पवार चिडले पत्रकारावर अन् काँग्रेस-राष्ट्रवादी भिडले सोशल मीडियावर!
वेब टीम
मुंबई - नात्यागोत्यातली मंडळी राष्ट्रवादी सोडून जाण्याबाबतच्या प्रश्नावर शरद पवारांचा भर पत्रकार परिषदेतला संताप आख्ख्या महाराष्ट्राने पाहिला, मात्र पवारांच्या संतापाचा स्फोट जरी त्या पत्रकार परिषदेत झाला असला तरी यावरुन धूर आणि जाळ मात्र सोशल मीडियावर पसरतोय. इतका की चक्क आघाडी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यावरुन आपापली ट्विटरास्त्र परजली!

खरं तर त्या प्रसंगानंतर हा विषय संपायला हवा होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते डॉ. जितेंद्र आव्हाडांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराच्या निष्पक्षपातीपणावर ट्वीट करुन शेलक्या शब्दात टीका केली. या पत्रकाराचा माजी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत गाडीत बसलेला एका फोटो आव्हाडांनी ट्वीट केले.


पवार साहेबांना प्रश्न विचारणारे नि:पक्षपाती पत्रकार श्रीरामपूरचे हरीश दिमोटेजी विखेंच्या गाडीवर पार्टटाइम ड्रायव्हर म्हणून रोजी रोटी कमावतात, पत्रकारिता हा त्यांचा छंद आहे!
@TV9Marathi
@News18lokmat
@ndtv
@SakalMediaNews
@MySarkarnama
@TOIIndiaNews
pic.twitter.com/WqfqH9dytp

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks)
August 31, 2019


या फोटोवरुन आव्हाडांनी त्या पत्रकाराला थेट विखेंचा माणूसच ठरवले. मात्र, डॉ. आव्हाड यांच्या या ट्वीटवर अनेकांनी टीका केलेली दिसते. ट्वीटला आलेल्या अनेक प्रतिक्रियांमध्ये असाच सूर दिसतोय की, नातलगांच्या जाण्याबद्दल विचारलेल्या एका साध्या प्रश्नावर इतकं चिडण्याचं कारणच काय?

डॉ. आव्हाडांच्या या ट्विप्पणीनंतर प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे त्या पत्रकाराच्या समर्थनात उतरले. त्यांनीही ट्वीट करुन अप्रत्यक्षपणे डॉ. आव्हाडांना प्रत्युत्तर दिलं. नव्या गाडीत कुणी मोठा माणूस बसल्यावर त्यांच्यासोबत फोटो काढल्यामुळे ट्रोल करणं मूर्खपणा आहे, अशा शब्दात तांबेंनी टीका केली.मी स्वत: हरीष दिमोटेला गेली १५-१७ वर्ष बघतो आहे. हरीष सारखे अनेक पत्रकार हलाखीच्या जीवनातून संघर्ष करत प्रगती करणारे आहेत. स्वत:ची गाडी घेतली व त्यात कुणी मोठा माणूस बसला की कौतुकाने आपण फोटो काढतो. लगेच त्याला ट्रोल करणं म्हणजे मुर्खपणाच !

#I_Support_Harish
pic.twitter.com/mazb5VpJrU

— Satyajeet Tambe (@satyajeettambe)
August 31, 2019


गंमत म्हणजे त्या फोटोतले विखे-पाटील आता भाजपात आहेत. टीका करणारे डॉ. आव्हाड हे काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. तरीही, सत्यजित तांबे ज्याप्रकारे त्या पत्रकाराच्या समर्थनात धावले त्यामुळे पक्षीय आघाड्यांच्या पलिकडे जिल्ह्याची अस्मिता आणि मैत्रीचं प्रेम दिसून आलं हे नक्की!

या सगळ्या प्रकरणानं एक मात्र नक्की दाखवले. माध्यमांच्या स्वातंत्र्याचं कितीही गुणगान राजकारणी करोत...मात्र त्यांची खरी परीक्षा होते ती अशाच नावडत्या प्रश्नांमुळे आणि टीकेनंतर!

Post a Comment

0 Comments