संजय राऊतांना सेनेकडून अधिकृतपणे बोलण्याचा अधिकार नाही', संजय राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रसाद लाड यांचा पलटवार


वेब टीम
मुंबई- मुख्यमंत्री पदावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. भाजप सेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नसल्याचे दिसत नाहीये, तर दुसरीकडे सेनाही मुख्यमंत्री पदावरुन अडून बसली आहे. या सगळ्यात सेनेचे खासदार संजय राऊत अनेकदा भाजपवर टीका करत असतात. त्यांच्या एका टीकेवर बोलताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना शिवसेनेकडून अधिकृतरित्या बोलण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.
भाजपने मुख्यमंत्रीपद देण्यास अनुकूलता न दाखवल्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यातच खासदार संजय राऊत मागील तीन दिवसांपासून भाजपवर उघडपणे टीका करत आहेत. ''भाजप दिलेला शब्द पाळत नसून आमच्यासमोर इतरही पर्याय उपलब्ध आहेत,'' असे म्हणत राऊतांनी भाजपला इशारा दिला आहे. त्यावर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी राऊत यांना सडेतोर उत्तर दिले आहे.
प्रसाद लाड म्हणाले की, ''संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया शिवसेनेची अधिकृत प्रतिक्रिया नाही. त्यांना सेनेकडून अधिकृतरित्या बोलण्याचा अधिकार नाहीये. सत्ता स्थापनेविषयी चर्चा करण्याचा अधिकार आमच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आहे, तर शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा वक्तव्याला आम्ही दुजोरा देत नाहीत.'' असा पलटवार प्रसाद लाड यांनी केला आहे.
"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एक परिपक्व राजकारणी आहेत. ते ठाकरे आहेत. सरकार महायुतीचेच बनेल आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही प्रसाद लाड यांनी बोलून दाखवला.

Post a Comment

0 Comments