रिंकू -चिन्मयचा 'मेकअप'



रिंकू -चिन्मयचा 'मेकअप' ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
वेब टीम नगर,दि. ३०- सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन अॅपल
  मीडिया प्रस्तुत गणेश पंडित लिखित व दिग्दर्शित रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'मेकअप' हा मराठी चित्रपट शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती या चित्रपटाचे दिग्दर्शक गणेश पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या चित्रपटाचे निर्माता दिपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. चित्रपटाची कथा सुजॉय रॉय यांची असून या चित्रपटात प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत.
काही महिन्यांपूर्वी 'मेकअप' चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरु झाली. हे पोस्टर प्रेक्षकांना संभ्रमात टाकणारे होते. यात रिंकूची दोन वेगवेगळी रूपं होती. त्यामुळे तिचा डबल रोल आहे का, याचा विचार सुरु असतानाच 'मेकअप'चा टिझर प्रदर्शित झाला. हळूहळू या 'मेकअप'चा उलगडा होत असतानाच हा 'मेकअप' अधिक गडद करण्यासाठी ट्रेलरही प्रेक्षकांसाठी दाखल झाला. वरवर पाहता हा मेकअप फक्त चेहऱ्याचा दिसत असला तरी यात मेकअपचे अनेक पैलू उलगडणार आहेत.

ट्रेलर एकदम धमाल असतानाच त्यात अनेक ट्विस्टही दिसत आहेत. एकीकडे लग्नासाठी मुले बघणारी, त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसतेय. त्यामुळे दोघींपैकी खरी पूर्वी कोण आणि मुळात पूर्वीने हा 'मेकअप' का केला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून ते चित्रपट पाहिल्यावरच सुटतील. ट्रेलरवरून हा सिनेमा जबरदस्त असणार हे नक्की. त्यासोबतच चित्रपटातील गाणीही श्रवणीय आहेत.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील 'गाठी गं' हे साखरपुड्याचे गाणे प्रदर्शित झाले. प्रत्येकालाच थिरकायला लावणाऱ्या या गाण्याला शाल्मली खोलगडे हिचा आवाज लाभला आहे. तर या गाण्यात नृत्य दिग्दर्शक विठ्ठल पाटील यांनी सर्वच कलाकारांना ठेका धरायला लावला आहे. 'लागेना' हे प्रेमाच्या तरल भावनेचा अनुभव देणारे हे गाणे साहिल कुलकर्णी यांनी गायले आहे. या सिनेमातले तिसरे गाणे रसिकांना सुखद धक्का देणारे आहे. नेहा कक्करने तिच्या सुरेल आवाजात 'मिले हो तुम हमको' ह्या हिंदी गाण्याचे मराठी व्हर्जन या चित्रपटात गायले आहे. या तिन्ही गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले असून गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे आहेत.

Post a Comment

0 Comments