३ वर्षांत भारताचे सर्वाधिक विजय; आतापर्यंत चॅम्पियन विंडीजने गमावले सर्वाधिक २५ सामने


हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळवला जाईल. दोन्ही देशांतील ही सहावी द्विपक्षीय मालिका आहे. भारताने ३ आणि विंडीजने दोन वेळा मालिका जिंकली. वेस्ट इंडीज सध्या जागतिक विजेता आहे. मात्र, टीम २०१७ पासून टीम इंडियाला टी-२० मध्ये हरवू शकला नाही, त्यांनी सलग सहा सामने गमावले. विंडीजला भारताविरुद्ध अखेरचा विजय जुलै २०१७ मध्ये मिळाला होता. २०१६ विश्वचषकात अव्वल १० संघाच्या प्रदर्शनाचा विचार केल्यास भारताने सर्वाधिक ३२ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, विंडीजने सर्वाधिक २५ सामने गमावले. एकूण दोन्ही संघांत आतापर्यंत १४ सामने झाले. भारताने ८ आणि विंडीजने ५ सामने जिंकले. एका सामन्याचा निकाल आला नाही.
राहुलला सलामीची संधी, भुवनेश्वरचे पुनरागमन शक्य :
दुखापतीमुळे शिखर धवन बाहेर आहे. अशात लोकेश राहुलला रोहितसोबत सलामी देण्याची संधी मिळू शकते. राहुल मालिकेत चांगले प्रदर्शन करत आगामी विश्वचषकासाठी संघात स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. राहुलने टी-२० आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये २८ डावांत ४२ च्या सरासरीने ९७४ धावा काढल्या. दोन शतके आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत. संजू सॅमसनला धवनच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. यष्टिरक्षक ऋषभ पंतदेखील खराब फॉर्मात आहे.
संभाव्य संघ :
  • भारत : लोकेश, रोहित, कोहली, अय्यर, मनीष पांडे, ऋषभ, शिवम,जडेजा, चहल, भुवनेश्वर, दीपक चाहर.
  • विंडीज : लुईस, सिमन्स, ब्रेंडन किंग, शिमरोन हेटमायर, केरॉन पोलार्ड, दीनेश रामदीन, जेसन होल्डर, किमो पॉल, फेबियन एलेन, हेडन वॉल्श ज्युनियर, शेल्डन कॉट्रेल.
विंडीज संघाच्या युवा खेळाडू ब्रेंडन किंग व एलेनवर असेल खास नजर
विंडीजच्या संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश आहे. गेल, रसेल व ब्राव्हाे संघातून बाहेर आहेत. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा युवा खेळाडू ब्रंेेडन किंग आयपीएल लिलावात सर्वांचे लक्ष्य वेधू शकतो. डावखुरा फिरकीपटू फेबियन एलेन तळातील अाक्रमक फलंदाज आहे. ताे रसेलची उणीव भरून काढेल. त्यासह लेगस्पिनर हेडन वॉल्श ज्युनियरदेखील चांगल्या प्रदर्शनाचा प्रयत्न करेल. त्याने २१ टी-२० सामन्यांत ३० बळी घेतले. सिमन्सने पुनरागमन केले. सिमन्सने टी-२० मध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. संघाचा नवा कर्णधार पोलार्डला युवांडूंकडून आशा आहे. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध विंडीजने वनडे मालिका ३-० ने जिंकली होती.
कर्णधार विराट कोहली २५०० धावांसाठी ५० धावांनी दूर :
विराट कोहलीच्या टी-२० मध्ये २४५० धावा झाल्या आहेत. कोहलीने सामन्यात ५० धावा केल्यास तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये रोहित शर्मा (२५३९) नंतर २५०० धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज बनेल. राहुलला १ हजार धावा पूर्ण करण्यासाठी २६ धावांची गरज आहे. अशा धावा करणारा तो सातवा भारतीय फलदंाज बनू शकतो. रोहितचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, वनडे, टी-२०) एकूण ३९९ षटकार आहेत. त्याने एक षटकार मारल्यावर तो ४०० षटकारांच्या यादीत तिसऱ्या स्थानी जाऊन बसेल. क्रिस गेल (५३४) पहिल्या आणि शाहिद आफ्रिदी (४७६) दुसऱ्या स्थानी आहे.

Post a Comment

0 Comments