम नगर,दि. १९ - विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या विविध प्रवर्गातील युवक युवती साठी तसेच वंचित दुर्लक्षित घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक, व आर्थिक विकासाच्या अनुषंगाने संशोधन करणे तसेच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबविन्यासाठी सारथी संस्थेच्या धर्तीवर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही नवीन स्वायत्त संस्था त्वरित सुरू करावी. अन्यथा राज्यातील भटके - विमुक्त समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करील असा ईशारा भटके विमुक्त समाजाचे नेते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी दिला आहे.
याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले असून याबाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असा निर्वाणीचा ईशारा त्यांनी दिला आहे. राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील युवक युवतींच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी सारथी च्या धर्तीवर महाज्योती नावाची स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय शासनाने दि. ८ ऑगस्ट २०१९ रोजी घेतला होता. परंतु हा शासन निर्णय निघून ६ महिने झाले तरीही अद्याप पर्यंत महाज्योती नावाची संस्था अस्तित्वात आलेली नाही त्यामुळे गेल्या ७० वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासापासून वंचित असलेल्या भटके विमुक्त समाजाला शासनाने अजूनही वाऱ्यावर सोडले आहे किंवा झुलवत ठेवले आहे असा आरोप त्यांनी केला.
महाज्योती संस्था स्थापन करून कार्यान्वित करण्यासाठी गेल्या ६ महिन्याच्या काळात वेळोवेळी आवश्यक ते निर्णय घेण्याचे अधिकार विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या मंत्र्यांना देण्यात आले होते. या संस्थेची कंपनी कलम ८ अंतर्गत नोंदणीसाठी प्रथम संचालक आणि महाज्योती स्थापन करण्यासाठी सदस्य यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सदर संस्थेचे प्रथम संचालक म्हणून कामगार मंत्री डॉ. संजय कुटे (अध्यक्ष), विजाभज, ईमाव व विमप्र कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव राजेश कुमार, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मनिषा वर्मा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, तसेच सारथी चे सेवानिवृत्त व्यवस्थापकीय संचालक डी.आर. परिहार यापैकी उपलब्ध कोणत्याही ३ व्यक्तींची प्रधान संचालक म्हणून महाज्योती या संस्थेची कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नोंदणी करून घेण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. मात्र या नंतर महाज्योतीची निर्मिती करण्याबाबत कुठलेही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. त्यामुळे शासनाला भटके - विमुक्त समाजाला विकासापासून जाणीवपुर्वक वंचित ठेवायचे आहे असा डाव दिसतो. असा आरोप त्यांनी केला आहे.
0 Comments